मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
ग्रहणनिर्णय

धर्मसिंधु - ग्रहणनिर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


चंद्रग्रहण अथवा सूर्यग्रहण जोपर्यंत डोळ्यांनी दिसत असेल तोपर्यंत पुण्यकाळ असतो. चंद्रबिंब अथवा सूर्यबिंब ग्रस्त असताना जर एखाद्या ठिकाणी अस्त पावेल, तर त्यानंतर दुसर्‍या ठिकाणी ते ग्रहण दिसेल; पण पहिल्या ठिकाणी ते ग्रहण डोळ्यांनी दिसत नसते म्हणून, अस्तानंतर तेथे पुण्यकाल नसतो. त्याप्रमाणे दोहोंपैकी कोणचेही बिंबजर ग्रहण लागलेल्याच स्थितीत उदय पावेल, तर उदयाच्या आधी पुण्यकाल नाही. ढगांमुळे जर डोळ्यांनी ग्रहण दिसत नसले, तर शास्त्ररीत्या स्पर्शकाल व मोक्षकाल ही समजून घेऊन, स्नानदानादिक कर्मे करावीत. रविवारी सूर्यग्रहन आणि सोमवारी चंद्रग्रहण अशी जर असतील तर त्यांना चूडामणिग्रहण असे नाव आहे. अशा ग्रहणात दानादिक केले असता अनंत फळ मिळते. ग्रहणाच्या स्पर्शकाली स्नान, मध्यकाळी होम, देवार्चन आणि श्राद्ध व सुटत असताना दान आणि सुटल्यानंतर स्नान अशी कर्मे क्रमाने करावीत. आंघोळीला पाणी घेण्याविषयी कमी-अधिकपणा-कढतपाण्यापेक्षा थंड पाणी पुण्यकारक. दुसर्‍याने दिलेल्या पाण्यापेक्षा स्वतः घेतलेले पुण्यकारक. पाणी वर काधून स्नान करण्यापेक्षा भूमीत असलेल्या पाण्याने स्नान करणे पुण्यकारक. त्यापेक्षा वाहाते पाणी पुण्यकारक. वाहात्या पाण्यापेक्षा सरोवराचे पाणी पुण्यकर. सरोवराच्या पाण्यापेक्षा नदीचे पुण्यकर. याप्रमाणेच तीर्थे, नदी, गंगा व समुद्र यांचे पाणी एकापेक्षा दुसरे अधिक पुण्यकर. ग्रहणांत वस्त्रासह स्नान करावे. अशा स्नानाला काही ग्रंथकरांनी मुक्ति स्नान म्हटले आहे. ते मुक्तिस्नान जर केले नाही, तर सुतकीपणा जात नाही. ग्रहणाच्या स्नानाला मंत्राची जरूरी नसते. सवाष्णींनी गळ्याखालून स्नान करावे. शिष्टांच्या बायका ग्रहणात डोक्यावरून स्नान करतात. सोयर अथवा सुतक यामध्ये ग्रहणाबद्दल-स्नान, दान, श्राद्ध वगैरे अवश्य करावीत. नैमित्तिक स्नान करण्याचा जर प्रसंग आला, आणि बायको जर विटाळशी असली. तर भांड्यात पाणी घेऊन, त्याने स्नान करून व्रत करावे. वस्त्र पिळू नये व दुसरे नेसू नये. तीन दिवस किंवा एक दिवस उपास करून ग्रहणाची स्नानदानादि कर्मे केली असता मोठे फळ मिळते. एकच दिवस जर उपास करणे असेल, तर तो ग्रहणाच्या आदल्या दिवशी करावा असे कोणी ग्रंथकार म्हणतात व कोणी ग्रंथकार ग्रहणासंबंधाचा उपास अहोरात्र करावा असेही म्हणतात. मुलगे असलेल्या व गृहस्थाश्रमी अशांनी ग्रहण, संक्रांति वगैरे दिवशी उपास करू नये. पुत्रवान् या शब्दाचा अर्थ काही ग्रंथकार कन्यावान असा करून, तशांनीही उपास करू नये असे म्हणतात. ग्रहणात देव आणि पितर यांचे तर्पण करण्यास काही ग्रंथकारांना सांगितले आहे. 'सर्व वर्णांना राहुदर्शनाचे सूतक आहे' म्हणून ग्रहणकालात स्पर्श झालेली वस्त्रादिके पाण्याने धुऊन शुद्ध करावीत. गाई, भूमि, सोने, धान्य वगैरेचे जर ग्रहणांत दान केले, तर त्याचे महाफल आहे. तप आणि विद्या या दोहोंनी युक्त असणारा जो ब्राह्मण, तो दानपात्र होय. सत्पात्री दानाचे मोठे पुण्य आहे. 'चंद्र-सूर्याच्या ग्रहणात सर्व पाणी गंगेप्रमाणे, सर्व ब्राह्मण व्यासांसारखे आणि सर्व दाने भूमिदानासारखी असे जे वचन आहे, ते सामान्य पुण्याच्या अभिप्रायाचे आहे; म्हणून 'ब्राह्मण नसलेल्या दिलेल्या दानाचे फल सम, ब्राह्मणब्रुवाला दिलेल्याचे दुप्पट फल, श्रोत्रियाला दिल्याचे लक्षपट फल आणि सत्पात्राला दिल्याचे अनंत फल' असे कमी अधिक फळ सांगितले आहे. संस्कार वगैरे ज्याचे झालेले नाहीत असा फक्त जातीने जो ब्राह्मण त्याला अब्राह्मण म्हणावे. अशाला दान केले असता, वर जे सांगितले तेच फळ मिळते. गर्भाधानादि संस्कार झालेला पण वेदाध्ययन, वेदाध्यापन, इत्यादिकांनी रहित, असा जो तो नावाचा ब्राह्मण, त्याला ब्राह्मणब्रुव म्हणतात, अशाला दान केले असता दुप्पट फळ मिळते. वेदाध्ययनादिकांनी जो युक्त त्याला श्रोत्रीय म्हणतात; अशाला दान केले असता हजारपट फळ मिळते. विद्या, सदाचरण वगैरेंनी जो युक्त तो सत्पात्र; अशाला दान केले असता अगणितपट फळ मिळते. याप्रमाणे वरच्या वाक्याचा अर्थ जाणावा. ग्रहणांतले श्राद्ध करायचे ते आमान्नाचे अथवा हिरण्यरूपी करावे. श्रीमंताने पक्वान्ने करून करावे. सूर्यग्रहणांत तीर्थयात्रांगश्राद्धाप्रमाणे ज्यात तूप मुख्य आहे अशा अन्नाने श्राद्ध करावे. ग्रहणात श्राद्धाला जेवणारा महादोषी होतो. श्रीमंताने ग्रहणांत तुलादानादिक करावे. चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रहणात तीर्थाचे ठिकाणी महापर्वकाळी मंत्राची जर दीक्षा घेणे असेल, तर महिना, नक्षत्र वगैरे शोधण्याची जरूरी नाही. मंत्रदीक्षा घेण्याचा प्रकार तंत्रग्रंथात पाहावा. दीक्षा शब्दात उपदेशाचा अन्तर्भाव होतो. युगायुगात दीक्षा होते आणि कलियुगात उपदेश होतो. मंत्र घेण्याच्या कामी सूर्यग्रहणच मुख्य आहे. चंद्रग्रहणात जर मंत्र घेतला, तर दारिद्र्यादिक दोष प्राप्त होतात असे कोणी सांगतात. 'आधी उपास करून, चंद्रसूर्याच्या ग्रहणांत स्नान करावे; आणि स्पर्शकालापासून मोक्षकाला पर्यंत एकाग्रचित्ताने मंत्राचा जप करावा, मग जपाचा दशांश होम करावा, आणि नंतर होमाचा दशांश तर्पण करावे. होम करण्याचे सामर्थ्य नसल्यास, होमसंख्येच्या चौपट जप करावा.' मूलमंत्राचा जप करून, त्याच्या शेवटी द्वितीया विभक्त्यंत असा मंत्रदेवतेच्या नावाचा उच्चार करून,

'अमुकदेवता तर्पयामि नमः'

असे मोठ्याने म्हणावे. यवादियुक्त अशा पाण्याच्या ओंजळींनी होमाच्या दशांशाने तर्पण करावे. याप्रमाणे 'नमः' पर्यंत संपूर्ण मूलमंत्राचा उच्चार करून, अमुक देवतेला मी अभिषेक करतो असे म्हणून तर्पणाच्या पाण्याने आपल्या स्वतःच्या मस्तकावर अभिषेक करावा. याप्रमाणे तर्पणाच्या दशांशाने मार्जन करावे व तर्पणाच्या दशांशाने ब्राह्मणभोजन घालावे. याप्रमाणे- जप, होम, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मणभोजन हे पाच प्रकारांच्या रूपाचे पुरश्चरण होय. तर्पण वगैरे करणे जर अशक्य असेल, तर त्या त्या संख्यांच्या चौपट जप करावा. हा जो पुरश्चरणाचा प्रकार सांगितला, तो ग्राससहित उदय अथवा अस्त पावणार्‍या ग्रहणांत होत नाही. पुरश्चरणसंबंधाने जो उपास करावयाचा, तो पुत्रवान आणि गृहस्थाश्रमी यांनीही करावा. पुरश्चरण करणार्‍याच्या नित्य नैमित्तिक स्नानदानादिकांचा जर लोप होईल, तर दोष सांगितला असल्याने, स्नानदानादिक कर्मे मुलगा, बायको वगैरे प्रतिनिधींकडून करवावी.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP