मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
कचोपाख्यान

कीर्तन आख्यान - कचोपाख्यान

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


पूर्वी देव आणि दैत्य ह्यांच्या लढाया होत असता युद्धांत मरण पावलेल्या दैत्यांस त्यांचा गुरु शुक्राचार्य हा संजीवन-विद्येच्या
योगाने पुन्हा जिवंत करी; पण ती विद्या देवांचा गुरु बृहस्पति ह्यास येत नव्हती, म्हणून देवांकडील योद्धे मरत. म्हणून सर्व देवांनी बृहस्पतीचा मुलगा कच हा शुक्राकडे गुरुसेवेच्या मिषाने ती विद्या शिकण्याकरिता पाठविला. त्याला ती विद्या त्यापासून कशी प्राप्त झाली हे ह्या आख्यानात वर्णिले आहे.

जनमेजय-नृपति पुसे वैशंपायन कथी स-विस्तर, ते ॥

बहु, मी लेशचि गातो, जग लेशेही महद्यशे तरते ॥१॥

झाला ययाति कविचा जामाता, तीच सत्कथा परिसा ॥

या चरितामृत-पाने या लोकी सर्व रसिक हो हरिसा ॥२॥

देवांच्याही जे जे भट होती संगरात असु-रहित ॥

संजीविनी-बळे त्या उठवि करी काव्य नित्य अ-सुर-हित ॥३॥

ती विद्या सुर-गुरुला अव-गत नव्हती म्हणूनि समरात ॥

बहु मरते, ते पाहुनि न टिके उत्साह धैर्य अ-मरांत ॥४॥

ती विद्या साधाया देवांनी सद्विचार आठविला ॥

शुक्राकडे स्व-गुरु-सुत कच विनवुनि कथुनि युक्ति पाठविला ॥५॥

शिष्यत्वे जाउनि कच सांगे गुरु-दास्य-काम पद नमुनी ॥

प्र-णती शत्रु-सुतींही द्रवला तो सु-प्रसन्न-वदन मुनी ॥६॥

आराधिला कचे गुरु, गुरुची कन्याहि देवयानी ती ॥

झाली प्रसन्न स-त्वर शिकविति तैशीच देव या नीती ॥७॥

अ-सुर म्हणति विद्येने प्र-बळ करायास देव या नीचे ॥

मन मोहिले गुरूचे गुरु-चित्ताहूनि देवयानीचे ॥८॥

गुर-गो-रक्षण करिता देव-द्वेषे हरूनि असु-रानी ॥

कच-मांस मृगांसि दिले वाटुनि भक्षावयासि अ-सुरांनी ॥९॥

गाई गृहासि आल्या मावळला रविहि कच न आढळला ॥

तेव्हा सोडुनि धृति-नग शुक्र-सुता-बुद्धि-भूमिला ढळला ॥१०॥

शुक्र-सुता गहिवरली न्हाणी तदुरस्थळासि अश्रु तिचे ॥

कवणाला न प्रिय ते गुण-मणि-मय केलि-मंदिर श्रुतिचे ॥११॥

तातासि म्हणे आला नाही अद्यापि कच, नसे अवधी ॥

लव धीर बुद्धि न धरी माझी, ताता सु-निष्ठुरा तव धी ॥१२॥

येता मघाचि असता जरि कुशली, करिति खल अघा, बरवी ॥

गति न दिसेचि कचाची, कुशलि-जन-विरह असा न घाबरवी ॥१३॥

कच आजि न येता मी प्राण त्यागीन न भरता घटिका ॥

आण तुझी जाण खरे केला निश्चय नव्हेचि हा लटिका ॥१४॥

काव्य म्हणे धीर धरी, आहे सं-जीविनी सुधा-धारा ॥

उठवूनि आणितो कच चिंतुनि विश्वं-भरा बुधाधारा ॥१५॥

मंत्र-जप करुनि तो कवि ये रे वत्सा कचा असे बाहे ॥

भेदुनि वृकोदरे पल सर्व निघे त्यांत लेशहि न राहे ॥१६॥

होता तसाचि झाला उठला आचार्य-देव तारी, ती ॥

शक्ति तशीच निरुपमा, भिन्ना गुर्वन्य-देवता-रीती ॥१७॥

कच येता बहु हर्षे धन्य म्हणे मीच कन्यका, माते ॥

वांचविला त्वांचि दिला हा, देइल कोण अन्य कामांते ॥१८॥

पुसता वध-वृत्त कच स्व-गुरु-सुतेला समस्त आयकवी ॥

प्रार्थुनि म्हणे उगी, हा स्वस्ति असो सर्व-विप्र-राय कवी ॥१९॥

त्यावरि गुरु-कन्योक्ते पुष्पे आणावयासि जाय वना ॥

सांपडला त्या अ-सुरा कच जैसा वत्स एकला यवना ॥२०॥

पुनरपि त्या पापांनी सद्विप्र-कुमार चरचरा चिरिला ॥

भय न धरिले तिळहि त्या पापाच्या जोडिता महा-गिरिला ॥२१॥

खंड तिळ-प्राय करुनि नेउनि केले नि-मग्न जळ-धीत ॥

नाहीच धर्म करुणा पाप-भय विचार-लेश खळ-धीत ॥२२॥

जो मुनि तयासि कन्या प्रिय-काम दयाळु काव्य तो तारी ॥

रज गोळा करुनि घडी शिष्याची मूर्ति जेवि वोतारी ॥२३॥

पुनरपि तो कच वधिला केला तद्देह दग्ध रुष्टांनी ॥

शुक्रासि पाजिले हो तद्भस्म सुरा-रसांत दुष्टांनी ॥२४॥

कच न दिसता रडे सुर-यानी, तीते पिता म्हणे का गे ॥

वत्से रडसी, ऐसे पुसता तैसेच ती पुन्हा सांगे ॥२५॥

शुक्र म्हणे वत्से मी वाचवितो परि पुनः पुन्हा मरतो ॥

आग्रह धरूनि म्हणसी प्रेत-गति गतहि कच पुन्हा परतो ॥२६॥

त्यज शोक, मत्प्रसादे तुज काय उणे, मुली नकोचि रडो ॥

दाटुनि माथा वाहुनि दुर्वह दुःखाद्रिला नको चिरडो ॥२७॥

ती तातासि म्हणे कच गुरु-भक्त कुलीन साधु-कार्य कर ॥

जरि त्यासि सोडिले जल तरि जल सोडू मलाहि आर्य-कर ॥२८॥

ब्रह्म-घ्ना शिष्यांची भीड धरुनि साधु शिष्य मोकलिला ॥

म्हणतिल न ऐकवे ते न स्व-हित कची असे गमो कलिला ॥२९॥

स्व-मनि म्हणे कवि-सत्तम मळवावे पंडिते न यश, हणी ॥

प्राणाचीहि बरी परि न यशाची, सांगती नय शहाणी ॥३०॥

मग मेळवी महात्मा एकत्र समस्त अ-सुर, कोपाने ॥

खवळे प्रि-पुत्र-भसित-मिश्रित-मधुच्याहि तज्ज्ञ तो पाने ॥३१॥

अ-सुरांसि म्हणे का रे नेणा अद्यापि मत्तपा, मरतो ॥

की वाचतो पतंग न भी जो ज्वलनासि मत्त पामर तो ॥३२॥

विप्र अ-वध्य म्हणे श्रुति हाणोनि तिच्याही लात हाकेला ॥

कच-हनने सुर-गुरुचा न तुम्ही माझाचि घात हा केला ॥३३॥

ब्राह्मण कणसा खुपतो तुमच्या नेत्री नसो सवे काढा ॥

युक्तचि मरणाराला हित-परिणामहि न सोसवे काढा ॥३४॥

धिक्कारुनि अ-सुरांते धर्मचि तो अमृतमय-वचा शिकवी ॥

बाहे करुणा-विद्या-दिव्य-तपस्या-बळे कचाशि कवी ॥३५॥

जो गुरु वत्स कच म्हणुनि एहि असे तो म्हणावया योजी ॥

तो विद्या-सामर्घ्ये उपजूनि गुरूदरी म्हणे वो जी ॥३६॥

उदर-प्रवेश पुसता झाला तो पुण्य-राशि शुक्र मुनी ॥

सांगुनि खळ-कपत म्हणे एथ वसो काळ हा शिशु क्रमुनी ॥३७॥

निर्भय वसेन काळ क्रमुनि पवित्रोदरी असाचि सुखे ॥

न हित गुरूदर-दारण निघता मज निंदितील साधु-मुखे ॥३८॥

शुक्र म्हणे वत्से कच कुक्षि विदारुनि निघेल बाहेर ॥

हा तरलाचि परि तुझे या कु-व्यसनी बुडेल माहेर ॥३९॥

सुरयानी त्यासि म्हणे वदता हे अ-शुभ काय हो तात ॥

व्हावे दोघेहि मला चिंता-मणि हेचि पाय होतात ॥४०॥

तारुनि शिष्यासि तरो गुरु, म्हणत्ये पात्र कन्यकान्या या ॥

नोहे वरासि वर-दा, जाणसि तू सु-ज्ञ-नायका न्याया ॥४१॥

भीड सुतेची भारी विद्या संजीवनी कचा शिकवी ॥

गुरुलाहि वाचवाया योग्य करी सज्जना कचाशि कवी ॥४२॥

गुरु-कुक्षि विदारुनि कच बाहेर निघे परंतु बहु तो भी ॥

उठवुनि गुरु संकोचे नमुनि रडे, कुल-ज-कीर्तिचा लोभी ॥४३॥

कच-घातकासुरांते सुरयानीचा स्वये जनक दापी ॥

की जो ब्रह्म-द्वेष्टा कुशल न पावेल तो जन कदापी ॥४४॥

समजा बरे जसा मी विप्र गुरु तसाचि हा कच, पळाला ॥

ब्रह्मांडातुनि जरि रिपु वधिन न देतांचि हाक चपळाला ॥४५॥

अ-सुरांसि करुनि शिक्षा बाहु उभारुनि म्हणे अहो कानी ॥

ध्यावे माझे हित-कर मर्यादा-वचन साधु लोकांनी ॥४६॥

जो विप्र आजपासुनि मद्य-प्राशन करील तो पापी ॥

ब्रह्म-घ्ना-सम निश्चित असि मर्यादा स्वये कवि स्थापी ॥४७॥

वर्षै सहस्त्र होता कच गुरु-सेवेत, मग तया प्राज्ञा ॥

शक्रे बहु संतोषे दिधली जाया पित्याकडे आज्ञा ॥४८॥

कच सिद्ध होय जो तो शुक्र-सुता त्या मनोहरा उचिता ॥

स्व-कर-ग्रहार्थ विनवी बहु आवडली सु-विद्यता शुचिता ॥४९॥

जे गुरुचे तेच तिसी पूज्यत्वाचे धरूनि कच नाते ॥

ठेवूनि दृष्टि धर्मी तो न तिच्या मान्य होय वचनाते ॥५०॥

पडता गळा म्हणे कच भगिनीला वरुनिया न भाउ तरे ॥

करिता अ-धर्म सद्यः स्व-पित्रु-सुह्रज्जन-मुख-प्रभा उतरे ॥५१॥

सुख व्हावे तरि धर्माप्रति म्हण माथा वसे नसे दूर ॥

पूजा कैची लोकी जरि दगड शिरी धरी न सेंदूर ॥५२॥

धर्म अनंत असो परि तो करिता कीर्तन स्वसे वेचे ॥

सांग प्रकार याहुनि दुसरे काही मज स्व-सेवेचे ॥५३॥

ज्या उदरी वास तुझा तेथे माझाहि हे असे नाते ॥

केवि कर-ग्रहण करू सं-मत धर्मासि जे असेना ते ॥५४॥

बहु दिवसांची आशा तत्काळ च्छेदिता कचे, रुष्टा ॥

शुक्र-सुता त्यासि म्हणे, 'रे कपट-पटो भला भला दुष्टा ॥५५॥

'ऐक कृत-घ्ना जरि मी उठवाचि मदर्थ या हता शत-दा ॥

ऐसे गुरुस न म्हणते कैसा उठतास तू हताश तदा ॥५६॥

तू मलिन कुटिल नीरस जडहि पुनर्भवपणे हि कचसा च ॥

धरिला शिरीहि न स्व-प्रकृति-गुण त्यजसि नाम कच साच ॥५७॥

न करी वि-फळ मदाशा आशा भंगू स्येचि साधूंनी ॥

जरि भंगिसील, विद्या सिद्ध नसो जीस नेसि साधूनी ॥५८॥

कचहि म्हणे गुरु-वेदानुज्ञा नाही म्हणोनि या कर्मा ॥

मान्य नसे, हू शापी कीर्ति-करचि शाप न चुकता धर्मा ॥५९॥

पढवीन ज्यासि विद्या ही त्यासि फळेल, तूहि घे शाप ॥

तुज कोणीही ऋषि-सुत न वरिल, फळो तुझे तुला पाप ॥६०॥

जाता स्वर्गी मिरवित निज-गुरु-सुत-रत्‍न देव-यानी ते ॥

वर्णिति दैत्यांते किति, किति कविते, कितिक देवयानीते ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP