मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ६० - ६१

क्रीडा खंड - अध्याय ६० - ६१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कालानें आणियला, दैत्य नरांतक विनायकापुढती ।

तेथें आल्यापासुन, झाला इतिहास पाहतो चित्तीं ॥१॥

पडला विचार त्यानें, गिळिलें सैन्यासहीत भूपतिस ।

पाहे विनायकाच्या, उदरांतुन तेधवां निघे खास ॥२॥

वाटे नरांतकाला, आश्चर्यानें वदे तरी काय ।

कश्यपनंदन उदरीं, जन्मा आला तनूज प्रभु होय ॥३॥

साघा मानव नाहीं, परमात्मा हा खरोखरी हो कीं ।

ऐसें ठसलें चित्तीं, भ्याला होता करीपरी रव कीं ॥४॥

धावे विनायकाच्या, अंगावरि तेधवां धरायास ।

भूपति समीप होता, सोडी तत्काळ सज्ज बाणास ॥५॥

भूपतिकरिंचें धनु तें, घेई सत्वर नरांतक क्रोधें ।

पाहे परशूधर तें, परशूनें ताडिलें तया क्रोधें ॥६॥

क्षणभर मूर्च्छित पडला, सावध झाला त्वरीत तो गेला ।

पट्टण बाह्यप्रदेशीं, मायें नटला प्रचंड तो झाला ॥७॥

कश्यपसूतावरि तो, वृक्षांचा नी तसाच हीरांचा ।

वर्षाव करी तो मोठा, छेदितसे तो स्वआयुधें साचा ॥८॥

दैत्यपतीचा विक्रम, पाहुन भूपास वाटलें भय तें ।

कश्यपनंदन तेव्हां, विस्मित झाला सुवीर्य हें दिसतें ॥९॥

याचा वध जर होइल, अभय असे सूर हे खरे होती ।

ऐसा विचार करितो, दिव्य धनूंनीं प्रचूर शर पडती ॥१०॥

तें धनु घेउन हातीं, दैत्यावरि दो शरांस कीं सोडी ।

वन्ही वर्षत गेलें, राक्षस पतिच्या करद्वया तोडी ॥११॥

कर एक पडे स्वर्गी, देवांतक मंदिरा पुढें व्यासां ।

दुसरा पडे पित्याच्या, द्वारीं जाऊन तेधवां खासा ॥१२॥

कर छेदितां तयाचे, नूतन कर ते पुन्हां तया फुटले ।

भीषण पसरुन वदना, धांवत गेला प्रभूवरी डौलें ॥१३॥

(वसंततिलका)

बोले विनायक मुरा अतुल प्रतापी ।

शंका नसे खचित कीं वदतों कदापी ।

शाबास आजवरिही भट तूं मिळाला ।

माझा पराक्रम किती तुजला कळाला ॥१४॥

आतां बघे पुनरपी मदिय प्रताप ।

सोडीत बाण पहिला करिं घेइ चाप ।

बाणप्रकाश पडला गगनोदरांत ।

व्यासा नरांतक तदा पदहीन होत ॥१५॥

काढून बाण दुसरा त्यजितां समंत्र ।

जैसें पडे पवि गिरीं शिरसाहि तत्र ।

कंठास भग्न करुनी शिरसा तुटे ती ।

गेली उडून गगनीं खग-पक्षपातीं ॥१६॥

तैसी उडून पडली सदनीं पित्याचे ।

होई जनीत दुसरें शिर राक्षसाचें ।

ऐसें जनीत शिर तें बहु वेळ होई ।

शंका प्रभूस मग ये वध केविं होई ॥१७॥

ऐसा विचार पडला प्रभुसी सख्या रे ।

माया त्यजीत मग राक्षस देहिं तो रे ।

झाला नरांतक तदा बहु मोदयुक्त ।

लागे तयास मग वेड असा प्रयुक्त ॥१८॥

आहे समोर प्रभु तो ललना नरासी ।

किंवा असूर सुर वा जननी पित्यासी ।

जाणे न ही अशि तदा स्थिति होत पूर्ण ।

झाला विनायक विराट वघार्थ तूर्ण ॥१९॥

चेपी तयास पद अग्रिं धरुन जेव्हां ।

वैवस्वतालयिं रिघे मुर भूप तेव्हां ।

केली विनायक शिरीं सुरिं पुष्पवृष्टी ।

गंधर्व गाउन तदा करतीच तुष्टी ॥२०॥

पूजी विनायक तदा नृपती सुभावें ।

तैसेच लोक करिती स्तवनास भावें ।

सांगे विधी कथन हें मुनिराज यास ।

तैसेंच हें कथितसें भृगु राजयास ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP