मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय दुसरा|
श्लोक ३५ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


यानास्थाय नरो राजन्न प्रमाद्येत कर्हिचित् ।

धावान्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥३५॥

जो श्रुतिस्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा ।

त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥३३०॥

सद्भावेंसीं सप्रेम । आचरितां भागवतधर्म ।

बाधूं न शके कर्माकर्म । भावें पुरुषोत्तम संतुष्ट सदा ॥३१॥

श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे ।

तेही हरिभजनीं धांवतां भावबळें । पडे ना आडखुळें सप्रेमयोगें ॥३२॥

प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन ।

प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥३३॥

माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झांकूनि धांवे ।

ते धांवेसवें झेंपावे । अति सद्भावें निजमाता ॥३४॥

तैसा सप्रेम जो भजे भक्त । त्या भजनासवें भगवंतु ।

भुलला चाले स्वानंदयुक्तु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥३५॥

ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म ।

कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजीं ॥३६॥

ऐसा भागवतधर्में गोविंदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु ।

तेथें केवीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु कदा न बाधी ॥३७॥

जेवीं कां स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा ।

तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधूं न शके ॥३८॥

ज्यासी भगवद्भजनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु ।

देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सुखावे ॥३९॥

भागवतधर्में राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुषोत्तम ।

सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥३४०॥

कर्म करुं पावे प्रमादु । तंव प्रमादीं प्रगटे गोविंदु ।

यालागीं विधिनिषेधु । न शकती बाधूं हरिभक्तां ॥४१॥

अजागिळा कर्मबाध । यमपाशीं बांधितां सुबद्ध ।

तेथें प्रगटोनि गोविंद । केला अतिशुद्ध नाममात्रें ॥४२॥

स्वधर्म-कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करुनी ।

जो पहुडे भजनसुखासनीं । तो पडे तैं दंडणी स्वधर्म-कर्मां ॥४३॥

भजनप्रतापसत्तालक्षणें । स्वधर्मकर्मां ऐसें दंडणें ।

वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणें कर्माची ॥४४॥

एवं भागवतधर्में जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचें रंक ।

तें राहों न शके त्यांसन्मुख । मा केवीं बाधक हों शकेल ॥४५॥

कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंतीं अर्पे कर्म ।

अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥४६॥;

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP