मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ५

क्रीडा खंड - अध्याय ५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

विधी व्यासासी सांगतसे वृत्त ।

सृष्टि रचण्यासी जनित करी सूत ।

असे कश्यप कीं सूत तयांमाजी ।

बहुत कांता तो करित याच काजीं ॥१॥

असे आदिती ती प्रमुख सतींमाजी ।

अती सुंदर ती सुगुण गृहामाजी ।

तीयेपासुन हे जनित देव झाले ।

विनत वाणीनें पतिस काय बोले ॥२॥

मला इंद्रादी शूर वीर पुत्र ।

बहुत झाले ते असति बहू पात्र ।

परी परमात्मा सच्चिदानंद मूर्ती ।

तशी सर्वेश्वर ब्रह्मयुक्त मूर्ती ॥३॥

परात्परही वदति जिला मूर्ती ।

उदरिं माझ्या ती अजुन न ये मूर्ती ।

अशा मूर्तीचा जन्म कसा व्हावा ।

करुं कोणाची नाथ वदा सेवा ॥४॥

(गीति)

अदिती उत्सुक पाहुनि, कश्यप देई तिला जपा मंत्र ।

आधीं ॐ म्हणूनी, अंतीं पूर्ती नमः करी मंत्र ॥५॥

मधला पंचाक्षरि हा, गजाननाय प्रथीत हा मंत्र ।

योजुन जपणें साध्वी, देता झाला तिला असा मंत्र ॥६॥

मंत्रोपदेश होतां, साध्वी गेली वनीं तपासाठीं ।

शंभर वरुषें तपसा, केली खडतर सुनिश्चयें मोठी ॥७॥

सुकुमार देह तीचा, पाहुन देवांस ये तिची करुणा ।

प्रकटे तिथें प्रभू तो, भव्य असें रुप घे प्रभू राणा ॥८॥

कोटी रवी प्रमाणें, तेजस्वी अंगकांति ती होती ।

अवलोकुनी प्रभूसी, कांपे अदिती प्रभू तिला वदती ॥९॥

हे देवी तूं ज्याचें, केलें चिंतन करुन सायासें ।

तो मी संनिध आलों, मागें वर तूं मनोरथा ऐसे ॥१०॥

प्रभुचें मधूर भाषण, परिसुनि अदिती मनीं धरी धीर ।

प्रणती करुन मग ती, स्तविती झाली प्रभूस ती फार ॥११॥

सृष्टि स्थिति-लय-कारक, निर्गुण आणी अहां निराकारी ।

योगी मानस रंजन, करितां म्हणुनी सुशान्त रुप धरी ॥१२॥

प्रभुला प्रार्थुन ऐसे, वर देई तूं मदीय सुत व्हावें ।

पूर्ण करी मम इच्छा, सेवा घ्यावी मदीय ही भावें ॥१३॥

होइन कृतार्थ मी तूं, पालन करिसी समस्त संतांचें ।

लय करिसी दुष्टांचा, परिसुन विनती प्रभू वदे साचें ॥१४॥

पुत्र तुझा मी होइन, दुष्टांचा नाश मी करिन देवी ।

इच्छा पूर्ण करीं मी, देउन वर गुप्त हो प्रभू भावी ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP