मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
कां बा रुसलासी कां बा न ब...

मोरया गोसावी - कां बा रुसलासी कां बा न ब...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


कां बा रुसलासी कां बा न बोलसी ॥

निष्ठुर झालासी तूं कां बा मजसीं ॥

तूं बा न बोलसी आतां काय करुं ॥

बहुत श्रमलों कोणीकडे जाऊं ॥१॥

बहुत अपराध कीती काय सांगूं ॥

संख्या नाहीं बहुत अन्याया ॥

जरी धेनू टाकी वत्सलासीं ॥

तेणें आस करावी कवणाची ॥२॥

ऐसी उपमा तूज काय सांगूं किती ॥

व्यापक आहेसी तूं बा मंगलमूर्ती ॥

दुष्ट भोग आहेत प्रपंचीं ॥

सोडवी आतां मज चुकवीं यातायाती ॥३॥

किती भोग भोगुं मी वेरझारा ॥

कृपा (दया) करी तूं माझी बा लवकरी ॥

आतां भोग हे किती म्यां भोगावे ॥

विनंती करितों तुज एक भावें ॥४॥

मन वेधलें एका घरदारीं ॥

मोहपाश तोडावा लवकरी ॥

पुत्र कलत्र धन हें नलगेची ॥

जोडी द्यावी आपुल्या (चरणाची) पायांची ॥५॥

ऐसी करुणा तुज भाकीतों दयाळा ॥

आस पूरवी तूं माझी एकवेळा ॥

आस तुझी बा लागली बहुत ॥

अंगीकार त्वां केला पुर्वीच ॥६॥

बहुत अन्याय क्षमा करी मज ॥

कोप न धरी तूं विनवितों तुज ॥

तूं जरी कोपलासी जावें कवणापाशीं ॥

मायबाप सखा (स्वामी) माझा होसी ॥७॥

मोरया गोसावी जोडले (आह्मासी) भक्तांसी ॥

तों तुं एकरुप भासलें मनासीं ॥

विनवि दास ह्मणें चिंतामणी ॥

तनुमन वेधलें तुझ्या बा चरणीं ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP