मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
सिनीवाली व कुहू जननशान्ति

धर्मसिंधु - सिनीवाली व कुहू जननशान्ति

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अमावास्या तिथीचा पहिला प्रहर तो सिनीवाली व शेवटचे दोन प्रहर ते कुहू त्यांच्या मधल्या पांच प्रहरांचा तो दर्श अशीं नांवें समजावींत असें कांहीं ग्रंथकारांचें मत आहे. दुसर्‍या ग्रंथकारांच्या मतें-चतुर्दशीनें युक्त अशा अहोरात्रांत आलेली जी अमावास्या ती सिनीवाली आणि प्रतिपदा तिथीनें युक्त अशा अहोरात्रांत आलेली ती कुहू-असें आहे. या मतानें तीन दिवसांना स्पर्श करणार्‍या अमावास्येची जर दिनवृद्धि नसेल तर आणि सूर्योदयाला स्पर्श करणारा जर दिनक्षय नसेल तर दर्श नाहीं; कारण, सूर्योदयापूर्वीच्या अहोरात्रांत येणारी जी अमावास्या ती सिनीवाली व सूर्योदयानंतर जी येणारी ती कुहू. दिनक्षय असल्यास सर्व अमावास्या दर्श असल्यानें तेथें सिनीवाली व कुहू हे भाग (पडत) नाहींत; कारण, त्या दिवशीं केवळ चतुर्दशी व निवळ प्रतिपदा यांचा योग नाहीं. याप्रमाणेंच जर दिनवृद्धि असेल तर तीन दिवसांच्या स्पर्शापैकीं मधल्या दिवशीं आठ घटकांनीं परिमित अशी जी अमावास्या असते ती दर्श होय, कारण त्या दिवशीं चतुर्दशी व प्रतिपदा यांचा योग नाहीं. दिनवृद्धीच्या आधींच्या दिवसांतला भाग व पुढच्या दिवसांतला भाग हे अनुक्रमें सिनीवाली व कुहू होत. याची सर्व माहिती मयूखांत स्पष्टपणें सांगितलेली आहे. ज्याची बायको, पशु, हत्तीण, घोडी व म्हैस--हीं सिनीवालींत प्रसूत होतील, तो जरी इन्द्र असला तरी त्याच्या संपत्तीचा नाश होतो. गाय, पक्षी, मृग व दासी यांच्या प्रसूतीनेंही वित्तनाश होतो. कुहूतिथींत जर प्रसूति होईल तर, त्याचा फार मोठा दोष आहे. ज्याच्या घरीं वरच्यापैकीं कोणाचीही प्रसूति होते, त्याचें आयुष्य व धन यांचा नाश होतो. शान्ति न केल्यास जन्म झालेल्याचा त्याग करावा यांत संशय नाहीं. त्याग न केल्यानें कांहींना कांहीं तरी नाश होणार अथवा स्वतःचा (मालकाचा) तरी नाश होणार. ’सिनीवालीजननसूचितारिष्टनाशे०’ अथवा ’कुहूजननसूचितारिष्टनाशे०’ असा शान्तीचा संकल्प करावा. कुहू तिथींत जन्म झाल्यास कुहूशान्ति करुन, आणखी गोप्रसवशान्ति करावी असेंहि कांहीं ग्रंथकार म्हणतात. या दोन्ही शान्त्यांत चतुर्दशीच्या शान्तीप्रमाणें शंभर भोंकांचा एक व इतर पांच असे (सहा) कलश घ्यावे. मध्यें रुद्र ही मुख्य देवता स्थापावी. इन्द्र व पितर या पार्श्वदेवता होत. यांच्या तीन प्रतिमा कराव्या. या तिन्ही देवतांचा सर्व द्रव्यांनीं होम करावा. मुख्य देवतेच्या होमसंख्येहून पार्श्वदेवतांची होमसंख्या कमी असावी. बाकीच्या अन्वाधानांत देवतांचा ऊह (प्रयोग) चतुर्दशीशान्तीप्रमाणेंच करावा. प्रधानदेवतेची पूजा झाल्यानंतर--गाय, वस्त्र व सुवर्ण यांचीं दानें करुन--गाय, भूमि, तिळ, सुवर्ण, घृत, वस्त्र, धान्य, गूळ, रुपें व मीठ अशीं दहा दानें द्यावींत. दूध, धृत व गूळ यांचीं दानें देऊन होमाला प्रारंभ करावा. हीं दानें ऋत्विजांना द्यावींत. शेवटीं निराळी दक्षिणा देऊं नये. या प्रयोगांत गाय वगैरे सर्व दानें दक्षिणारुपच असल्यानें, निराळी दक्षिणा देण्याचें कारण नाहीं. इतर ठिकाणचीं जीं दहा दानें तीं दक्षिणारुप नसल्यानें दक्षिणायुक्त करावींत. या दानांचें प्रमाण:- भूमीचें प्रमाण गोचर्म. सात हात म्हणजे एक दण्ड; तीन दण्ड म्हणजे एक वर्तन व दहा वर्तनें म्हणजे एक गोचर्म. तिळांचें प्रमाण द्रोण, सोनें व रुपें यांचें प्रमाण--दहा मसे, पांच मासे अथवा अडीच मासे. घृताचें प्रमाण ४० पलें. वस्त्र तीन हात. धान्य पांच द्रोण. गूळ व मीठ यांचें हेंच (धान्याचें) प्रमाण. इतक्या प्रमाणांचीं दानें देण्याचें सामर्थ्य नसल्यास नित्य व नैमित्तिक कर्माच्या वेळीं यथाशक्ति दानें द्यावींत, किंवा त्या त्या दानांबद्दल सुवर्णाचें दान ’हिरण्यगर्भ०’ या मंत्रानें द्यावें. नैमित्तिकादि न केल्यास दोष आहे. अभ्युदयरुपी फळ मिळण्यासाठीं जीं दहा दानें करायचीं तीं, सामर्थ्य नसल्यास करुं नयेत असें मला वाटतें. होमाच्या शेवटीं बलिदान, अभिषेक वगैरे करावींत. याप्रमाणें सिनीवाली व कुहू यांच्या शान्तीसंबंधाचा निर्णय येथें संपला.

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP