एकनाथी भागवत - श्लोक २ रा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैर्दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् ।

कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् हत्वा नृपान्निरहरत्क्षितिभारमीशः ॥२॥

दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार ।

ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण ॥६॥

येणें श्रीकृष्णसंकल्पोद्देशें । हों सरले कपटफांसे ।

तेणें कपटें बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥७॥

जगीं द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें ।

धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥८॥

बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्‍नी ।

ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजीं ॥९॥

दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढली कचकच ।

तें कर्म त्याचें त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥२१०॥

वनीं कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी ।

सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्यूची पदवी मस्तका आली ॥११॥

अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो ।

द्रौपदीवस्त्रहरण पाहा हो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥१२॥

अग्निदानें गरदानें । धनदारा अपहारणें ।

घाला घालूनि मारणें । शस्त्रपाणी होणें वधार्थ ॥१३॥

अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण ।

हेंचि निमित्तासी कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥१४॥

पतिव्रतेचें वस्त्रहरण । तेणे तत्काळ पावे मरण ।

हेंचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणें कर्में ॥१५॥

ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी ।

यालागीं पांडवांचिये बुद्धी । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपु ॥१६॥

भूभारहरणचरित्र । सखे-स्वजन-सुहृद-स्वगोत्र ।

शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजीं विचित्र उपजवी कलहो ॥१७॥

धराभार हरावया गोविंदु । कळवळियाचे सखे बंधु ।

करविला तेथ गोत्रवधु । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP