एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः ।

नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं स्वारामधीरनिकरानतपादपद्मे ॥९॥

एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण ।

तेणें कामादि अप्सरागण । लाजा विरोन अधोमुख झालीं ॥११॥

देखोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा ।

कळों सरलें वसंतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वयें ॥१२॥

ऐकें नरदेव चक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती ।

त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सद्भावेंसीं ॥१३॥

जे सदा सर्वांतें छळिती । त्यांहीं देखिली पूर्ण शांति ।

तेचि शांतीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥१४॥

जेणें संतोषे श्रीनारायण । त्यासी कृपा उपजे पूर्ण ।

ऐशिया परीचें स्तवन । मांडिलें संपूर्ण परमार्थबुद्धीं ॥१५॥

जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारभावा ।

पाहतां न देखों जी सर्वां । देवांमानवांमाझारीं ॥१६॥

मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरूं जाये ।

पराशरा केलें काये । भोगिली पाहें दिवा दुर्गंधा ॥१७॥

ज्यातें योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी ।

तो शिवु लागे मोहिनीपाठीं । फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥१८॥

विष्णु वृंदेच्या श्मशानीं । धरणें बैसे विषयग्लानीं ।

अहल्येची काहणी । वेदीं पुराणीं वर्णिजे ॥१९॥

नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी ।

माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टीं असेना ॥१२०॥

जो ब्रह्मचार्‍यांमाजीं राजा । हनुमंतु मिरवी पैजा ।

तयास्तव मकरध्वजा । संगेंवीण वोजा जन्मविला म्यां ॥२१॥

कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र ।

कपाटीं घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥२२॥

मज मन्मथाचा यावा । न साहवे देवां दानवां ।

मा तेथ इतरां मानवां । कोण केवा साहावयासी ॥२३॥

मज जाळिलें महेशें । त्यासी म्या अनंगें केलें पिसें ।

नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न दिसे तिहीं लोकीं ॥२४॥

त्या मज कामा न सरतें केलें । शांतीचें कल्याण पाहालें।

हें तुवांचि एकें यश नेलें । स्वभावा जिंकलें निजशांतियोगें ॥२५॥

तो मी न सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम ।

वासनेचा संभ्रम । नित्य निर्भ्रम त्वां केला ॥२६॥

हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिकां तपोनिष्ठां ।

केला अनुभवाचा चोहटा । शांतीचा मोठा सुकाळु केला ॥२७॥

मागें तपस्वी वाखाणिले । म्हणती कामक्रोधां जिंकिलें ।

त्यांसीही आम्हीं पूर्ण छळिलें । ऐक तें भलें सांगेन ॥२८॥

कपिलाऐसा तेजोराशी । क्रोधें तत्काळ छळिलें त्यासी ।

शापु देतांचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥२९॥

कोपु आला नारदासी । वृक्ष केलें नलकूबरांसी ।

गौतमें अहल्येसी । कोपें वनवासी शिळा केली ॥१३०॥

जो सर्वदा विघ्नातें आकळी । त्या विघ्नेशातें क्रोध छळी ।

तेणें अतिकोपें कोपानळीं । चंद्रासी तत्काळीं दिधला शाप ॥३१॥

कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अंबरीषासी ।

देवो आणिला गर्भवासासी । क्रोधें महाऋषी छळिले ऐसे ॥३२॥

जे दुजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधें झडपिजेती ।

सागरीं पडे इंद्रसंपत्ती । हे क्रोधाची ख्याति पुराणप्रसिद्ध ॥३३॥

इतरांची गोठी कायसी । क्रोधें छळिलें ईश्वरासी ।

तेणें दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥३४॥

जेथ मी कामु स्वयें वसें । तेथ क्रोध वसे सावकाशें ।

काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसें तुवां केलें ॥३५॥

हें परमाद्भुत तुझें वीर्य । आणिकां एवढें नाहीं धैर्य ।

यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥३६॥

शांतीच्या चाडें देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेवा ।

ते कामक्रोधादिस्वभावा । स्मरतां तव नांवा जिंकिती सुखें ॥३७॥

जेथ सन्मानें काम पुरत । तेथ आदरें अनुग्रहो करित ।

काम सन्मानें जेथें अतृप्त । तेथें शाप देत अतिक्रोधें ॥३८॥

यालागीं शापानुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त ।

परी नवल तुझें सत्त्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥३९॥

मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाहीं अहंता ।

छळवाद्यां द्यावी लघुता । अथवा उपेक्षता न करिसी ॥१४०॥

पृथ्वी दुःखी करिती नांगरीं । ते पिकोनि त्यांतें सुखी करी ।

तेवीं अपकार्‍यां जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु ॥४१॥

तुजमाजीं निर्विकार शांति । हें नवल नव्हे कृपामूर्ति ।

तुझ्या स्वरूपाची स्थिति । आजि निश्चितीं कळली आम्हां ॥४२॥

तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म ।

तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पर्शों न शके ॥४३॥

जो नित्य स्मरे तुझें नाम । त्यासी मी कामचि करीं निष्काम ।

क्रोधचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥४४॥

जे धीर वीर निजशांतीं । ज्यांसी परमानंदें नित्य तृप्ति ।

ऐशियांचिया अमित पंक्ति । पायां लागती तुझिया ॥४५॥

तुज करावया नमस्कारु । पुढें सरसे महासिद्धांचा संभारु ।

त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्परु परमात्मा ॥४६॥

तुझिया सेवकांकडे । विघ्न रिघतां होय बापुडें ।

तें रिघावया तुजपुढें । कोण्या परिपाडें रिघेल ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP