मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|
भीम-दुर्योधन-गदायुद्ध

गीत महाभारत - भीम-दुर्योधन-गदायुद्ध

महर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.


कृतवर्मा, कृप व अश्वत्थामा यांनी डोहापाशी येऊन राजाशी संवाद केला. तो वनातील व्याधांनी ऐकला होता. पांडवांना त्या व्याधांकडून लगेचच दुर्योधनाच्या डोहाविषयी कळले. ते सर्व तेथे आले.युधिष्ठिराने त्याच्या या वागण्याबद्दल त्याला दोष दिला. ’तू खरा शूर नाहीस, व क्षत्रियही नाहीस, खरा शूर राजा असा भिऊन रणातून पळून येत नाही.’ असे त्याने राजाला डिवाले. दुर्योधनानेही आपले विचार मांडले व शेवटी तो मानी राजा गदा घेऊन डोहाबाहेर आला. दुर्योधनाचा वध झाला नसता तर युद्धाचा खरा निर्णय झाला नसता. युधिष्ठिराच्या हातून या प्रसंगात पुन्हा एक चूक घडली. त्याने सुयोधनाला सांगितले, ’तू आमच्या पाचांपैकी कोणाही एकाशी लढ; तो हरला तर राज्य तुझेच आहे !’ हे ऐकल्याबरोबर कृष्णाला चिंता वाटली; कारण फक्‍त भीमच तुल्यबळ होता. पण दुर्योधनानेच नंतर म्हटले तुमच्यापैकी माझ्या तोडीचा पांडव युद्धासाठी निवडा. भीम पुढे आला व त्या दोघांचे अत्यंत भीषण असे गदायुद्ध झाले व भीमाने त्याच्या मांडयांवर प्रहार करुन युद्ध जिंकले. ज्याने पांडवांना मारण्याचा अटोकाट प्रयत्‍न केला होता तो कौरवाधिपती आज अखेरच्या घटका मोजीत होता. युद्ध संपले. पांडव विजयी झाले. या युद्धप्रसंगी कृष्ण अर्जुनाला सांगत आहे----

भीम-दुर्योधन-गदायुद्ध

शेवटी काय आली ही वेळ

अर्जुना, भीम कसा जिंकेल ? ॥धृ॥

अविचाराने धर्म बोलला

"जिंक पांडवातिल एकाला

त्यावर अंतिम निर्णय अपुला"

निकट आलेला विजय आपुला, कसा हाती राहील ? ॥१॥

भीम एकटा असे तुल्यबळ

अन्य पार्थ ते गदेत दुर्बळ

नृपे निवडला स्वये वृकोदर

दुजा निवडिता युधिष्ठिराचा संपताच रे खेळ ॥२॥

दोन गिरी धडकती येउनी

तद्वत भिडले योद्धे दोन्ही

प्रहार भीषण करिती गर्जुनी

युद्धातिल हे शेवटचे रण कोण विजय मिळवेल ? ॥३॥

सुयोधनाचा प्रहार दुर्धर

भीम पडे भूमीवर क्षणभर

करी वार परि उठून सत्वर

क्रुद्ध सर्प भासतो वृकोदर वैर कसे विसरेल ? ॥४॥

गदायुद्ध विद्येत तुल्यबळ

यत्‍नामध्ये कौरव दृढतर

भीम लढे निजदेहबळावर

प्रबळ नृपाला श्रांत भीम हा कसा बरे हरवेल ? ॥५॥

पुर्वी असुरांना देवांनी

मायेने त्या जिंकले रणी

बोध मिळे आपणा यातुनी

मायावी नृप मायायोगे मारावा लागेल ॥६॥

’ऊरु भेदिन सुयोधनाचे’

शपथवचन हे कुंतिसुताचे

स्मरण नसे भीमासी त्याचे

तोच खरा क्षत्रीय भूवरी जो वचना पाळेल ॥७॥

लढु दे भीमा कौशल्याने

वधिला नच हा जर शाठयाने

मारिल तो भीमा कपटाने

सर्व राज्य राहील तयाचे, धर्म सर्व गमवेल" ॥८॥

ऐकुन ही कृष्णाची वचने

सुचवी भीमा पार्थ खुणेने

थाप ऊरुवर मारि कराने

खूण जाणुनी भीम ठरवितो सूडाची ही वेळ ॥९॥

दाताखाली ओठ दडपले

घेइ भीम दारुण मंडले

भीमगदेचे निनाद घुमले

पाहुन हे कृष्णास वाटले कार्य अता साधेल ॥१०॥

भीषण केला वार ऊरुवर

रणकर्कश भासला वृकोदर

मत्त सुयोधन पडे धरेवर

कुरुपतिच्या निधनाने झाली संग्रामाचि अखेर ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : April 18, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP