मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४८ ते ५०

क्रीडा खंड - अध्याय ४८ ते ५०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

क्षेत्र काशी हें त्यजिति दिवोदास ।

त्यजी ज्योतीषीरुप प्रभू खास ॥

वसे तेथें हे कीर्ति गणाधीश ।

हरी सुचवी तों येतसे गिरीश ॥१॥

गणांसह ते मुदित बहू झाले ।

वाद्यगजरानें युक्त असे आले ॥

कार्य केलें हें सूत गणेशानें ।

स्तविति त्याला ते ईशभावनेनें ॥२॥

सर्व पुरुषार्थ शोधिती गणाधीशा ।

म्हणुनि झालासी ढुंढिराज ऐशा ।

सार्थ नामांनीं तुजसि जाणतात ।

असे कीर्तीला मुनिंहि सांगतात ॥३॥

( वसंततिलका )

ज्याच्या कृपें तनय होत सजीव कीर्ती ।

त्याचें महात्म्य कथिलें तुजलागिं कीर्ती ॥

आतां मला स्वसदनी गमनास देई ।

आज्ञा सती शिव-पुरी स-सुताहि जाई ॥४॥

कीर्ती सुतासह गजानन-ढुंढिराजा ।

जेथें असे भुवनिं त्या स्थलिं राज-भाजा ॥

गेली त्वरें नमुनि त्यांस करीत पूजा ।

दूर्वा-शमी-सहित अर्पित विघ्नराजा ॥५॥

देवां सुतां सुयश देइ म्हणून प्रार्थी ।

झाला तिथें प्रकट तो प्रभु कीं वरार्थी ॥

झालें तयांस प्रभु-दर्शन त्याच ठायीं ।

कीर्ती सुता-सहित त्या बहु हर्ष होई ॥६॥

देवा तुझें चरित हें मज वर्णनास ।

शक्ती नसे खचित कीं बल आबलेस ॥

क्षिप्रप्रसादन असें सुत नाम देई ।

झाला मदीय सुत हा मृत लाभ होई ॥७॥

भक्ती जडो तव पदीं मम पुत्र याची ।

कीर्ती सुराज्य सुख ही प्रभु त्यास याची ॥

बोले गजानन तिला वर सर्व देतों ।

तैसेंच आयु बहु दीर्घ तयास देतों ॥८॥

देई गजानन तया परशूस बाहू ।

ठेवीत नाम मग तें प्रभु ’पर्शुबाहू’ ॥

कीर्ती सुतासह वरा मिळवून गेली ।

चाले सती त्वरित कर्णपुरांत आली ॥९॥

(गीति)

ओळखिलें लोकांनीं, पुत्रासह पालखींत बैसविलें ।

हर्षभरें बहु गजरें, नृप मंदिरिं त्या त्वरीतसे नेलें ॥१०॥

राजास मोद झाला, सति सूताचा करीत बहुमान ।

पुत्रास राज्य दिधलें, राजा करि त्या पुरास यजमान ॥११॥

प्रियव्रत राजा गेला, सुवनीं तेव्हां तपास आनंदें ।

न्यायें करुन करितो, परशूबाहू सुराज्य तें मोदें ॥१२॥

सद्‌गुण सालस कीर्ती, विक्रम आदीकरुन युक्‍त अशा ।

बहु गुण वर्तुन झाला, त्रिभुवनिं विख्यात होत जगदीशा ॥१३॥

मंदार-काष्ठ-मूर्ती, केली घाली गणेश कंठांत ।

वरुषें सहस्त्र केलें, राज्य असें कर्णपूर नगरांत ॥१४॥

नंतर अपुल्या पुत्रां, राज्य समर्पी सगूणसा युक्‍त ।

गेला गणेशलोकीं, प्रभुचा प्रियकर प्रसिद्ध तो भक्‍त ॥१५॥

व्यासें विधीस पुशिलें, आहे कोठें गणेशलोक बरें ।

सर्वज्ञ तसे आपण, सर्वांचेही पिता-महाख्य बरें ॥१६॥

यास्तव पुसतों सांगा, वर्णन मजला गणेशलोकाचें ।

तेव्हां सांगति विधि हे, सखया ऐके सुशांतते साचे ॥१७॥

मी नारदास सांगें, नारद सांगे तसेंच मुद्‌गल या ।

मुद्गल काशि-नृपाला, सांगे हें वृत्त आणखी सखया ॥१८॥

(साकी)

इक्षुसागरीं प्रथमारंभीं स्थान पाहिलें जें कां ।

कामदायिनी शक्ती योगें वसवी गणेशलोका ॥१९॥

धृ.प. सुन सुन सखया हें साच असें कीं बघ हें ।

त्या लोकांचें नाम ठेविलें अपुलें नामीं लोक ।

त्या लोकीं जे वसती करिती पावन करितो लोक ॥२०॥

तेथें जातां जन्म मरण नी सुखदुःखादी द्वंद्वें ।

यांची पीडा होतच नाही नासति अणखी द्वंद्वें ॥२१॥

सिद्धी बुद्धी सेविति तेथें सामवेद गानासी ।

चालत असतें कल्पक्षही आहे त्या लोकासी ॥२२॥

यास्तव तेथें वसती जे कीं भक्त साच देवाचे ।

त्यांच्या इच्छा पुरीत होती वर्णन हें त्यांचें ॥२३॥

(ओवी)

यात्रामिषें मुद्गल मुनी । फिरत असतां मेदिनी ।

काशीराज भेटला सदनीं । पूजिलें मुनीस आदरें ॥२४॥

भूपती पुसे तये वेळीं । अहो मुनीं चंद्रमौळी ।

गणेश-लोक वर्णावा सकळीं । विनंती माझी परिसावी ॥२५॥

काशी राजास मुद्गल मुनी । जें कथन केलें त्यांनीं ।

तें मी तुजलागोनी । सांगतों ऐकें सावधान ॥२६॥

निजलोक आणि स्वानंद-भुवन । त्या लोकांस असें जाण ।

म्हणती प्रभू गजानन । अनुसंधान ऐकिजे ॥२७॥

(गीति)

या लोकांचें चवथें, नाम असे दिव्य लोक हें ऐक ।

आसन नाम असें कीं, म्हणती त्या कामदायिनी ऐक ॥२८॥

देव-गजानन तेथें, विस्तृतशा आसनीं सदा वास ।

मणि-हेम-युक्‍त-भूमी, बघुनि असे इक्षुसागरीं वास ॥२९॥

विस्तार असे याचा, योजन सख्या सहस्त्र ती पांच ।

बहुविध तप दानांनीं, करितां न मिळे मिळे कृपें साच ॥३०॥

व्यष्टि समष्टी रुपें, वास करी हो गजानन प्रभु तो ।

वर्णन समग्र करण्या, असमर्थ असे तुम्हांस हें कथितों ॥३१॥

ऐकून वर्णन त्याचें, काशीराजा गणेश-लोकासी ।

वांच्छुन भक्‍ती करितो, तल्लिन झाला पुसेच लोकांसी ॥३२॥

जो जो भेटे मानव, त्याला समजे गणेश तो खास ।

आलिंगी प्रेमानें, भान नसे राहिलें असे त्यास ॥३३॥

मुनिवर्यासी पुशिलें, गणेशलोकीं वसावया जावें ।

वसणें चिरायु व्हावें, असल्या देहीं तिथें त्वरें जावें ॥३४॥

पुनरपि भेटी झाली, मुद्गल मुनिची नृपास की व्यासां ।

सांगे मुद्गल त्यासी, ऐकें भृपा श्रवी धरी मनसा ॥३५॥

जेव्हां जनीत होती, देवांतक नी नरांतक प्रथित ।

त्रिभुवन त्रस्त करीती, हननासाठीं प्रभू जगीं येत ॥३६॥

अदिती उदरीं येती, बालस्वरुपीं करीत बहु क्रीडा ।

नंतर भूपति तुझिया, सदनीं करि तो बहूतशा क्रीडा ॥३७॥

मारी असूर भारी, सुखवस्तु शुक्ल विप्रनगरींत ।

त्याचे सदनीं जाउन, भोजन करि तृप्तसा तिथें होत ॥३८॥

तुझिया सदनीं राहे, पूजन करिसी परोपरी त्याचें ।

ऐसें बहूत वरुषें, राज्य करी मग घडेल हें साचें ॥३९॥

मुद्गल पुसून भूपा, जाते झाले करीत यात्रेस ।

ऐसें वृत्त असें हें, कथितों सखया तुला रमायास ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP