मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३३

क्रीडा खंड - अध्याय ३३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(वसंततिलका)

कीर्ती सती प्रतिदिनीं यजनीं प्रभूच्या ।

दूर्वांस जाति सखि या विपिनीं तियेच्या ॥

ज्येष्ठांत त्या न मिळती शमि आणिताती ।

आल्या त्वरीत सदनीं शमि तीस देती ॥१॥

दूर्वा मिळे तंववरी नच भोजनासी ।

कीर्ती शमी करुन ती प्रभुपूजनासी ।

संतुष्ट ती प्रिय शमी मिळतांच झाला ।

स्वप्नीं तिच्या प्रकट कीं प्रभु तेथ झाला ॥२॥

बोले तिला शमि रुचे मजलागिं कीर्ती ।

केली पुजा म्हणुन मीं प्रकटून आर्ती ।

कीर्ती तुला वश पती वरदेंच होई ।

तैसा तुझा सुत वदे मम भक्त होई ॥३॥

क्षिप्रप्रसादन असें सति नाम ठेवी ।

वर्षीं चतुर्थ सुत तो विखिं देह ठेवी ॥

त्यातें सजीव करि कीं मम पूर्ण भक्त ।

वाचक्नवी सुत चिरायु वरें प्रयुक्त ॥४॥

होऊन राज्य करितो सतिला गणेश ।

देई वरास मग गुप्त तिथें गणेश ॥

झाला क्षणेक इकडे प्रियजी प्रभा ती ।

झाली तिची झडकरी मलिन प्रभा ती ॥५॥

(दिंडी)

पूर्वजन्मार्जित पाप फळा आलें ।

महाव्याधीनें तनुस पीडियेलें ॥

प्रभा आवडेना भूपतिस आतां ।

कीर्ति-राणीला सुखद प्रभू होतां ॥६॥

पुढें कीर्तीला पुत्र एक होई ।

बहुत सुंदर तो नवल करी आई ॥

पुत्रजन्मानें भूप हर्षयुक्त ।

करी उत्सव तो दान-धर्मयुक्त ॥७॥

पुत्र झाला त्या गणपतीवरानें ।

नाम ठेवियलें त्यास जें प्रभूनें ॥

वरद-वाणीनें सूचित असे जें तें ।

प्रथित झालें सर्वत्र कीं मुखातें ॥८॥

कीर्ति-राणीला सूत जईं होत ।

तई सवतीला दुःख बहू होत ॥

पट्टराणी ही कीर्ति असे भूपा ।

मदिय पुत्राला आस नसे भूपा ॥९॥

सवत भावानें दुःख तिला होई ।

कीर्ति सूताला वीष तदा देई ॥

दहीं-भाताचें अमिष करी माता ।

सवत सूताला वाटली प्रभा माता ॥१०॥

वीष उदरीं तें भिनुन कीर्ति बाळ ।

पडे विव्हळ तें नेत तया काळ ॥

कीर्तिराणीनें बहुत यत्‍न केले ।

परी सारे ते फुकट असे झाले ॥११॥

(हरिणी)

सुत शव तदा राणी घेई निघे बिदिला रडे ।

गमन करिती झाली तेव्हां पुरांतुन ती पडे ॥

अवनिवरि ती लोळे दुःखें पिटी तनु ती करें ।

तनय गुण ती वर्णी तेथें प्रभूस मुखीं स्मरे ॥१२॥

(गीति)

कीर्तीचें दैव कसें, रविपरि दिसला गणेश-भक्त तिला ।

गृत्समदाभिदमार्गी, दुःखित ती पाहुनी वदे तिजला ॥१३॥

करुणा आली सति गे, शमिपत्रानें गणेशपूजन जें ।

पूर्वी केलें होतें, पुण्य तुझें बालकास देई जें ॥१४॥

देतां पुण्य तयाला, सूत तुझा जगविशील हें कीर्ती ।

ऐकुन प्रसाद भाषण, प्रमुदित झाली त्वरीत ती कीर्ति ॥१५॥

सत्वर पुण्य सुताला, दिधलें तेव्हां त्वरीत तो उठला ।

हर्षानें कीर्तीला, पार नसे राहिला सख्या तिजला ॥१६॥

नमिलें मुनि-चरणांसी, शमि-पत्राचें महात्म्य तें पुशिलें ।

गृत्समदानें तेव्हां, शमि नामाचें महात्म्य वर्णियलें ॥१७॥

घेतां नाम तियेचें, अनंत पातक हरेल हें कथिलें ।

यास्तव इंद्र प्रभुला, विधि सूते तें सविस्तरें कथिलें ॥१८॥

सांगें तुजला मीं तें, श्रवण करीं कीर्ति हें मुनी म्हणती ।

पुढती कथा असे ती, श्रवणीं बसली सुशांतशी चित्तीं ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP