मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ४७

उपासना खंड - अध्याय ४७

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

गणपति म्हणे मलाही, रुचती बहु एकविंशती नामें ।

पढतां सहस्त्रनामें, तें फल लाभे समान तीं नामें ॥१॥

दिधला गजाननानें ऐकुनि वर तोषला सदाशिव तो ।

तोषुन नृत्य करी शिव, युद्धासी सिद्ध जाहला मग तो ॥२॥

माझें सहाय्य कराया, त्रिपुर हराया चला तुम्ही सर्व ।

ऐसा निरोप ऐकुनी, सत्वर ते पावले तिथें सर्व ॥३॥

ब्रह्मा कुबेर अग्नी, विष्णू यम चंद्र सूर्य गंधर्व ।

वायू वरुण यक्षहि, किन्नर आदी नवग्रही सर्व ॥४॥

त्रिपुराच्या हेरांनीं, वार्ता ही कळविली तयापाशीं ।

त्यानें सर्व असूरां, वार्ता ही कळविली त्वरें खाशी ॥५॥

वार्ता ऐकून आले, त्रिपुरापाशीं समस्त ते असुर ।

शस्त्रें तशींच अस्त्रें, बक्षिस देई तयांस तीं त्रिपुर ॥६॥

युद्धासाठीं आज्ञा, त्रिपुरें केली तयांस आवेशें ॥

कवचें घालुन अंगीं, सजले मग गर्जलेच आवेशें ॥७॥

उभय दळें तीं आलीं, गाठी पडतां परस्परें युद्ध ।

करिती तुंबळ बहु ते, शस्त्रांनीं करित तेधवां विद्ध ॥८॥

शोणितसरिता वाहे, धुमचक्रीनें उडे बहू धूळ ।

तम दाटे मग समरीं, भट लढती एकमेक ते अनळ ॥९॥

वीरांना प्राणाची, पर्वा नाहीं रणांगणीं लढतां ।

समरीं सुरसेनेच्या, पाहुन नाशास इंद्र तो शिरतां ॥१०॥

शिरतां दानव सारे, वज्राघातें बहूत ते वधिले ।

ऐसा प्रकार पाहुन, भ्याले त्यांनीं रणास सोडियलें ॥११॥

हय गज रथावरी ते,बसलेले वीर ते तळीं पडिले ।

हृदय विदारित कांहीं, विद्रित झाले असूर ते लढले ॥१२॥

पडलेले वीर पहा, रथचक्रांनीं तसेंच पादांनीं ।

हय गज चालति तेव्हां, चुरले मेले बहूत ते कदनीं ॥१३॥

एणेंपरि सुरसेना, उत्सुकतेनें बहूत ती लढली ।

ऐसी हानी त्रिपुरा, समरामाजी अतुल्य ती दिसली ॥१४॥

जिकडे तिकडे वाहति रक्ताचे पाट पाहतां त्रिपुरें ।

मंत्रुन शरांस सोडी, शक्राचें सैन्य वेष्टिलें सारें ॥१५॥

मूर्च्छित सुरदळ झालें, बाणांनीं सूर्य झांकला गेला ।

यास्तव तम दाटे शिव, पाहे तेव्हां त्रिपूर कृत्याला ॥१६॥

त्रिपुर वधास्तव केलें, कैसें साहित्य हें शिवें आंगीं ।

भूरथ करुन चक्रें, शशिमित्रांचीं अशीं रथालागीं ॥१७॥

अश्विनीकुमार यांसी, वाजी केलें रथास जोडाया ।

सारथि विधीस केलें, धनुमेरुशरहरीस सोडाया ॥१८॥

साहित्य सिद्ध केलें, प्रथमाचमनें करुन मग केला ।

प्राणायाम विधी हा, शास्त्रोक्तें युद्ध सागरीं केला ॥१९॥

गणपतिसहस्त्रनामां पठन करी मग जपेचही मंत्र ।

एकाक्षरि नामाचा, जपून धनु तें करीं शरीयंत्र ॥२०॥

नंतर षडक्षरी हा, मंत्र जपे विष्णुरुप बाणास ।

अभिमंत्रुनी तयासी सोडी शिव त्या पुनीत बाणास ॥२१॥

दिव्य प्रकाश पडला, मूर्च्छितसा त्रिपुर पावला योगें ।

पडला क्षितीवरी मग, तीन पुरें भग्नही तया योगें ॥२२॥

त्रिपुरकलेवर त्यांतून, ज्योती ती जातसे शिवा देही ।

झाला मुक्त वरानें, शिवबाणानें रिघोन शिवदेहीं ॥२३॥

झाली अकाशवाणी, करिती ते पुष्पवृष्टि सुर सारे ॥

आनंदानें गेले, सुर भूसुर ते स्वकीय वासारे ॥२४॥

अधिकार मिळे देवां, ऋषि जाती आश्रमास ते स्वकीय ।

वेदांचें पठन तसें, यजनादी चालवीत ते स्वकिय ॥२५॥

त्रिभुवन आनंदानें, शिवदेवाचा करीत उत्सव हा ।

नाम तयासी दिधलें, ’त्रिपुरारी’ जाणण्यास उत्सव हा ॥२६॥

कार्तिकमासीं करिती, चंद्राची पूर्ण तीथ ती पुनव ।

दीपोत्सवास करिती, जन सारे शोभनीय ही पुनव ॥२७॥

प्रामुख्यानें उत्सव, करिती देवालयांत सांबाच्या ।

सायंकाळीं तेथें, रंगावलि काढितात गालीचा ॥२८॥

नारी त्रिपूर लाविती, वाती त्या जोड एक सूत्राच्या ।

उपवास नेम करिती, भक्तीभावें करुन त्या साच्या ॥२९॥

झेंडूच्या पुष्पांनीं, शंकर शोभे दिसे मनोहारी ।

बाळें उडविति दारु, पाहुन शंकर मुदीतसे भारी ॥३०॥

त्रीनव पासून चारी, आर्या केल्या जनांस रंजविण्या ।

ग्रंथामध्यें नाहीं स्फूर्तीं झाली कवीस त्या करण्या ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP