मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५७

उपासना खंड - अध्याय ५७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

ब्रह्मा व्यासासि म्हणे, अणखी तुजला गणेशमाहात्म्य ।

तत्संबंधिं कथानक, ऐकावें सांगतों असे काम्य ॥१॥

मध्य-प्रदेश आहे, त्यामाजी नगर एक भरदार ।

नामें सहस्त्रपुर हें, राजाची राजधानि टुमदार ॥२॥

राजाचें नाम असे, म्हणती त्या शूरसेन हें सार्थ ।

धन-रुप-युक्त दाता, होता न्यायी तसाच परमार्थ ॥३॥

रक्षी प्रजा सुखी ती, आनंदें नांदते प्रजा सारी ।

पुण्य-प्रताप-शाली, भूपति होता तसाच हितकारी ॥४॥

शक्तित्रय षड्‌गुण हे, चतुर उपायांस जाणता चतुर ।

जिंकुन जग हें सारें, रक्षी बाळापरीस अनिवार ॥५॥

(दिंडी)

शूरसेनाची असे राजधानी ।

करित स्पर्था ती अमुरपुरा मानी ।

अशीं सारीं हीं बाह्य प्रचुर अंगें ।

असति सुंदर हीं मुनिस विधि सांगे ॥६॥

पुण्यशालिनी नाम असे भाजे ।

तिला पदवी ही पुण्यवती साजे ।

पतीसेवेसी दक्ष असे साठीं ।

महासाध्वी ही पदवि तिला मोठी ॥७॥

रुप सुंदर हें अधिक तीन-लोकीं ।

सकल युवती निस्तेज पुढें त्या कीं ।

अरुंधति ती अत्रि-मुनी-भार्या ।

अशांपेक्षांही साध्वि भूप-भार्या ॥८॥

(साकी)

एके दिवशीं शूरसेन हा बैसतसे दरबारीं ।

महाशूरसे सैनिक आणी सुज्ञ कारभारी ॥९॥

धृ० ॥सुन सुन कथनासी विधि सांगे व्यासांसी ।

यांसह पाहे राजकार्य हें इतुक्यामध्यें तेज ।

पडतां दिपले सर्वांचेही नयन कसे हे सहज ॥१०॥

त्या समयीं हें अश्रुत-पूर्वक गायन झालें ध्वनित ।

गडबडले मग लोकहि सारे आश्चर्ये कुंठीत ॥११॥

ऐसा प्रकार झाला तेव्हां शोधासाठीं भूप ।

दूत पाठवी बाह्य-प्रदेशीं विमान मोठें खूप ॥१२॥

तेजस्वी तें विमान दिसलें सुंदरसें दूतांसी ।

परंतु त्यांतिल एक दूत तो कुष्ठ असे त्यासी ॥१३॥

ऐशा दूतें विमान बघतां कुंठित गति ती झाली ।

यासाठीं तें सत्वर आलें विमान मग तें खालीं ॥१४॥

शूरसेनही ऐकुन वार्ता लगबग ये त्या पाशीं ।

कोणाचें हो विमान आहे पुशिलें त्या दूताशीं ॥१५॥

इंद्राचें हें विमान आहे कळलें त्या भूपाला ।

इंद्रादिक त्या देवांच्या मग स्तवनाला अनुसरला ॥१६॥

(गीति)

दर्शन झालें इंद्रा, सृष्टीही धन्य जाहली आज ।

मीही पुनीत झालों, दर्शन हें लाभलें मला सहज ॥१७॥

शत-यज्ञ-अश्व-मेघां, करणारा जो असेल त्याला कीं ।

इतरां दर्शन दुर्लभ, तें झालें मजसि या मही-लोकीं ॥१८॥

दर्शन झालें यास्तव, पूर्वार्जित पुण्य हें फळा आलें ।

ऐसें मजला वाटे, इंद्रा हें जनन सार्थकीं झालें ॥१९॥

कोठें गेलां होतां, जातां कोठें वदा मला देवा ।

अपुलें विमान खालीं, कां आलें सांगणें अतां देवा ॥२०॥

(शार्दूलविक्रीडित)

सांगे इंद्र तयास नारद मला सांगे मनोरंजक ।

वार्ता ही श्रवली म्हणून बघण्या गेलों असे भाविक ।

भ्रूशुंडी मुनि पाहिला परम ती भक्ती गणेशीं जडे ।

झाला यास्तव तो गणेश बरवा पाहून भ्रांती पडे ॥२१॥

जातां आश्रमिं मी मुनी उठुनियां सत्कारिलें फार तें ।

केलें मीं नमना बसून पुरिं या जातों अतां भूपते ।

स्वस्थानाप्रति मी त्वदीय नगरासंनीध आलों त्वरें ।

झालें कुंठित हें विमान गतिनें पाहोन पापी नरें ॥२२॥

बोले भूपति त्या अहो सुरवरा ज्यांचे तुम्ही दर्शना ।

झाली उत्सुक त्या भ्रुशुंडि-मुनिच्या सांगा कथा याचना ।

माझी सांग करा अशी विनति ही आहे प्रभो पावलां ।

कैसा त्या मुनिंनीं गणेश पुजिला त्यांना कसा पावला ॥२३॥

(गीति)

सुर-पति भू-पति यांचा, आहे संवाद तो बहू सुरस ।

पद्यांत गुंफण्याला, मागे मति मोरया तुझा दास ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP