मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
रुद्राक्षाची महती व सामर्थ्य

रुद्राक्षाची महती व सामर्थ्य

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


रुद्राक्ष-धारण-फल :

भूशुण्डच्या फलविषयक प्रश्‍नाचे उत्तर देताना भगवान कालाग्नी रुद्र म्हणाला,

भक्‍तानां धारणात्पापं दिवारात्रिकृतं हरेत्‌ ।

लक्षं तु दर्शनात्पुण्यं कोटिस्तध्दारणाद्‌भवेत्‌ ॥

तस्य कोटिशतं पुण्यं लभते धारणान्नरः ।

लक्षकोटी सहस्त्रणि लक्षकोटि शतानि च ॥

तज्जपाल्लभते पुण्यं नरो रुद्राक्षधारणात्‌ ॥

भृशुण्ड ! भक्‍तांद्वारा धारण केल्यावर रुद्राक्ष दिवस रात्र केलेल्या पापांचे हरण करतो. त्याचे दर्शन होताच करोडो गुणांचे पुण्य प्राप्‍त होते. निरंतर रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य पुण्यसंचय करतो. जर रुद्राक्ष धारण करुन जप केला तर अधिक पुण्य प्राप्‍त होते.

रुद्राक्ष-माहात्म्य :

शिवपुराणानुसार रुद्राक्षाचे माहात्म्य अनुपमेय आहे.

शिवप्रियतमो ज्ञेयो रुद्राक्षः परपावनः ।

दर्शनात्स्पर्शनाज्जाप्यात्सर्वपापहरः स्मृतः ॥

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात. भगवान शंकरांनी उमेच्या समक्ष लोकोपकाराच्या दृष्टीने वर्णन केले होते . "हे महेशानी तुझी प्रीती व भक्‍तांचे हित यासाठी रुद्राक्षमहिमा मी वर्णन करतो. ज्याला संसारिक भोगांची इच्छा आहे त्यांनी याचे धारण अवश्य करावे. यामुळे मोक्षप्राप्‍ती होते. शिव व शिवाची कृपा प्राप्‍त करण्यासाठी याचे धारण करणे अनिवार्य आहे.

रुद्राक्ष धारणाने सर्व दुःखनाश :

रुद्राक्ष असंख्य दुःखांना नष्ट करण्यास समर्थ आहे. त्यामुळे सर्व मनोरथ सहज पूर्ण होतात. भय, शोक, शत्रू इत्यादींवर सहज विजय प्राप्‍त होतो . धन संपत्ती व संतती यांची वृध्दी होते.

खरे पहाता तिन्ही लोकांत रुद्राक्षासारखी पवित्र व मंगलमयी कुठलीच अन्य वस्तू नाही. सर्व देवता यास धारण करतात. म्हणून मनुष्यासाठी रुद्राक्ष अत्यंत श्रेयस्कर आहे . जो यास धारण करतो, त्यास मृत्यूचे भय रहात नाही. कारण तो स्वयं साक्षात‌ शिवरुप होऊन जातो.

भूत, प्रेत, पिशाच्च, डाकिनी, शंखिनी इत्यादी तसेच कुठलाही कुग्रह रुद्राक्ष धारणाने पळून जातात. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्यावर कृत्य किंवा करणी ( मूठ मारणे ) हे प्रयोग निष्फल होतात. पापी व दुष्ट पुरुष सुध्दा रुद्राक्ष धारण करणार्‍यास पाहून भयभीत होतात .

जर पुण्यात्मा मनुष्य यास धारण करील तर तो महान्‌ सामर्थ्यवान बनतो. परंतु पापी माणसाने सुध्दा धारण केले तरी त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो पुण्यात्मा बनतो , त्याच्यातील विवेकबुध्दी व ज्ञान जागृत होते.

मंत्रासहित रुद्राक्ष धारणेचे महत्त्व फार आहे. तसेच कोणी अज्ञानी मनुष्य धारण करील तर तो आपले कल्याण संपादतो. रुद्राक्ष धारणेने अकाल मृत्यू येत नाही . दीर्घायुष्याची प्राप्‍ती होते. तसेच मृत्यूनंतर परमपदाची प्राप्‍ती होते. रुद्राक्ष धारण करणार्‍यास पाहून यमाचे दूत पळून जातात.

रुद्राक्ष धारण करणार्‍यास फक्‍त शंकरच नाही तर ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, गणेश, दुर्गा , आदित्य इत्यादी देवता प्रसन्न रहातात. तो कुठल्याही देवतेचा उपासक असला तरी त्यास शिवकृपा प्राप्‍त होते.

रुद्राक्ष धारणेने समाजात प्रतिष्ठा प्राप्‍त होते. राज-सन्मान सुलभ होतो. कीर्ती प्राप्‍त होते. त्यास कुठलेच अपयश प्राप्‍त होत नाही.

रुद्राक्ष उच्चारणाने गोदानाचे फल :

रुद्राक्ष जावालोपनिषदमध्ये स्वतः भगवान कालाग्नीने रुद्राक्षाविषयी सांगितले आहे की,

तद्‌रुद्राक्षे वाग्विषये कृते दशगोप्रदानेन यत्फलमवाप्नोति तत्फलमश्‍नुते ।

करेण स्पृष्टवा धारणमात्रेण द्विसहस्त्र गोप्रदान फल भवति ।

कर्णयोर्धार्यमाणे एकादश सहस्त्र गोप्रदानफलं भवति ।

एकादश रुद्रत्वं च गच्छति ।

शिरसि धार्यमाणे कोटि ग्रोप्रदान फलं भवति ।

एतेषां स्थानानां कर्णयोः फल वस्तुं न शक्यमिति होवाच ॥

रुद्राक्ष शब्द उच्चारणाने दश गोदानाचे फल प्राप्‍त होते. रुद्राक्षास हाताने स्पर्श करुन धारण केल्यास दोन हजार गोदानाचे फल मिळते. दोन्ही कानात रुद्राक्ष धारण केल्यास अकरा हजार गोदानाचे पुण्य मिळते .

डोक्यात रुद्राक्ष धारण केल्याने क्रोडो गोदानाचे पुण्य प्राप्‍त होते. कानात रुद्राक्ष धारण केल्याने एवढे पुण्य मिळते की ते सांगणे शक्य नाही.

रुद्राक्ष राक्षसांचा नाश करणारा व मृत्यूस दूर करणारा आहे. यास वरीलप्रमाणे सांगितल्याअतिरिक्‍त अन्य शरीराच्या भागावर सुध्दा बांधू शकता. कंठ, भुजा व शेंडीस बांधल्याने फार भयंकर ( मोठे ) फल प्राप्‍त होते. गुरु द्वारा प्राप्‍त रुद्राक्ष धारण केल्यास अगणित फलदायक ठरते. अशावेळी गुरुदक्षिणा म्हणून सप्‍तदीपे दान केली तरी अपूरी पडतील. परंतु श्रध्दापूर्वक एका गाईस प्रदक्षिणा सुध्दा पुरे आहे. भगवान कालाग्निरुद्राचे वचन आहे की ,

रुद्रस्य नयनादुत्पन्न रुद्राक्षा इति लोके ख्यायन्ते ।

अथ सदाशिवः संहारकाले संहारं कृत्वा संहाराक्षं मुकुली करोति ।

तन्नयनाज्जाता रुद्राक्ष इति होवाच ॥

रुद्र नेत्रातून उत्पन्न झाल्याकारणाने रुद्राक्ष नाव पडले. जेव्हा संहारकालात भगवान शंकर आपला तृतीय नेत्र उघडतो तेव्हा रुद्राक्षाची उत्पत्ती होते. रुद्राक्षाचे अस्तित्व हेच आहे .

या प्रकारे रुद्राक्षाचे सर्व पदार्थात सर्वोपरि महत्त्व आहे. त्याच्या धारणेने भोग व मोक्ष यांची प्राप्‍ती सुलभ होते विद्वानांनी त्याचे चार प्रकार मानले आहेत ते प्रचलित चार वर्णांशी संबंधित आहेत .

ब्राह्मणाः क्षत्रियाः वैश्याः शूद्राश्‍चेति शिवाज्ञया ।

वृक्षा जाताः पृथिव्यां तु तज्जातीयोः शुभाक्षमः ।

श्‍वेतास्तु ब्राह्मण ज्ञेयाः क्षत्रिया रक्‍तवर्णकाः ॥

पीताः वैश्यास्तु विज्ञेयाः कृष्णाः शूद्रा उदाह्रुताः ॥

शंकराच्या आज्ञेने त्या शुभदायक रुद्राक्षाचे चार प्रकारचे वृक्ष बनले. त्यास ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र अशी नावे पडली . श्‍वेत रुद्राक्ष ब्राह्मण, लाल रुद्राक्ष क्षत्रिय, पिवळा रुद्राक्ष वैश्य व काळा रुद्राक्ष शुद्र म्हणतात.

चारी वर्णांच्या रंग प्रकारचा विचार करुन आपाआपल्या वर्णाशी संबंधित रुद्राक्षाचे धारण करावे. ब्राह्मणास श्‍वेत, क्षत्रियास लाल, वैश्यास पिवळा व शूद्रास काळ्या रंगाचा रुद्राक्ष धारण करावयास हवा .

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP