मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
सावित्री आख्यान

कीर्तन आख्यान - सावित्री आख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


मद्रदेशच्या अश्वपतिराजाची कन्या सावित्री ) सावित्रीदेवीचा अवतार. हिने शाल्वदेशच्या द्युमत्सेनराजाचा मुलगा सत्यवान् ह्यास वरिले. सत्यवान अल्पायुषी होता. त्याच्या मरणाच्या वेळी यम जातीने त्याचा प्राण घेऊन चालला असता, सावित्रीने त्याच्या मागून जाऊन यमास आपल्या भाषणाने संतुष्ट केले; आणि सासरा आंधळा व राज्यरहित होता त्यास डोळ्यांची व राज्याची प्राप्ति, आपल्या बापास शंभर पुत्रांची प्राप्ति, व आपणाला शंभर पुत्रांची प्राप्ति, असे वर त्यापासून संपादिले. आणि शेवटी सत्यवानाचा प्राणही परत आणिला, हे ह्या आख्यानात सांगितले आहे.

धर्म पुन्हा त्यासि म्हणे मार्कंडेया मुनीश्वरा आर्या ॥

आढळली तुज लोकी सत्त्वाढ्या आमुची जशी भार्या ॥१॥

मुनि त्यासि म्हणे होती सावित्री नाम अश्वपति-तनया ॥

तच्चरित श्रवण करी, ऐकाया योग्य साधु पतित न या ॥२॥

होय प्राप्त विधि-स्त्री-सावित्रीच्या वरेचि ती राया ॥

यत्कीर्ति जना म्हणती कर देत्ये रे अघाब्धि-तीरा या ॥३॥

झाली भक्त-सुता ती श्री-सावित्रीच उद्धरायाला ॥

श्री क्षीरधिला जन्मुनि जे दे यश तेच शुद्ध रायाला ॥४॥

अश्वपति म्हणे वत्से चिंता मज हेचि एक परमा गे ॥

झालीस दान-योग्या परि कोणीही तुला न वर मागे ॥५॥

जा शोधुनि ये वत्से वरुनि मने मानल्या कुलीनाते ॥

की तुजकडेचि आहे शत-पुत्रांचेहि गे मुली नाते ॥६॥

स्व-वर पहा जा' ऐसे योग्य जनी तोचि तीसचि वदाया ॥

गुरुच्या वचने गेली आपण घेऊनि ती सचिव दाया ॥७॥

अनु-रूप वर विलोकुनि आली तो त्या नृपा परम-हर्षी ॥

सांगत होता सु-कथा श्री-नारद जो कृपा-पर महर्षी ॥८॥

ती दोघांते वंदी तो तीस ब्रह्म-काय-भू पाहे ॥

स-स्मित असे पुसे की त्वत्तनया होय काय भूपा हे ॥९॥

कोठे गेली होती श्वशुर-गृहाहूनि काय आणविली ॥

हा ! सचिवांनी असुनी दानोचितता इची न जाणविली ॥१०॥

भू-प म्हणे परिसावे तेचि तुवा सर्वसाधु-कुल गीते ॥

म्यां पाठविले होते स्व-वर पहाया स्वये स्व-मुलगीते ॥११॥

वद वत्से, काय कसे? वर बरवा पाहिला? न लाजावे ॥

ह्या गुरूने धन्य असे म्हणुनि स्व-मुखे तुला मला, जावे ॥१२॥

सांगे ती सावित्री नृप द्युमत्सेन शाल्व-पति आहे ॥

जरि वृद्ध अंध रिपु-ह्रत-राज्य वन-स्थहि न काळजी वाहे ॥१३॥

कुल-शील-सत्त्व-गुण-निधि तो पुत्र-कलत्र-मात्र-परिवार ॥

परि वार सर्व सम त्या, की मिथिला स्वांतर-स्थ अरि-वार ॥१४॥

तो श्वशुर मानला मज, चित्ते त्याचा कुमार म्यां वरिला ॥

जरि लाजविति सख्या, अनु-सरली गौरी हरा न त्या हरिला ॥१५॥

नारद म्हणे नृपा हे चुकली योजूनि सत्यवान नवरा ॥

न वरावा जरि गुणवान योजू अन्या, असे उणे न वरा ॥१६॥

भू-प म्हणे सर्व-ज्ञा देवा उमजे असेचि सांग मला ॥

गुणवान युवा कुल-ज वर जरि तरिहि तुला अ-योग्य का गमला ॥१७॥

काय इने न धरावे अ-धन-त्वे भू-प-जन-वरा जीवी ॥

कां न प्राशावे मधु मधु-पाने कूफ-ज-नव-राजीवी ॥१८॥

मुनि सांगे वर्षांती येइल त्या भूप-पुत्रका व्यसु-ता ॥

अन्य वरू, वृतहि कच त्यजुनि वरी भू-प-पुत्र काव्य-सुता ॥१९॥

भू-प म्हणे न वरावा वत्से जरि सु-गुण-सागर लवायु ॥

शीतल मंद सु-गंधहि वद सेवावा कसा गरल-वायु ॥२०॥

ती सु-मति म्हणे ताता न त्यजुनि पयोधिला नदी परते ॥

न पतंग-चित्त-वृत्ति क्षणही रत्‍नी त्यजूनि दीप रते ॥२१॥

वरिला तो वरिलाचि, स्पर्शावा या न अन्य कायाते ॥

हा दृढ निश्चय माझा, स्तवितील कुलीन कन्यका यते ॥२२॥

आयुष्य असो किति तरि मज तदितर पुरुष तुज-समचि राया ॥

मन न चळेलचि येइल जरि चरचर हा गला यम चिराया ॥२३॥

देवर्षि म्हणे त्यासचि दे साध्वी-व्रत-परा सुता राया ॥

शुचि निश्चयाहुनि अधिक अमृत-रस नसे परासु ताराया ॥२४॥

होते सद्धर्माच्या कासेला लागता सदा शिव हो ॥

येतो, बसा, प्रसन्न प्रभु मृत्युं-जय तुम्हा सदा-शिव हो ॥२५॥

गेला मुनि जो भगवत-कीर्ति-महा-काम-धेनुचा दुहिता ॥

नेउनि दिली नृपे ती अद्विधिने सत्यवान-करी दुहिता ॥२६॥

झाली तपोवनात स्वीकारुनि वल्क तापसी ते, ते ॥

अद्बुत सत्त्व तिचे बा, तितका नव्हताचि ताप सीतेते ॥२७॥

वेद श्वशुर, श्वश्रु स्मृति, ती स्वाचार-पद्धतीच सती ॥

मुनि म्हणति या नृपाच्या उठजी सिद्धि स्नुषा-मिषे वसते ॥२८॥

तो सत्यवान म्हणे हे पितृ-राज -श्री तपोवनांत पती ॥

हो आपन्मुक्त म्हणुनि बहुधा आपणहि या मिषे तपती ॥२९॥

तत्सद्गुणे प्र-मुदुते झाली केवळ मनात न तिघे ती ॥

सकळे स-देव-तापस-वृंदेहि तपोवनात नति घेती ॥३०॥

ती स्व-मनात म्हणे तुज तनु रडविल सर्व काळ जीवा हे ॥

सोड इला वेड्या, बुध न कु-संगति धरुनि काळजी वाहे ॥३१॥

ऐसे चित्ती बोले, मोजी उर्वरित दिवस महिने ती ॥

नसते तसे तरि सुखे वय भोगुनि तदधिक श्रमहि नेती ॥३२॥

उरता चार दिवस ती करि वाचाया पति व्रतारंभा ॥

तन्नियमी प्रिय-वाक्‍ ती शुकी विलोकी न तीव्रता रंभा ॥३३॥

श्वशुर म्हणे त्रि-दिन-व्रत झाले की? वंश धन्य केला गे ॥

कर पारणा, क्षुधा बहु पूर्व-वया-माजि कन्यके लागे ॥३४॥

ती संकल्पी आहे सूर्यास्ती पारणा करायाची ॥

ऐसे श्वशुर-श्वश्रू-चरणाते जोडुनी करा याची ॥३५॥

फल-मूलार्थ निघे पति त्यासि म्हणे मजहि सत्तमा न्या हो ॥

वन पाहेन, तुम्हा हे न प्रथम-प्रार्थना अ-मान्या हो ॥३६॥

चित्राश्व म्हणे दयिते गमली वन-सरणि काय कोमळ ती ॥

श्रमशिल, शिबिका-स्थाही, दुर्ग-वन-पथांत बायको मळती ॥३७॥

उप-वास ती दिसांचा तू आधीच प्रिये सु-मृदुला गे ॥

न्यावे कसे चरण-युग नवनीता-परिसही सु-मृदु लागे ॥३८॥

मज सोसेल कशी जी न पहावे स्त्री-व्यथा नरा नीचा ॥

श्रम-दा प्र-मदा-ह्रदया कथितीहि कवी कथा न रानींच्या ॥३९॥

येणारचि तरि साध्वी श्वश्रू-श्वशुरांसी पूस मग ये, ते ॥

योग्य तुज मजहि, मानिति गुर्वाज्ञाधिक सु-बुद्धि न गयेते ॥४०॥

सावित्री त्यांच्याही आज्ञेते तत्प्रसाद साधुनि घे ॥

उठजांतूनि सतीसह वंदुनि तो स्व-पितृ-पाद साधु निघे ॥४१॥

ती न स्त्री रक्षाया त्यासि निघे आत्त-मूर्ति जनकाशी ॥

परम शिव जीत नांदे म्हणुनि जिला म्हणती सुज्ञ-जन काशी ॥४२॥

जे पक्षी जे श्वापद संघ अधिष्ठूनि कानना वसती ॥

त्यांचे तद्वचनामृत-पानार्थ पुसेल कां न नाव सती ॥४३॥

पात्र भरूनि फळांनी काष्ठे फोडी वनांत, सत्त्व-रते ॥

पाहूनि तत्कलत्रे स्मरले मुनि-वच मनांत स-त्वर ते ॥४४॥

जो साध्वी हळुच म्हणे हा नाथा नियत-मान-दा रुचिरा ॥

मूर्ति श्रमत्ये, भ्रमत्ये मति, की जी प्रियतमा न दारु चिरा ॥४५॥

तोचि म्हणे तो उठल्या करित्या स्मृति-हानि वेदना, लागे ॥

शूल-शत शिरी, जाणो सखि अ-क्षम हा निवेदनाला गे ॥४६॥

तुझिया मृदु-शीतांकी शिर ठेवुनि वाटते निजावे गे ॥

त्वत्स्पर्श अ-मृत म्हणवुनि या मत्तापे पळोनि जावे गे ॥४७॥

मांडी देउनि पतिचे मस्तक हस्त-कमळे सु-धी रगडी ॥

दे धैर्य सतीस तिचा निज-निश्चय जो खरा सु-धीर गडी ॥४८॥

सीता दश-कंठा जसि तशि सत्त्वे भी न तीव्र तापा हे ॥

तो पाश-पाणि-पुरुषा-प्रति पति-पार्श्वी पति-व्रता पाहे ॥४९॥

क्षितिवरि पति-शिर उतरुनि स-वि-नय झडकरि उठोनि कर जोडी ॥

नमुनि म्हणे देव तुम्ही, अशि कैची अन्य-दर्शनी गोडी ॥५०॥

केलेचि धन्य दर्शन-दाने येऊनि कानना माते ॥

अजि देवेश निवावे बहु हे सेवूनि कान नामाते ॥५१॥

देव म्हणे सति यम मी; का आला? न्यावया तुझ्या पतिते ॥

हे दूत-कार्य की जी; जे सेवक-कृत्य वेगळे सति ते ॥५२॥

हा सत्यवान् सु-कृतवान् गुणवान न्यावा न सेवकांनी की ॥

ज्या कर्मी योग्य-त्व स्वामीचे ते न सेवकानीकी ॥५३॥

अंगुष्ठमात्र पुरुषाप्रति यम पाशेकरूनि आकर्षी ॥

तै हाय हाय म्हणती बहु सद्गद-कंठ साश्रु नाकर्षी ॥५४॥

त्याते बांधुनि घेउनि यम-धर्म प्रभु निघे अवाचीते ॥

भ्याला सतीस बहुधा जे ब्रह्म-लिखित बरे न वाची ते ॥५५॥

त्यामागे तीहि निघे धर्म म्हणे भागलीस जा परत ॥

स्नेह-ऋण फेडिले त्वा करुनि स्व-पति-क्रिया रहा स्मरत ॥५६॥

साध्वी म्हणे प्रभो पति जिकडे जावीच मुर्ति हे तिकडे ॥

स्व-गुरु-व्रत-प्रसादे मद्गतिसि न रोधितील हेति कडे ॥५७॥

संत म्हणति सप्त-पदे सह-वासे सख्य साधुशी घडते ॥

सन्मित्रचि न व्यसनी अन्याखिल-मित्र संकटी पडते ॥५८॥

तुज संत म्हणति पितृ-पति सम-वर्ती धर्म-राज बापा, हे ॥

सत्य यश म्हणुनि याही कन्येसि दया करूनि बा पाहे ॥५९॥

ऐसे सती वदे, तो बोल शशी, देव तोहि सागर-सा ॥

प्रेमे उचंबळे हो, धरि कारुण्ये द्रवासि साग रसा ॥६०॥

धर्म म्हणे साध्वी बहु श्रमलीस स्वाश्रमासि जा मागे ॥

जो मागशील तो वर देतो, घे इष्ट ते मला मागे ॥६१॥

देवा व्हावे चक्षुस्तेजसंपन्न आश्रमा-माजी ॥

मामाजी ऐसे द्या, मति साहेनाचि त्या श्रमा माजी (झी) ॥६२॥

दिधले धर्म म्हणे परि जातचि होती तशीच मागूनी ॥

देव म्हणे पुनरपि जा वत्से घे वर दुजाहि मागूनी ॥६३॥

ती सु-मति म्हणे राज्य-भ्रंशे बहु खिन्न सासरा होतो ॥

पावुनि भवत्प्रसादे निज-पद बहु काळ सासु राहो तो ॥६४॥

होइल जा धर्म म्हणे परि करि अनु-गमन स-बहु-मान सती ॥

की जी हंसी हंसावाचुनि मानील न बहु मानस ती ॥६५॥

पुनरपि मार्गी काढी जे धर्म-रहस्य जेवि नव पुसती ॥

ते होय वशीकरणचि, की भासो दे तयाशि न वपु सती ॥६६॥

धर्म म्हणे गे बाई करिसी का व्यर्थ या श्रमास तिजा ॥

वर घे नकोचि भागो, आलीस सु-दूर, आश्रमा सति जा ॥६७॥

त्यासि म्हणे सावित्री संपन्न असो पिता सु-तनय-शते ॥

हा लक्ष्मी-सुत-कवि किति लिहिल सतीचे उमा-सुत न यश ते ॥६८॥

उडु-पा उडुसे धर्मोदार्या लाजोनि अभ्र मुरडे हो ॥

सावित्रीच्या सु-यशी न दिसे पति म्हणुनि अभ्रमु रडे हो ॥६९॥

ऐसे शिरोनि चित्ती घेउनि भारीहि तीन वर देवा ॥

सोडीना सोडविल्यावाचुनिया ती सती नवर-देवा ॥७०॥

देव म्हणे तू स्वच्छा स्व-च्छायाशीच मागती सति घे ॥

वर घेउनि जा चवथा देतो मागोनि मागतीस तिघे ॥७१॥

व्हा सु-प्रसन्न, वत्से तुज हो सुत-शत असे वदा, न्या हो ॥

सु-यशो-राशि स्वर्गी लज्जा-प्रद सुर-न-गा वदान्या हो ॥७२॥

भुलला धर्म द्युतिला धृतिला मतिला तिच्या तथा स्तुतिला ॥

न करुनि विचार जावी मागे म्हणवुनि म्हणे 'तथास्तु' तिला ॥७३॥

हळुचि म्हणे सावित्री पावेन वरेकरूनि संततिला ॥

तुमचा प्रसाद म्हणुनि प्रेमे गातील सर्व संत तिला ॥७४॥

तरि मत्पति मज द्या की तुमची पावेल मान सत्या गी ॥

यश रक्षाया प्राणहि सत्य-गुणासक्त-मानस त्यागी ॥७५॥

रोमांचित धर्म म्हणे बाई गातिल तुझा प्र-भाव सती ॥

पतिशी अ-विना-भावे वसशिल रविशी जशी प्रभा वसती ॥७६॥

राज्य चतुःशत वत्सर करिल तुझा कांत सोडिला जा गे ॥

हा स्वन्महिमा जागो सीतेने जेवि जोडिला मागे ॥७७॥

ते वृत्त वर्तमान स्वल्पहि न कळे तिच्या वरा पाशी ॥

जाता यम सावित्री धावत आली कलेवरापाशी ॥७८॥

पुनरपि तशीच बसली अंकी घेऊनिया स्व-पति-शिर ती ॥

जशि चेतना धवांगी होय इची जिवितांत मति शिरती ॥७९॥

वन-देवता म्हणति त्या बा गा मूर्च्छोत्थिता चकोरा ओ ॥

स्वस्थ, ज्योत्स्ना की हे, द्रुत उठचि, नमावया नको राहो ॥८०॥

नेत्रे उघडुनि पाहे तो दयितेच्या मुखासचि वनी, ती ॥

दे त्यासि जसि नृपासि व्यसनी देती सुका सचिव-नीती ॥८१॥

स्त्रीस म्हणे सु-भगे त्वा मृदु मांडी मांडिली उशी, रमला ॥

आत्मा निद्रेशी, रवि मावळला लागला उशीर मला ॥८२॥

पुरुष श्याम महौजा ओढित होता बळेचि मजला जो ॥

तो कोण, पुसेन तया नसता स्वप्नोत्तमर्ण मज लाजो ॥८३॥

कथिन उद्या, झाली बहु रात्रि, बळ असेल तरि उठा राया ॥

देत्ये हात, चला जी, घेत्ये फळ-भाजना कुठारा या ॥८४॥

नेत्रे पुसोनि पदरे पतिस म्हणे भेटतील मामाजी ॥

'आई' म्हणता रडता रडता दाटून का श्रमामाजी ॥८५॥

भेटवित्ये ताताला मातेला, या उठा, असे वदली ॥

आली घेउनि, अद्भुत वाटे कलभाशि सावरी कदली ॥८६॥

आला प्रकाश नेत्री, अंध-त्वाचा वरे नुरे गंध ॥

परि भूप पुत्र-मोहे केला पहिल्यापरीसहि अंध ॥८७॥

त्याला म्हणती गौतम दाल्भ्य भरद्वाज धौम्य तापस हा ॥

बा गा उगा मुहूर्तोपस्थित दुर्दैव-दत्त ताप सहा ॥८८॥

सावित्री शुभ-लक्षण गुण-संपन्ना महा-सती बा हे ॥

जी जी साध्वी स्व-ध्वानुमते द्वास्था महास ती बाहे ॥८९॥

वाखाणिति बहु पाहति मुनि-दारहि भासुर-व्रत तिला जे ॥

साध्वीच देवता ही साध्वीला बा सुर-व्रतति लाजे ॥९०॥

शोके रडता डोळे जावे, गेले कधी न यावे गा ॥

दिसते कल्याण पुढे, होऊचि नको अधीन या वेगा ॥९१॥

ऐसे समजावित त्या राजाला जो दया-पर महर्षी ॥

तो झाले अवलोकुनि सावित्री-सह तया परम हर्षी ॥९२॥

मुनि म्हणती हा आला नेत्रे उघडुनि पहा स-दारा या ॥

मोठा भाग्याचा तू प्र-मुदित यांसह रहा सदा राया ॥९३॥

दे आलिंगन, अंकी घे, मस्तक-पद्म हुंग, वाराया ॥

आत्मात्म-ज-तापाते दे आशी राज-सत्तमा राया ॥९४॥

पुसता विलंब-कारण चित्राश्व म्हणे शिरो-व्यथा-शयन ॥

मुनि म्हणति हे नव्हे, वद वत्से, हो तूचि आमुचे नयन ॥९५॥

सावित्रीने कथिले ते वृत्त अ-शेष साधु-सद नमुनी ॥

तेव्हा झाले अ-तुल प्रीति-क्रीडेशि केलि-सदन नमुनी ॥९६॥

मार्कंडेय म्हणे बहु वर्णावे काय जेवि शिव-सेवा ॥

मज काळापासुनि तशि मुक्त करी त्याशि ती मनु-ज-देवा ॥९७॥

दुसरे दिवशी प्रकृति प्रार्थिति येऊनि आपुल्या पतिते ॥

या राज्य करा, सचिवे वधिला हरिली स्व-भूमि ज्या पतिते ॥९८॥

मुनि म्हणति अनुभवावे स्वस्थ-मने राज्य-पद नता राया ॥

न तपोवन वर तुज बहु सावित्री-युक्त सदन ताराया ॥९९॥

सिंहासनी बसविला सावित्रीच्या व्रतेचि, हा नियम ॥

वर-सामर्थ्य म्हणा परि गेला होता करूनि हानि यम ॥१००॥

सावित्रीने केला उभय-कुलोद्धार हा असा राजा ॥

कृष्णाहि अशीच, स्तुति येती न मुखाशि या अ-सारा जा (ज्या) ॥१०१॥

राम-घन-मयूर म्हणे निववालचि सु-रसिकांशि केकाहो ॥

शंभुहि म्हणे न सेविति मंद म्हणुनि झुरसि काशिके का हो ॥१०२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP