मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
सुदामाख्यान

कीर्तन आख्यान - सुदामाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


कृष्णाचा सखा सुदामा नावाचा अति दरिद्री ब्राह्मण त्याच्या भेटीकरिता द्वारकेत गेला. तेव्हा त्याने आपल्या अतिशय गरिबीमुळे नुसते पृथुक (पोहे) त्यास नजर करण्यासाठी नेले होते, तरी भक्तांविषयी अत्यंत प्रेमळ जो श्रीकृष्ण त्याने मोठ्या आदराने त्या पोह्यांचा स्वीकार केला, व त्याबद्दल सुदाम्याला सोन्याची नगरी दिली. असे ह्या आख्यान्यात वर्णिले आहे म्हणून ह्यास पृथुकोपाख्यान हे नाव दिले आहे.

साक्या

गावी संत-चरित्रे हो ॥

तारक मधुर पवित्रे हो ॥ध्रु०॥

हरिचा सखा सुदामा ब्राह्मण निःस्पृह आत्म-ज्ञानी ॥

होता गृही यदृच्छा-लाभे परम सुखाते मानी ॥१॥

त्या विप्राची भार्या आर्या मलिना कृशा कु-चैला ॥

पति-पद-भजने सर्षप मानी भव-दुःखाभिध-शैला ॥२॥

ते एकदा पतीच्या पाशी बहु भीत भीत गेली ॥

अवाङ‌मुखी कंपित-तनु साध्वी कर जोडुनिया ठेली ॥३॥

भय-गद्गद- कंठी ते साध्वी म्हणे पतीते स्वामी ॥

श्री-पति तो स्व-सखा हे कथिता नित्य तुम्ही निज-धामी ॥४॥

भेटाया त्या दीन-बंधुला द्वारावतिला जावे ॥

गाता ध्याता परि सखयाते नेत्रे अव-लोकावे ॥५॥

भजकाला आत्माही देतो ऐसा उदार तो की ॥

दीन-जनाचा कल्प-वृक्ष ही कीर्ति तयाची लोकी ॥६॥

मोक्षहि देतो तेथे देणे अर्थ काम हे काय ॥

यास्तव जाउनि पहा कुटुंब-त्राणार्थे यदु-राय ॥७॥

देइल काही दयाळु तो प्रभु रक्षाया ही बाळे ॥

तुम्हाला स्व-सख्याचे दर्शन घडेल बहुता काळे ॥८॥

ऐसे स्त्रीचे प्रिय हित भाषण ऐकुनि मुनी सुखावे ॥

आले मनात की जाउनिया प्रभुचे पाय पहावे ॥९॥

स्त्रीस म्हणे आनंदे तो द्विज जातो सखा पहाया ॥

तच्चरणावरि निज-तनु मनही पुष्पांजळी वहाया ॥१०॥

आहे काही गृही उपायन दे हो स-त्वर आणी ॥

रिक्त-पाणिने न वि-लोकावा गुरु ऐशी स्मृति-वाणी ॥११॥

ऐसे परिसुनि भिक्षा मागुनि चार मुष्टि पृथुकांशी ॥

आणुनि बांधूनि चैल-खंडी अर्पी निज-कांताशी ॥१२॥

घेउनि मुनि तो उपायनाला बहु हर्षेचि निघाला ॥

भेटेल कसा प्रभु हे स्व-मनी चिंतित जाता झाला ॥१३॥

हरिला ह्रदयी चिंतित जाता मार्ग जाहला थोडा ॥

बहुधा केला हरि-सं-दर्शन-कामे प्रेमा घोडा ॥१४॥

अमरावती-समाना द्वारावती परी कनकाची ॥

विलोकीली दिव्य राज-धानी विश्वाच्या जनकाची ॥१५॥

काय तिची वर्णावी शोभा सत्यवती जिस लाजे ॥

मी धन्य म्हणुनी जीच्या योगे रत्नाकर बहु गाजे ॥१६॥

जेथिल लोक वि-शोक स्व-सुखे तुच्छ मानिती स्वर्गा ॥

लाजति सु-वर योगी ज्ञानी नागरिकांच्या वर्गा ॥१७॥

त्या नगरीत मुनी तो गेला जैसा वैकुंठाते ॥

ब्रह्मण्य देव-पुरीत नाही नि-रोध पळ विप्राते ॥१८॥

एकापरीस एक सु-रम्ये यादव-गृहे अ-पारे ॥

विप्रावाचुनि जेथे न शिरे आज्ञा नसता वारे ॥१९॥

त्यातहि सोळा सहस्त्र आणिक अष्टोत्तर शत गेहे ॥

स्त्री-सुत-युक्ते केली शोभित हरीने अनेक-देहे ॥२०॥

त्यातुनि एका गृहांगणी तो गेला ब्राह्मण दीन ॥

सुख पावला स्व-चित्ती जैसा ब्रह्मानंदी लीन ॥२१॥

श्री-रुक्मिणीच्या पलंगि तेव्हा होता जगन्निवास ॥

तेथे कळले की भेटाया आलासे निज-दास ॥२२॥

झडकरि उठला दयाळु मा-धव वस्त्रादिक नावरिता ॥

धावत आला पुढे रमेला सांडुनि दासाकरिता ॥२३॥

ये ये बंधो ऐसे सद्गद बोलत धावत आला ॥

कडकडुनी भुज-युग्मे स्व-सखा ह्रदयी धरिता झाला ॥२४॥

मित्रांग-स्पर्शाने झाला सुखी दयेचा सिंधू ॥

लोचन-पद्मापासूनि गळती प्रेमाश्रूचे बिंदू ॥२५॥

धरुनि स्व-सखा करी हरीने पर्यंकी बसविला ॥

सात्विक-भावे भक्ति-प्रेमा देवे बहु दाखविला ॥२६॥

जळ घाली रुक्मिणी पदांवरी मणि-कनकाच्या पात्रे ॥

प्र-क्षालन केले श्री-नाथे सुख-रोमांचित -गात्रे ॥२७॥

शंभु-शिरी ज्याचे चरणोदक, वेद जयाचे बंदी ॥

तो तीर्थ-रूप तीर्थांचाही मुनि-पादोदक वंदी ॥२८॥

गंधालेपे धूपे दीपे पुष्पे गुरू-समान ॥

ब्रह्मण्यदेव मुनिते पूजि वाढवूनी बहु मान ॥२९॥

व्यजन चामरे घेउनि हाती शैब्या घाली वारा ॥

ते परिसुनिया आला तेथे अंतःपुर-जन सारा ॥३०॥

हरि-स्त्रिया त्या म्हणति अगाई कोण विप्र हा आला ॥

जगद्गुरूसहि बला-परिस हो पूज्य कसा हा झाला ॥३१॥

कृष्ण सख्याते करी धरुनिया सांगे गोष्टी गोडा ॥

त्यांशी सर्व-रसाधिक परि ते अ-मृत न पावे जोडा ॥३२॥

देव म्हणे मी बंधो गुरुची आलो घेउनि आज्ञा ॥

सं-पादिला तदुत्तर पाणि-ग्रहण-विधी की प्राज्ञा ॥३३॥

बहुधा गृही उदासीन तुझे मन धन-वांछा काही ॥

नाही, हे मज पूर्वीपासुनि अव-गत आहे पाही ॥३४॥

परि लोकसंग्रहास्तव मीही करितो गृह-स्थ-धर्म ॥

योगचि हा फळ-वांछा टाकुनि सर्व करावे कर्म ॥३५॥

गुरु-कुळ-वास तुला स्मरतो की जेणे तरतो मूढ ॥

त्वरितचि होतो अ-क्षय-सुख-द-स्वातम-पदी आर-रूढ ॥३६॥

सांदीपनि - गुरुच्या पत्‍नीने काष्ठे आणायासी ॥

पाठविले विपिनाला स्मरते ते माझ्या ह्रदयासी ॥३७॥

गेलो आपण वनासि तेव्हा झाली अ-काल-वृष्टी ॥

कल्पक्षयचि निशा-काळी तो झाला गो-चर दृष्टी ॥३८॥

प्रातःकाळी श्री-गुरु आला आम्हा शोधायाला ॥

श्रांत शिष्य देखता स्व-ह्रदयी फार दयाकुळ झाला ॥३९॥

धरुनि पोटिशी आशीर्वादे गौरविले बहु सकळा ॥

दिल्या चतुर्दश विद्या ह्रद्या शुद्ध चतुःषष्टि कला ॥४०॥

हे सारे मजला आठवते स्मरते तुज की नाही ॥

गुरु-प्रसादे शिष्य-जनाला नसे उणे सुख काही ॥४१॥

हे ऐकुनिया तो श्री-दामा म्हणे प्रभो सर्व-ज्ञा ॥

लोक-विडंबन सारे केले वदतो करुनि अव-ज्ञा ॥४२॥

आम्हाला तारायाकरिता गुरु-कुळ-नि-वास केला ॥

तुझ्या प्रसादे या दासाचा सारा सं-शय गेला ॥४३॥

वेद-मया कल्याणाधारा जगद्गुरो तुज कवणे ॥

सर्व-ज्ञाला अ-ज्ञ-मनुष्ये काय ज्ञान शिकविणे ॥४४॥

देव म्हणे सखया मज द्याया काय उपायन आजी ॥

अणिले असेल देउनिया ते वांछा पुरवी माजी ॥४५॥

भक्ते प्रेम अणुही दिधले ते मज पुष्कळ होते ॥

बहुहि अ-भक्ते समर्पिले परि अल्पचि भासे हो ते ॥४६॥

पत्र, पुष्प, फल, जळ, जे मजला भक्त आदरे अर्पी ॥

ते विश्वात्म्याला मज बंधो सुधा-रसाहुनि तर्पी ॥४७॥

हे परिशिले परंतु स्व-मनी मुष्टि-चतुष्टय पोहे ॥

द्यावे प्रभुला हा धीर तरि त्या विप्राला नोहे ॥४८॥

सं-कोचला अधो-मुख बसला विप्र न बोले काही ॥

बुडताचि होता मुनि तो केवळ लज्जा-नदी-प्रवाही ॥४९॥

सखा कृतार्थ कराया निंद्या चिंध्या आपण पाहे ॥

पृथुक-मोटली सापडता प्रभु बहु-हर्शाला लाहे ॥५०॥

सोडुनि गांठी पृथुक-मुष्टि तो वदनी घालुनि भक्षी ॥

तो तो लाजे विप्र प्रभुच्या मुख-पद्मासि न लक्षी ॥५१॥

भूतात्म्याला मजला तर्पिति पोहे हे बहु फार ॥

याहुनि न रुचे भुवनी बंधो अन्य उपायन-सार ॥५२॥

ऐसे स्तवुनि उपायन दुसरी मुष्टि श्री-पति उचली ॥

तो रुक्मिणी धरी कर धांवुनि म्हणे मला हे रुचली ॥५३॥

द्यावा प्रसाद हा सर्वाला भक्षू वाडेकोडे ॥

सेवन करिता तुम्हाला तो हे ब्रह्मांडहि थोडे ॥५४॥

इह-पर भवज्जनाला येणे सर्वहि समृद्धि झाली ॥

पुरे मुष्टि-पृथुकांचे भक्षण ब्रह्मांडावलि धाली ॥५५॥

पोहे नेले हिरोनि भगवत-पर-पद्म-जा-सतीने ॥

प्रार्थुनि रिझवुनि हंसवुनि रमवुनि निज-पतिला सु-मतीने ॥५६॥

षड्रस-युक्ते चतुर्विधान्ने भोजन झाले राती ॥

ब्रह्माद्यलभ्य-पंक्ति लाधली दैवे विप्र-वरा ती ॥५७॥

निज-पल्यंकी मदु-शयनावरि विप्राला यदु-राय ॥

निजवुनि परमादरे हळुहळु करे चुरि मग पाय ॥५८॥

स्वर्ग-सुखाहुनि बहु सौख्याला विप्र पावला राती ॥

प्रातःकाळी उठता आ-ज्ञा मग दे कंसाराती ॥५९॥

पावित गेला दूर जगत्पति कंठ दाटला भारी ॥

मित्र-वि-योगे प्रभुच्या वाहे नेत्रांपासुनि वारी ॥६०॥

माझे स्मरण असो दे ऐसे म्हणे स-गद्गद-कंठ ॥

आलिगुनि वंदुनि विप्राला परते मग वैकुंठे ॥६१॥

ब्राह्मण देव-वि-योगे व्याकुळ होउनि सावध झाला ॥

भगवद्दर्शन-लाभ घेउनी स्वांती पुष्कळ धाला ॥६२॥

मनी म्हणे द्वि-ज मजला काही कृष्णे न दिले वित्त ॥

मी मागावे तेहि विसरलो स्व-मुखे, भुलले चित्त ॥६३॥

स्त्री परि हांसेल घरा जाता यासि करावे काय ॥

हांसो सुखे, परंतु वदान्य-श्रेष्ठ करा यदु-राय ॥६४॥

दरिद्र मी वित्ताच्या लाभे होइन मत्त उदंड ॥

आतांचेपरि मग न घडेल प्रभुचे स्मरण अ-खंड ॥६५॥

यास्तव करुणा-निधिने दुर्लभ दर्शन देउनि माते ॥

धन न दिले हे बरवे केले दीन-जनाच्या ताते ॥६६॥

असे मनी चिंतित निज-मार्गे आला स्व-गृहापाशी ॥

तो त्याच्या दृष्टीला पडला सहसा तेजो-राशी ॥६७॥

म्हणे काय हे कैसे झाले गृह जे माझे होते ॥

तेथे कैशी 'स्वर्ण-पुरी ही काय जाहले हो ते ॥६८॥

वि-स्मित होउनि पाहे तो मुनि नानोपवने रम्ये ॥

कनक-पुरीच्यामध्ये सदने रत्‍नाची अनुपम्ये ॥६९॥

नर-नारी-जन देव-समान स्वालंकृत अति गेही ॥

रत्‍न-भूषणे वस्त्रे रवि-सम दीप्ति जयाच्या देहि ॥७०॥

आला स्वामी म्हणुनि पुढे मग नागरीक जन धावे ॥

वाजत गाजत गृहासि आणिति मुनिला पुजुनि भावे ॥७१॥

देवांगना तशी शुभ-गात्री विप्राची स्त्री गेही ॥

पति आला हे परिसुनि झाली सुख-रोमांचित देही ॥७२॥

देव-स्त्री-सम दासी-शत-युत आली धावुनि दारा ॥

पतिस विलोकुनि ह्रदयी भेटे साध्वी परमोदारा ॥७३॥

नेला गेही पति निज-हस्ते धरुनि करी बहु-माने ॥

दिव्य समृद्धि विलोकुनि जाणे मुनि तद्बीज ज्ञाने ॥७४॥

म्हणे मुनी मी जन्मापासुनि दरिद्र केवळ पापी ॥

हरि-दर्शनाविणे कोण दुजा या भाग्य-पदी स्थापी ॥७५॥

महा-वि-भूति-यदूत्तम-दर्शन समृद्धि-कारण साचे ॥

काम-द मेघ-श्याम पुरवितो कामित निज-दासाचे ॥७६॥

देवाचे परि देव-प्रभुने समर्पिले मज हस्ते ॥

तीर्थ-पदे मत्पदावनेजन धरिले की निज-मस्ते ॥७७॥

केली माझी सेवा देवे निजवीले स्व-पलंगी ॥

सु-गंध-लेपन केले प्रभुने निज-हस्तचि मदंगा ॥७८॥

मज दीनांते बंधो बंधो ऐसे वदला स्वामी ॥

अन्वर्थता प्रक-कट केली की दीन-बंधु या नामी ॥७९॥

सौह्रद मैत्री सख्य दास्य त्या देवाचेचि असावे ॥

जन्मोजन्मी तद्भजनाचे प्रेम मनात वसावे ॥८०॥

केले कृतार्थ भुवन हि माझ्या सख्या मुकुंदा स्वामी ॥

तू करुणांबु-दजीवन-सुख-कर मयूर चातक आम्ही ॥८१॥

ऐसा भगवत्सखा सुदामा स्त्रीसह भजे प्रभूते ॥

इह-पर नित्यचि पवता झाला तेणे सुखे प्र-भूते ॥८२॥

दीनोद्धरण चरित्र विभूचे पावन गोड उदार ॥

राम-नंदने मयूरेश्वरे फार मानिले सार ॥८३॥

वाणी पवित्र करावयास्तव पृथुकोपाख्यान सुखे ॥

लेश-मात्र वर्णिले पुन्हा ही मयूरेश्वरेच स्व-मुखे ॥८४॥

रसिक विष्णु-भक्तांही प्रेमे शिशु-भाषण परिसावे ॥

दोष निवारुनि गुण घेउनिया स्व-सुखाने नाचावे ॥८५॥

गावी संत-चरित्रे हा ॥ तारक मधुर पवित्रे हो ॥ध्रु०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP