मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ९१

उपासना खंड - अध्याय ९१

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

गर्वाची शिक्षा ती, झाली म्हणुनी मनांत लज्जीत ।

शेषाला नारद ते, पुसती वृत्तान्त सांगणें उचित ॥१॥

पाहुनि असें पुन्हां ते, वदते झाले तयास नारद हें ।

तुझिया संकटनाशा, उपाय कथितों करीं श्रवण तूं हें ॥२॥

जरि तूं उपाय करिसी, शिरसीं धरिसी धरा पुन्हां शेषा ।

सामर्थ्य तूज येई, ऐकुनियां धीर येतसे शेषा ॥३॥

नारद मुनीस वदला, शिरसा माझी विदीर्ण ती झाली ।

यास्तव शिरीं न सोसे, भार धरेचा अशी स्थिती झाली ॥४॥

तूं जें कथिसी मजला, करीन तें मी सुपूर्ण भक्तीनें ।

नारद सांगे त्याला, गणपति भजणें यथाविधी सु-मनें ॥५॥

नारद कथी विधी हा, शेष करी तो तपास दारुण ।

झाला मुदीत तेव्हां, वर देण्या प्राप्त तोंच हें जाण ॥६॥

ऐकुन प्रभुवचनासी, वदला तेव्हां सुभक्ति मज द्यावी ।

वाढविं शक्ती माझी, पृथ्वी शिरसीं धरीनशी द्यावी ॥७॥

जेथुन भ्रष्ट कधीं मी, नाहीं होणार हें असें स्थान ।

शिवभक्ति पूर्ण द्यावी, ऐकुन तूं तें सुभाव वरदान ॥८॥

दाखवि विराट रुपा, पाहुन मिळवी प्रसाद भक्तीनें ।

शेषें स्थापित मूर्ती, केली तिजला स्वनाम दे सु-मनें ॥९॥

धरणीधर नाम असें, दिधलें शेषें गजानन प्रभुसी ।

सुंदर मंदिर बांधुन, शेषें आराधिलें स्वयें प्रभुसी ॥१०॥

श्रीविष्णूला प्रिय हो शंकर घेई शिरावरी त्याला ।

उदरीं गणेश धरि तो, प्रेमानें त्या सुभाव शेषाला ॥११॥

शेषानें स्थापियली, मूर्ती आहे प्रवाळ नगरांत ।

विधि सांगे व्यासाला, भृगु सांगे सोमकांत हें श्रवित ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP