मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ३१

क्रीडा खंड - अध्याय ३१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

होता वर्धित बालक, मौंजीपर्यंत तो करी कृत्यें ।

पढवी चारहि वेदां, शिकवी त्याला यथाविधी कृत्यें ॥१॥

देवांचें दुःख कसें, करितां येयी मला त्वरें नाश ।

कथणें उपाय यासी, वदला वामन पित्यास हें मनिश ॥२॥

ऐकुन कश्यप वदले, नानाविध सिद्धि देइ मंत्र असा ।

उपदेशितों तुला मी, षष्ठाक्षरि-मंत्र घे करीं तपसा ॥३॥

देव गजानन याचा, मंत्र असे तो जपून प्रभु मुदित ।

करणें वत्सा आधीं, म्हणजे साफल्य होय कीं त्वरित ॥४॥

ऐसें सांगुन कश्यप उपदेशी त्या सुमुहूर्त पाहूनी ।

मंत्र ग्रहण करुनियां, कश्यप आज्ञे निघे अनुष्ठानीं ॥५॥

(शिखरिणी)

तपश्चर्येसाठीं स्थल बघतसे योग्य बरवें ।

तया ठायीं होती तरुवरलतायुक्त बरवें ॥

तिथें होतें मोठें निर-मधुर-कासार दिसलें ।

विदर्भ प्रांतीं कीं स्थल बहुत तें रम्य दिसलें ॥६॥

तपश्चर्येसाठीं विधि परि बसे वामन कसा ।

निराहारी तेथें तप कारत तो आब्द मनसा ॥

धरी आटोपूनी प्रभुवर तया तोषुन बघे ।

वरा मागें आतां प्रभुवर वदे देत वर घे ॥७॥

बटू मागे तेव्हां मदिय मनसा पूर्ण करिं बा ।

प्रभू जाणे त्याची त्वरित मनसा पूर्ण करि बा ॥

करी काश्मीराची स्वकरिं प्रतिमा वामन तिथें ।

रची देवासाठीं भुवन बटु तें सुंदर तिथें ॥८॥

प्रभू मूर्ती तेथें बटु करित कीं स्थापन मुनी ।

पुढें तातालागीं नमित बटु भेटे निज मनीं ॥

पुसे तातासी तो त्वरित बलिच्या यागसमयी ।

बटू गेला तेथें बघति सगळे योग्य समयीं ॥९॥

(भुजंगप्रयात)

कटीं सूत्र साजे तशी मेखला कीं ।

करीं दंड शोभे मृगाजीन काखीं ॥

दुजेहातिं लोटी ऋषी मूर्त छोटी ।

समस्तांस वाटे बहू हर्ष पोटीं ॥१०॥

बलीनें तयाला दिलें आसनास ।

यथायोग्य तेव्हां करी पूजनास ॥

पुसे नांव गांवा तसें कारणासी ।

कथा हेतु मातें इथें यावयासी ॥११॥

बटू त्यास बोले नृपा आठवेना ।

मला तात माता अशी माझि दैना ॥

म्हणूनी असा मी बहू वाळलों कीं ।

स्थिती ही नृपा सांगतों मी विलोकीं ॥१२॥

नसे ठाव मातें मला तीन पाद ।

नृपा देयिं भूमी इथें याच पाद ॥

करुनी इथें राहतों पर्णकूटी ।

अशी भावना जाहली भाग्यकोटी ॥१३॥

असें ऐकतां भूपती सिद्ध झाला ।

पुढें शुक्र आला वदे त्या बलीला ॥

नसे जाणिलें कीं नृपा याचकाला ।

असे विष्णु हा कीं बटूरुप झाला ॥१४॥

(गीति)

टाकी त्रिचरणीं व्यापुन, त्रिभुवन हें सांगतों बली ऐक ॥

यास्तव बटूस कांहीं, देतां कामा नये असें ऐक ॥१५॥

शुक्राचें भाषण हें, ऐकुन बलिला बहुत ये राग ।

बोले गुरुस तेव्हां, वदतां हें वाउगें नसे चांग ॥१६॥

याच्यासम दुसरा कीं, याचक लाभेल कोणता मातें ॥

देतां दान ययाला, अनंत फल हें मिळेल हो मातें ॥१७॥

यास्तव त्रिपादभूमी, देइन वदला बटूस तेव्हां तो ।

संकल्प सांगणें हो, वदतां संकल्प तो गुरु लघु तो ॥१८॥

होउन झारी तोटी मध्यें जाऊन बैसला शुक्र ।

तोटीमधून जल तें, येईना हें कळे नसे शुक्र ॥१९॥

तोटींत दर्भ घाली, वामन तेव्हां फुटे गुरुनयन।

गुरुही पडला खालीं, नंतर जल तें पडेहि मागून ॥२०॥

संकल्पयुक्त हस्तीं, उदक पडे वामनास हो मोद ॥

वाढे त्वरित तेव्हां, स्वर्ग नि भू आक्रमीत द्वय पाद ॥२१॥

तिसरें पाउल बलिच्या, शीर्षी देऊन त्यास पाताळीं ।

जाण्याची आज्ञा दे, बलि वदला बटुस हें तये वेळीं ॥२२॥

जातों पाताळीं मी, आपण यावें बरोबरी खालीं ।

ऐसें ऐकुन वामन, संनिध राहीन अशी करी बोली ॥२३॥

बलि विष्णुभक्त होता, यास्तव वामन तयास पाताळीं ।

भक्‍त सखा विष्णू हा, जाउन तेथें स्वयेंच सांभाळी ॥२४॥

अदोष नगरामध्यें, मूर्ती स्थापी गणेश वामन तो ।

पूजा करणार्‍यांच्या, पूरित करि भावना प्रभू म्हणतो ॥२५॥

आतां गजाननाला, शमि कां रुचते बहूत प्रीय अशी ।

कथितों कथा सख्या मी, ऐकें व्यासा सुरम्य ती खाशी ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP