मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ६४ - ६५

उपासना खंड - अध्याय ६४ - ६५

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(दिंडी)

जांभ नगरीचे भक्त तया दूतां ।

पुसति दूर्वा कां प्रभूस नित्य देतां ।

तयापासुन या काय लाभ होतो ।

कथा आम्हां इतिहास असे जो तो ॥१॥

दूत वदती हें भक्तगणालागीं ।

कथन करण्याची शक्ति नसे अंगीं ।

परी नारद नी इंद्र उभय भाष्य ।

कथन करुं तें ऐकणें तुम्हीं भाष्य ॥२॥

(मालिनी)

फिरत फिरत जाती नारद स्वर्गलोकीं ।

विनत मग सुरेंद्रें पूशिलें वृत्त तें कीं ।

कथित मुनि तयाला वृत्त तें साच जें तें ।

विदित करित भक्तां दूत तें पूर्ण जें तें ॥३॥

(साकी)

स्थावर नामक नगरापाशीं सुस्थल कौडिण्याचें ।

त्याचे संनिध वापी सुंदर होतें बहु कमलांचें ॥४॥

धृ० ॥ सुन सुनोजी या कथना चरित कसें हें गहना ।

हंसादिक हे जलचर पक्षी आनंदानें असती ।

त्या तीरावर जिकडे तिकडे विपूल दूर्वा रुजती ॥५॥

स्थान मनोरम पाहुन त्यानें सुंदर गणेशमूर्ती ।

स्थापित केली तेथें पूजन नेमें करीत आर्ती ॥६॥

त्याची भार्या नाम आश्रया पुसते मुनीस लीन ।

गणपतिला कां रुचती दूर्वा नाथ करा हें कथन ॥७॥

प्रियकर भाषण ऐकून सतिचें कथन करी हो तिजला ।

एके समयीं यमराजानें उत्सव स्वगृहिं केला ॥८॥

पहण्यासाठीं सुर-गंधर्वहि जमले बहुसाळ ।

आनंदानें तिलोत्तमाही नृत्य करी वेल्हाळ ॥९॥

सुंदर रुपा पाहुन यम तो मोहुनियां गेला ।

रेत स्खलतां त्यापासुनियां राक्षस निर्मित झाला ॥१०॥

भीषण रव हा ऐकुन त्याचा पीडित होती सर्व ।

नेत्रोत्पादक वन्ही जाळी पृथ्वीसुद्धां सर्व ॥११॥

(गीति)

राक्षसवधार्थ सर्वहि, विष्णूसह ते गजाननापाशीं ।

आले जाणुन तेव्हां, स्तवना करिती पदांबुजांपाशीं ॥१२॥

पाहुन भाव तयांचा, गणपति झाले लहानशी मूर्ती ।

ठाकति पुढती त्यांच्या, राक्षसहननास होतसे स्फूर्ती ॥१३॥

गणपति वदले साचे, अनलासुर पीडितो तुम्हां खास ।

त्याच्या वधार्थ मी हें, रुप धरीं हो लहानसें त्यांस ॥१४॥

सांगे उपाय तेव्हां, इतुक्यामध्यें समीप ये असुर ।

जाळित पोळित भक्षित, पाहुन हे धावती जसे समिर ॥१५॥

गणपति बालक तेव्हां, ढळला नाहीं तिथून बोटभर ।

सतिला मुनी कथी हा, भीषण दुर्धर प्रसंग हा थोर ॥१६॥

चाले असूर तेव्हां, पृथ्वी कांपे जणूंच भूकंप ।

करितो ध्वनीस तेव्हां, गडगडतें तेंचि होय हें अमुप ॥१७॥

नेत्रांतिल अग्नीनें, समुद्र झाला अ-नीरसा शुष्क ।

पण तो राक्षस येतां, बाळें गिळिला तृणापरी शुष्क ॥१८॥

बाळाच्या देहाचा, अनलासुर हा समस्त गिळिल्यानें ।

झाला बहूत दाहा, शांत करायास येति लगबगिनें ॥१९॥

मस्तक शीतळ व्हावें, म्हणून इंद्रें शिरावरी चंद्र ।

ठेवियला तो तेव्हां, बाळासी भालचंद्र नाम देतसे इंद्र ॥२०॥

विधिनें सिद्धी बुद्धी, मानसकन्या जनीत त्या केल्या ।

शीतळ शरीर करण्या, साठीं त्या गणपतीस अर्पियल्या ॥२१॥

हस्तांस शीत करण्या, विष्णूनें दीधलें कमल पाणी ।

यास्तव नाम तया दे, विष्णूची पद्मपाणि ही वाणी ॥२२॥

वरुणें शीतल करण्या, शीत अशा त्या बहूत उदकानें ।

अभिषेकिलें तरी तो, शेक न झाला कमी असा त्यानें ॥२३॥

शंभू हजार वदनें, असलेला नाग देत त्या बाळा ।

नाम तयासी दिधलें, बद्धोदर व्यालपूर्व त्या बाळा ॥२४॥

आठाधिक ऐशीं त्या, हजार मुनिंनीं जुडीच एकविशी ।

प्रत्येकीं दूर्वांची, वाहुन करिती सुशांत मुनि शिशुशी ॥२५॥

झाले प्रसन्न जेव्हां,वदले तेव्हां उपाय बहु केले ।

त्यांनीं ममांग शीतल, झालें नाहीं खरेंच ते वदले ॥२६॥

परि माझी तनु निवली, हिरव्या ओल्या प्रचूर दूर्वांनीं ।

यास्तव प्रिय मज वाटति, त्या वाहाणारे पुनीत ते नेमीं ॥२७॥

यज्ञें व्रतेंचि दानें, तैशीं तीर्थें करुन तोषविती ।

तें पुण्य त्यांस जोडे, दूर्वा वाहून नित्य मिळवीती ॥२८॥

इतुकें सांगुन गुप्तचि, गणपै झाले तिथेंच निमिषानें ।

सर्वहि देवा मिळुनी, स्मारक करिती बहूत श्रद्धेनें॥२९॥

तेव्हांपासुन देवें, अनलासुर प्रशम करुन या जगती ।

काळानळप्रशमना, धारण केलें सुनाम हें जगतीं ॥३०॥

देवांनीं तेथेंची, सुंदर मंदिर रचून तें थोर ।

स्थापुन गजाननाला, संबोधित नाम त्यास विघ्नहर ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP