मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मोरया गोसावीची पदे|
पतित पावन सुंदरा ये ये हा...

मोरया गोसावी - पतित पावन सुंदरा ये ये हा...

श्रीमन्महासाधु मोरया गोसावी यांची प्रासादिक, भक्तिज्ञान व वैराग्यमुक्त अशी भजनांची पदे श्री क्षेत्र मोरेश्वर, चिंचवड व अष्टविनायकांच्या स्थानी देवास आळविण्याकरिता म्हणतात.


पतित पावन सुंदरा ये ये हा श्री मोरेश्वरा ॥

दाखवी चरण उदारा धावे दातारा ॥

धांव रे पाव रे मजला ये ये हा येई दयाळा ॥

न येसील तरी तुझी लाज तुजला ॥१॥

हृदई माझ्या राहावें ये ये हा सनाथ करावें ॥

जन्मो जन्मीं उद्धरावें दास ह्मणावें ॥

निढळावरी बाह्य ठेवितां ये ये हा वाट पाहतां ॥

मज रे तुझि आस आतां शिणलो आतां ॥२॥

बहुत दिवस जाले तूं ये ये हा येई गणपती ॥

दाखवी चरण मजप्रति फिटेल रे भ्रांति ॥

करुणा वचनी विनवितो ये ये हा दास ह्मणवितो ॥

सकळ हो अन्याय क्षमा त्वां करावें आतां ॥३॥

शरीर भोग भोगीले ये ये हा कष्ट हे जाले ॥

कधी तूं पावसि माऊले धावे दयाळे ॥

आतां मज न उपेक्षी ये ये हा कोण रे रक्षी ॥

चरण तुझेचि लक्षी तुचि रे साक्षी ॥४॥

अंत माझा न पाहावा ये ये हा येई तूं देवा ॥

क्षणभर ऊशीर न लावावा धांवे बा देवा ॥

बहुत दिवस लेखितां ये ये हा कंठेना आतां ॥

धाडी मुळ मज ने आतां सोसेना आतां ॥५॥

नको देऊं यमा हाती ये ये हा दास तुझा रे ॥

लाज तुझी तुज रे कठीण नोव्हे रे ॥

कठीण तूं मज झालासी ये ये हा माये तूं कैसी ॥

ब्रीदावळी साच न करिसी जाऊं कोणापासी ॥६॥

आतां एक विनंती ऐकावी ये ये हा दास म्हणवावें ॥

जन्मो जन्मीं उद्धरावें चरणीं ठेवावें ॥

चिंतामणी दास विनवी ये ये हा भक्ती ही द्यावी ॥

भक्तीवीण उद्धरावें हेची तारावें ॥ पतित पावन सुंदरा०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP