मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ८३

उपासना खंड - अध्याय ८३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(साकी)

पितृकार्य हें सारुन नंतर प्रश्न करी मातेला ।

आज्ञेपरि मीं क्षत्रिय सारे वधणें या कृत्याला ॥१॥

धृ०॥सुन सुन माताजी यशद करीं मम आजी ।

कृत्य असें हें करणें आहे एकवीस संख्याक ।

गोष्ट खरी पण बलाढय सारे वीर बहू संख्याक ॥२॥

कार्तवीर्य हा बलाढय आहे भीती त्या इंद्राला ।

त्यासी वधण्या उपाय कथणें विनवित मी तुजला ॥३॥

(स्वागता)

रेणुका वदलि यत्‍न कुमारा । शंकरा शरण जा सुविचारा ।

इच्छुनी तप करीं बहु भक्ती । सांब देइल तुला बहु शक्ती ॥४॥

रेणुकासुत निघे शिव सांबा । पार्वती बघतसे शिव अंबा ।

सूत तो स्तवितसे शिव देवा । पावला बघुन तो शिव भावा ॥५॥

रेणुकासुत कथी भव वार्ता । क्षत्रियां हननिची मम आर्ता ।

पूर्ण ही करुनि दे तव भक्ती । सांगती शिव तया लघु युक्ती ॥६॥

(गीति)

शंभू म्हणे तयाला, गणपति करि कार्यभाग तो साच ।

यास्तव तयास भजणें, मंत्र कथीं मी उपाय तुज हाच ॥७॥

मंत्र षडक्षर दिधला, त्यापरि तपसा करी परशुराम ।

कृष्णा-तीरप्रदेशीं उत्तरभागीं विपीन सुख-धाम ॥८॥

सकलेंद्रियें तशीं त्या, एकाग्रचि पूर्णशा मनोवृत्ती ।

करुनी मंत्र जपे तो, लक्ष मिती कीं निवान्तशा चित्तीं ॥९॥

तपसा पाहुन त्याची, प्रसन्न झाले गजानन प्रभु ते ।

प्रकटूनियांच तेथें, मागे वर तो मनोरथांपरि ते ॥१०॥

जमदग्नि-सूत मागे, वर जेव्हां त्या प्रभूस विनयानें ।

अर्पुनि परशु प्रभु मग, क्षत्रिय सारे वधी अतां यानें ॥११॥

तेव्हांपासुन म्हणती, त्या भक्ताला वरें परशुराम ।

स्थापी गणेशमूर्ती, पावन केलें असेंच तप-धाम ॥१२॥

परशूबलेंच तोडी, नृपती कर दोन ठेवुनी समरीं ।

सहस्त्रार्जुनासहित तो, निर्विर करि परशुराम एकसरीं ॥१३॥

युद्धप्रसंग झाले, संख्या त्यांची प्रसिद्ध एकविस ।

यज्ञ करुनियां मोठा, अवनी दिधली सुदान विप्रांस ॥१४॥

विधिनें व्यांसा कथिला, महिमा ऐसा गणेशभक्तीचा ।

कवनें करुन कथिला, गणेशचरणीं यथामती साचा ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP