एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


एको नारायणो देवः पूर्वसृष्टं स्वमायया ।

संहृत्य कालकलया कल्पान्त इदमीश्वरः ॥१६॥

नारांचे आश्रयस्थान । यालागीं बोलिजे 'नारायण' ।

जीवाचें तोचि जीवन । स्वामी नारायण सर्वांचा ॥१८०॥

ऐसा एक नारायण । तेणें पूर्वी जग स्रजिलें जाण ।

उपकरणसामग्रीवीण । केलें निर्माण जगाचे ॥८१॥

एकलेनि सामग्रीवीण । केवीं केलें जग संपूर्ण ।

स्वमाया क्षोभवूनि जाण । करी निर्माण जगाचें ॥८२॥

ते निजमायेच्या पोटीं । असंख्य जीवसामग्रीच्या कोटी ।

ते माया अवलोकिली दृष्टीं । तोचि उठाउठी निजकाळू ॥८३॥

ऐसी निजमाया अवलोकिली । ते निजांगावरी नांदविली ।

परी अंगीं लागों नाहीं दिधली । हे अलिप्तता केली तो जाणे ॥८४॥

धुई दाटली आकाशीं । आकाश नातळे धुईसी ।

तैसी निजांगे वाढवूनि मायेसी । अलिप्त तियेसी वर्ततू ॥८५॥

उदकें कमळिणी वाढिन्नली । ते जळ आवरी निजदळीं ।

तैसी माया आनंदू आकळी । चित्सत्ता मोकळी सदंशेंसीं ॥८६॥

स्वमायेसी जो अधिष्ठान । मायेसी नांदावया तोचि भुवन ।

एवं मायानियंता नारायण । सत्य जाण सर्वथा ॥८७॥

रजोगुण स्रजी सृष्टीसी । सत्त्वगुण प्रतिपाळी तिसी ।

कल्पांतीं क्षोभोनि तमोगुणासी । काळरूपेंसीं संहारी ॥८८॥

हे मायेची क्षोभक शक्ती । असे नारायणाचे हातीं ।

यालागीं संहारिता अंतीं । ईश्वरु म्हणती या हेतू ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP