मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ३९

उपासना खंड - अध्याय ३९

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

विष्णु-सुत व्यासासी, त्रिपुराचें पुढिल जाहलें वृत्त ।

त्रिपुरा प्रसन्न झाले, देव गजानन प्रसिद्ध देशांत ॥१॥

बंगाल देश आहे, त्यामाजी त्रिपुर हा वसत होता ।

केलें तपही त्यानें, तेथें त्या पावला जगत्राता ॥२॥

तेथें सुंदर मंदिर, बांधुन त्यानें सुरेखशी मूर्ती ।

काश्मीर-हीरकाची, करवुन स्थापी गणेश ती मूर्ती ॥३॥

मंदिर वेष्टित ऐसें, भव्य असे बसविलें तिथें पूर ।

फळलें स्थान म्हणूनी, गणेशपुर नाम ठेवि हें त्रिपुर ॥४॥

नंतर त्रिपुरें केली, दिग्विजयाची तिथून सुरवात ।

आधीं जग हें जिंकी, सेना चतुरंग सांग मिळवीत ॥५॥

(शिखरिणी)

कांहीं नृपाळ करिती त्रिपुरासुराचें ।

दास्यत्व जे नृप न इष्ट सुखें तयांचें ।

घेईच जीव शिरजोरपणीं प्रतापी ।

जिंकीत हें जग पुढें सुर-लोक-तापी ॥६॥

येतो त्रिपूर समजून निघेच इंद्र ।

घेऊन युद्ध-कुशलासह तो सुरेंद्र ।

ऐरावतावर बसून अशा परीनें ।

युद्धास सिद्ध करि-नायक तो त्वरेनें ॥७॥

(गीति)

त्रिपुर करि सैन्याचे, युद्धाकरितांच भाग तो तीन ।

एकेक भाग देई, होते सैनिक निपूण ते दोन ॥८॥

एका भागावरती, योजी सैनिक स्वतःच तो त्रिपुर ।

आपण स्वर्गावरती, जाई घेऊन शेष दळ-भार ॥९॥

दुसरा सैनिक नामें, योजी तो भीमकाय इह-लोकीं ।

सेनानायक केला, तिसरा तो वज्रदंष्ट्र तल-लोकीं ॥१०॥

नंदनवन इंद्राचें, विध्वंसी भीमकाय चिडवाया ।

दूतांकडून कळवी, युद्धासी सिद्ध होइ सुर-राया ॥११॥

झालें युद्ध सुरु तें, दोनींकडचे बहूत भट लढले ।

पडले रणीं बहू ते, त्रिपूराचे लोक संगरीं हटले ॥१२॥

त्रिपुरानें धीर दिला, युद्धासाठीं स्वयें पुढें झाला ।

दोघे परस्परांशीं, भिडले मग वज्र पाडिता झाला ॥१३॥

पडतां वज्र तयाचें, झाले साश्चर्य ते सकल देव ।

वज्रेंकरुन त्रिपुरें, ऐरावत मस्तकीं बळें घाव ॥१४॥

चींचीं करीत करितो, मागें फिरला रणांत ते समयीं ।

दोघे परस्परांशीं, करिती तें मल्ल-युद्ध त्या ठायीं ॥१५॥

कृष्णावतारकालीं, कृष्णाचें चाणुरासि जें द्वंद्व ।

तैसेंच शक्र-त्रिपुरा, मध्यें तें जाहलें असे द्वंद ॥१६॥

ताडिति परस्परांशीं, हृदयावरि मुष्टिंनीं बहू दोघे ।

शिरसा शिरास भिडते, तैसे कर हे परस्परें चौघे ॥१७॥

जंघां जंघांस तदा भिडती जेव्हां मधेंचि चपळायी ।

त्रिपुरें करुन तेव्हां, इंद्रासी धरियलाच कीं पायीं ॥१८॥

गरगर फिरवुन स्वकरीं, भिरकावी दूरच्या प्रदेशास ।

शोधियला देवांनीं, मूर्च्छितसा देखिला असे त्यांस ॥१९॥

सावध केलें त्याला, इंद्रासह सर्व देव हिमगिरिंत ।

लपते झाले तेथें, इकडे गेला त्रिपूर नगरांत ॥२०॥

(साकी)

नंतर त्रिपुरें आनंदानें समारंभ हो केला ।

बैसे असनीं सू-नृपतीच्या अधिकारा अनुसरला ॥२१॥

धृ०॥सुन सुन व्यासमुनी । त्रिपुरकथा ही श्रवणीं ।

देवांकडुनी अधिकारासी काढुनियां घेई ।

देई असुरां राज्यकरी ही त्रिपुर कशी नवलाई ॥२२॥

गंधर्वाचें गायन आणी चारण-स्तुति तो ऐके ।

देव-स्त्रियांना उपभोगूनी स्वर्गसुखा इनके ॥२३॥

त्रिपुरें ऐसें स्वर्गाचें हें राज्य सुखें केलें ।

विधि व्यासाला त्रिपुराचें तें वृत्त असें कथिलें ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP