मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ५३

उपासना खंड - अध्याय ५३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(मालिनी)

नळ कवण असे तो नेम हा काय काजा ।

मम कथन करा हो तात बोले बिडौजा ।

वदत विनयवाचे ऐकुनी हीमवानें ।

कथन करित वृत्ता तीस तो शांततेनें ॥१॥

निषध म्हणुन देशीं भूप हा एक होता ।

सकलगुणयुता तो शांतसा पूर्ण ज्ञाता ।

बहुत समर अस्त्रें प्राप्त तीं त्यास झालीं ।

त्रिभुवन गमनाची शक्तिही माळ घाली ॥२॥

सुरवरजनपाला वाटते भीति ज्याची ।

सति तर दमयंती सुंदरी पूर्ण त्याची ।

दमन करुन सार्‍या वस्तुही तेजयुक्त ।

जनित करि विधी हा अर्क-रुपी प्रयुक्त ॥३॥

त्रिभुवन रमणींच्या गर्व हा तेजतेचा ।

हरि सति दमयंती नाम ही सार्थ वाचा ।

नळचरित पुढें हें ऐक वत्से भवानी ।

कथित सुरस वृत्ता तूजला येथ रानीं ॥४॥

(गीति)

गुरुपरि प्रगल्भबुद्धी, नीतीशास्त्री तसाच अंगिरस ।

मेरुपरीस श्रेष्ठहि, मानस हें खोल सागरा सरस ॥५॥

ऐसा प्रधान होता, नामें तो पद्महस्त गुणराशी ।

त्यासह सभेंत बैसे, तों आले गौतमाख्य त्या पाशीं ॥६॥

स्वागत केलें त्यांचें, असनीं बसवी तयांस विनयानें ।

पूजुन यथोपचारें, येणें केलें किमर्थ हेतूनें ॥७॥

नंतर पुशिलें त्यांना, मजला वैभव कशामुळें आलें ।

तें पुण्य काय केलें, कथणें मजला नृपाळ हें बोले ॥८॥

ऐकुन प्रश्न नृपाचा, गौतम कथिती तयास वृत्तान्त ।

सांगे हिमगिरि गिरिजे, ऐकवि वृत्तान्त तो तिला तात ॥९॥

(दिंडी)

भरतखंडी हा गौड देश आहे ।

तयामाजी हें एक नगर आहे ।

नाम पिंपळपुर असे त्याचें ।

तिथें नांदे क्षत्रीयकूळ साचें ॥१०॥

तयामाजी कीं एक पुरुष होता ।

असे ज्ञानी तो शुद्धचित्त होता ।

असे अधनी तो गांजिला कुटुंबांनीं ।

म्हणुन गेला तो घोर अशा रानीं ॥११॥

फिरत असतां तो देव-वशें आला ।

कुशिकसदनाचा लाभ त्यास झाला ।

मुनिस पाहुनि तो नमित पूर्ण-भाव ।

अशिरवचनासी वदत मुनी देव ॥१२॥

करो कल्याणा गणपती तुझें कीं ।

वचन ऐकुनि क्षत्रीय तोषला कीं ।

मुनी प्रार्थुनियां पुसत उपायासी ।

कसें होइल हो दारिद्रय निरसनासी ॥१३॥

कथित त्यासी ती भक्ति गणेशाची ।

करित यजनासी मूर्ति मृत्तिकेची ।

यजन आरंभीं शुद्ध चतुर्थीस ।

सांग करणें कीं शुद्ध चतुर्थीस ॥१४॥

मास श्रावण तो भाद्रपदीं चौथ ।

नेम करणें हा एकमास तेथ ।

सफल होतिल त्या कामना तुझ्या कीं ।

कथित कौशिक हा नेम क्षत्रिया कीं ॥१५॥

विधीपूर्वक हा नेम करी भावें ।

ध्यास गणपतिचा लागला सदैवें ।

अशन शयनीं नी भोजनीं दिसे देव ।

दहन झालें दारिद्रय होत राव ॥१६॥

पूर्वजन्मीं तूं एकाग्र गणेशाचें ।

यजन केलें हें पूर्ण सुफल त्याचें ।

असें गौतम हें पूर्ववृत्त सांगे ।

नळें ऐकुन तें ईश-पदीं रंगे ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP