मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २७

क्रीडा खंड - अध्याय २७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(भुजंगप्रयात्)

पुसे व्यास हा प्रश्न कीं त्या विधीस ।

अहो व्याध नी दैत्य तो कोण खास ।

कथा पूर्वजन्मांतरींचेंच वृत्त ।

पुढें पूसती व्यास तें ऐक वृत्त ॥१॥

तिथें वामनानें अनुष्ठान केलें ।

कशासाठिं देवा तईं आळविलें ।

प्रभूनें प्रसादा दिलें काय वृत्ता ।

कथा आणखी पूढिलें प्रश्न वृत्ता ॥२॥

असे वेगळा कीं गणाधीश-लोक ।

तयाला शमीचा कसा प्रीय शोक ।

वदे व्यास यांसी विधी ऐक वृत्त ।

कथीं सर्व मी ऐक देऊन चित्त ॥३॥

असे पूर्वजन्मांतरीं व्याध राजा ।

तयाचा पिता सर्व शास्त्रांत राजा ।

तसा वेदवेत्ता बहू शांत होता ।

परंतू असा तो सुताशून्य होता ॥४॥

(गीति)

मृत्युपथीं जातांना, सांगतसे तो प्रधान अणवून ।

दुर्घर्ष बंधु क्षेत्रज, पुत्र असे सांब त्यास अणवून ॥५॥

माझ्यामागें त्याला, राज्य समर्पा असें कथी त्यांस ।

आज्ञेपरी तयांनीं, राज्यावरि स्थापिलाहि सांबास ॥६॥

ऐकुन व्यासें पुशिलें, क्षेत्रज होता म्हणून सांबाचें ।

विस्तृत वृत्त तयाचें, कथिलें नाहीं मला अहो साचें ॥७॥

ऐकें व्यासा आतां, बहु यत्‍नांनींहि पुत्र दुर्धर्षा ।

झाली नाहीं म्हणुनी, प्रमदा पत्‍नी वरीच परपुरुषा ॥८॥

होता पुरुष धीवर, त्यापासुन त्यास जाहला पुत्र ।

होता जारज ऐसें, कळलें नाहीं तयास अणुमात्र ॥९॥

दुर्घर्षाच्या मागें, राज्यावरि स्थापिलें प्रधानांनीं ।

खजिन्यासहीत देउन, भूषविलें कीं प्रचूर चिन्हांनीं ॥१०॥

मिळतां राज्य तयाला, धुंदी आली मदेंच सांबास ।

बहुविध दुष्कृत्यांसी, करिता झाला अनर्थ नगरास ॥११॥

मदिरा दारा सेवुनि, आळशि झाला करुन अन्याय ।

नाडुनि धनिकां सार्‍या, जर्जर केलें समस्त तें ठाय ॥१२॥

विप्रांचीं वतनें तीं, हिरुन त्यांना हकूनही दिधलें ।

ध्वज शत्रुजीत दोघे, बोधिति म्हणुनी प्रधान काढियले ॥१३॥

नेमी प्रधानमित्रा, होता तो दुष्टबुद्धि नांवाचा ।

वर्तति दोघे नगरीं, ऐकें इतिहास तो पुढें त्यांचा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP