मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय पाचवा|
श्लोक ५२ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५२ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इतिहासमिमं पुण्यं, धारयेद्यः समाहितः ।

स विधूयेह शमलं, ब्रह्मभूयाय कल्पते ॥५२॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे पंचमोऽध्यायः ॥५॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

जो निमि-जायंतसंवादु । वसुदेवा सांगे नारदु ।

हा इतिहास अतिशुद्धु । जीवशिवभेदुच्छेदकु ॥४९॥

सावधानपणें श्रोता । तल्लीन होऊनि तत्त्वतां ।

हे इतिहासाची कथा । सादरता जो परिसे ॥५५०॥

तेणें सकळ पुण्यांचिया राशी । श्रवणें जोडिल्या अहर्निशीं ।

तो गा पुरुषु अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥५१॥

सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुद्ध ।

यालागीं पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधें ॥५२॥

हे 'पंचाध्यायी' म्हणणें घडे । पंचवक्त्र चंद्रचूडें ।

एकादशाचें ज्ञान गाढें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥५३॥

हे पंचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण ।

उपदेशावया शुद्ध ज्ञान । सामोरे आपण स्वभक्तां आले ॥५४॥

हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ ।

एकादश वसंतकाळ । भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥५५॥

हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार ।

चाखों धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्त ॥५६॥

हे पंचाध्यायी नव्हे सिद्ध । एकादशाचे पंच गंध ।

भक्त आंवतावया शुद्ध । धाडिली प्रसिद्ध गंधाक्षता ॥५७॥

एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी ।

पुढें धाडिली कवतुकीं । निजभक्तविखीं कृपाळुवें ॥५८॥

हे कृष्ण-उद्धव‍अर्धमात्रा । अर्धोदयो महायात्रा ।

ते यात्रेलागीं हांकारा । पंचाध्यायी खरा साधकां करी ॥५९॥

श्रीकृष्ण‍उद्धवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा ।

तो सांगों आली कळवळा । भक्तांजवळां पंचाध्यायी ॥५६०॥

अहंकाराचें मेट होतें । तें उठवूनि श्रीकृष्णनाथें ।

केलें आत्मतीर्थें मुक्‍तें । अभयहस्तें उद्धवासी ॥६१॥

ते मुक्ततीर्थनवाई । पुढें सांगों आली पंचाध्यायी ।

संसारश्रांत जे जे कांहीं । ते धांवा लवलाहीं विश्रांतीसी ॥६२॥

कृष्ण‍उद्धवगोडगोष्टी । हे निर्विकल्प कपिलाषष्ठी ।

ते पर्वकाळकसवटी । सांगों उठाउठीं पंचाध्यायी आली ॥६३॥

उद्धवालागीं भवसागरीं । उतरावया पाय‍उतारीं ।

भागवतमिषें श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥६४॥

पव्हणियाहूनि पाय‍उतारा । भागवतमार्ग अतिसोपारा ।

तो मार्गु दावावया पुरा । हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥६५॥

पुढील निरूपण‍आवडी । अतिशयें वाढे चढोवढी ।

ते कृष्णवाक्यरसगोडी । पंचाध्यायी फुडी साधावया सांगे ॥६६॥

कृष्ण‍उद्धवसंवादीं । होईल परब्रह्म-गवादी ।

साधकमुमुक्षांची मांदी । धांवे त्रिशुद्धी निजसुखार्थ ॥६७॥

परब्रह्म झालें सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव ।

मनोहर रुपवैभव । स्वर्गींचे देव पाहों येती ॥६८॥

तो देवांचा स्तुतिवादु । सवेंचि उद्धवाचा निर्वेदु ।

कृष्ण‍उद्धवमहाबोधु । जेणें परमानंदु वोसंडे ॥६९॥

ते पुढील अध्यायीं कथा । रसाळ सांगेन आतां ।

अवधान द्यावें श्रोतां । ग्रंथार्था निजबोधें ॥५७०॥

स्वयें वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण ।

मग उडालेपणें जाण । आपल्या आपण संतोषिजे ॥७१॥

तेवीं मजनांवें कविता । करूनि स्वयें सद्गुरु वक्ता ।

एवं वदवूनियां ग्रंथार्था । श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥७२॥

तो एकपणेंवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा ।

तेणें पुढील ग्रंथ‍आवांका । विशदार्थें देखा विवंचिला ॥७३॥

नातळोनि दुजेपण । एका जनार्दना शरण ।

धरोनि श्रोत्यांचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥७४॥

एका जनार्दन नांवें देख । दों नांवीं स्वरूप एक ।

हें जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे ॥७५॥

एकाजनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण ।

पंचाध्यायी निरूपण । झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥५७६॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे वसुदेवनारदसंवादे एकाकार-टीकायां पंचमोऽध्यायः ॥५॥॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP