श्री दत्तप्रबोध - अध्याय सातवा

श्री अनंतसुत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित ’श्री दत्तप्रबोध’ ग्रंथाचे पारायण केल्याने ’गुरुचरित्र’ पारायणाचे पुण्य मिळते.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

श्रीमत्सद्‌गुरु अनंता । आनंदकंदा तूं समर्था । उदार धीरा कृपावंता । अनाथनाथा शरण तूतें ॥१॥

तूं संपन्न सर्वाधीश । सकळ ईशांचाहि ईश । परात्पराचाही परेश । तूं अविनाश सर्वदा ॥२॥

तूं शरणागताचा दाता । तूंचि भवभ्रांति फेडिता । तूं या जिवासी तारिता । तुजवीण त्राता कोण आम्हां ॥३॥

म्हणोनि तूतें आलों शरण । न पाहीं आतां दोषगुण । देवोनिया कृपादान । करी पोषण सुताचें ॥४॥

मी तुझें लाडके लडिवाळ । तूं गुरुमाय होसी स्नेहाळ । पुरवी बाळकाची आळ । कथा रसाळ चालवी ॥५॥

गत कथाध्यायीं निरोपिलें । अनसूये स्तवोनि प्रसन्न केलें । तिघे दिव्य पूर्वरुप झाले । पुष्पें वर्षले सुरवर ॥६॥

आतां पुढील कथानुसंधान । सद्‌गुरुकृपें होतसे निरुपण । श्रोतीं तेथें चित्त देवोन । कीजे श्रवण साक्षेपें ॥७॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । पाहतांचि झाला जयजयकार । देव मानव नारीनर । आनंद थोर मानिती ॥८॥
अत्री अनसूया तये वेळीं । आसनें मांडिती उतावेळीं । युग्म पृथकत्वें निराळीं । रंगवल्ली अनुपम्य ॥९॥

अन्य पृथकचि बैसका । ऋषीलागीं घातल्या देखा । पूजासाहित्य मालिका । द्रव्य सुगंधिका सिद्ध केलें ॥१०॥

मग उभयतां जोडोनि कर । प्रार्थिते झाले तयांसमोर । म्हणती कृपा कीजे दीनावर । अंगीकार करावा ॥११॥

जयजयाजी पार्वतीरमणा । सावित्रीवरा पद्मासना । जय भक्तप्रिय नारायणा । दयाघना दीनबंधो ॥१२॥

जयजयाजी गौरीवल्लभा । जयजयाजी पद्मनाभा । रमारमणा तुझेनि शोभा । ये आरंभा पूजास्थानीं ॥१३॥

जयजयाजी पन्नगहारा । जय वेदमूर्ति करुणाकरा । जय सर्वातीता सर्वेश्वरा । पूजा अंगीकारा दीनाची ॥१४॥
जयजयाजी कैलासवासिया । सत्यपुराधीशा सत्य प्रिया । वैकुंठधामा गुणालया । करा दया विनयार्थी ॥१५॥

जय विधातिया सृष्टिकरा । सदय पालना सर्वेश्वरा । जयजयाजी भूतसंहारा । दयासागरा लक्षा मज ॥१६॥

जय पिनाकपाणी कपर्दिशा । नीलग्रीवा भस्मभूषा । गंगाधरा अपर्णेशा । शिव सर्वेशा मां पाहि ॥१७॥

जयजय स्वामी चतुर्वक्त्रा । हे कृपाघना द्विचतुर्नेत्रा । सदय उदारा सत्पात्रा । सतेज पवित्रा पाहि मां ॥१८॥

जयजयाजी कमळावरा । कमलदलाक्षा चारुकरा । कमलप्रिया करी उद्धारा । करुणाकरा मां पाहि ॥१९॥
ऐकोनिया करुणावचन । कृपें द्रवलें अंतःकरण । म्हणे बा रे संतोषमान । परिसोनि स्तवन झालों कीं ॥२०॥

उद्‌गार वचनें ऐकतां । साष्टांगें नमिती तैं उभयतां । पृथकची प्रार्थाव्या त्या माता । होईल चित्ता संतोष त्यां ॥२१॥

उभय जोडोनि बद्ध पाणी । करिते झाले तेव्हां विनवणी । आलों तुम्हां अनन्यपणीं । शरणचरणीं सद्भावें ॥२२॥

जय त्रिपुरांतकेश्वरी अंबे । मम जनिते विश्वकदंबे । विश्वपालके हरिवल्लभे । सतेज सुप्रभे शरण तुज ॥२३॥

जयजय शिवप्रिये मृडानी । जय विधिविलासके सौदामिनी । जयजय माधवमनमोहिनी । उभे प्रार्थनीं पाहि आम्हां ॥२४॥

जयजय अपर्णे सदये । जय वेदमूर्ति प्राणप्रिये । जयजय सरितावरतनये । वंदितों पाय अनाथ मी ॥२५॥

जय षडास्यमाते भवानी । जयजय वो दक्षमखविध्वंसिनी । कृपाकटाक्षे हिमनगनंदिनी । पतित पावनीं लक्षी मज ॥२६॥

जय ब्रह्मतेजसे त्रिपदगात्री । प्रथम पदें तूं गायत्री । द्विपदा तूं माते सावित्री । सरस्वती सुंदरी त्रिपदा तूं ॥२७॥

एवं माता तूं पदत्री । जन्मलों कुसीं म्हणोनि अत्री । तरी कृपा करोनि पवित्री । दया सुपुत्रीं कीजे आतां ॥२८॥

जयजय कमले कमलधारके । जय कमलभूषणे । त्रिभुवनपालके । कमलदलाक्षे त्रितापहारके । विश्वनायके पाहि दीना ॥२९॥

स्तुतिस्तवनातें ऐकोनी । तिघी आनंदत्या झाल्या मनीं । हें देखोनि उभयांनीं । लोटांगणीं पैं गेले ॥३०॥

अनसूयेसी वोसंगा घेवोन । प्रेमें देती आलिंगन । बाई तुम्हां क्षेम कल्याण । सदैव पूर्ण असो हें ॥३१॥

तेविं ब्रह्मा विष्णु महेश्वर । आलिंगोनि देती अभयकर । बा रे तुमचा महिमा थोर । अद्‌भुत अगोचर पाहिला ॥३२॥

अत्री अनसूयेसी अवग्रहण । वडिलीं आदरें करितां जाण । यश वर्णिती ऋषिगण । म्हणती धन्य दिवस आजी ॥३३॥

सद्भावें पितरांलागोनी । अत्री अनसूयेतें सन्मानोनी । आणोनि बैसविलें आसनीं । घोष द्विजगणीं मांडिले ॥३४॥

मंत्रघोष आरंभिती । उभय पादपूजा तेव्हां करिती । दिव्य वस्त्रभूषणें देती । चंदन चर्चिती सौभाग्य ॥३५॥

सतेज समर्पिती अलंकार । तुळसी पुष्पें गुंफीत हार । सुगंध धूप दीप परिकर । फलसंभार नैवेद्या ॥३६॥

फल आहार करितां सेवन । उदकें करविती मध्यपान । तृप्ति होतां अपोषण । करप्रक्षालन करविलें ॥३७॥

मुखशुद्धी देवोनि त्यांसी । दिव्यासन देत वेगेंसी । करोद्वर्तन चंदनासी । परिमळासी चर्चिलें ॥३८॥

सप्रेमें सुरंग तांबूल । चर्वणा दिधला रसाळ । दक्षणा अर्पोनि उतावेळ । प्रदक्षणा निर्मळ करिताती ॥३९॥

दंडप्राय नमस्कार घातले । तेवींच मुनी तोषविले । मानसीं ध्यानधारण केलें । चरण लक्षिले सकळांचे ॥४०॥

मागुतीं जोडोनिया कर । प्रीतीं उभे राहोनि समोर । स्तुति आरंभिली साचार । सद्गद अंतर तैं होय ॥४१॥

जय अजअजात सर्वोत्तमा । आनंदसागरा सुखधामा । अनाथनाथा तूं विश्रामा । मंगलधामा सर्वेशा ॥४२॥

जयजय विमलरुपा चैतन्यघना । जय गुणातीत गुणवर्धना । जय सर्वसाक्षी सनातना । सर्वकारणा सर्वात्मका ॥४३॥

जय मायातीत निरामया । अज्ञानछेदका ज्ञानोदया । तापहारका पूर्ण सदया । करी छाया कृपेची ॥४४॥

जय जय अद्वयरुपा निःसंगा । विज्ञानराशी तिमिरभंगा । अनंत वेषा अनंत रंगा । अद्वय अभंगा अभेदा ॥४५॥

ऐसिया स्तवनें आरती । प्रज्वाळोनिया ओवाळिती । काया कुरवंडी सप्रेमगती । करीं घेती पुष्पांजळी ॥४६॥

वेदोक्तमंत्रे करोन । सुस्वरे घोष सरसावून स्वस्ति साम्राज्य म्हणोन । करिती अर्पण मस्तकीं ॥४७॥

नमस्कारोनिया स्तविती दीन अपराधी म्हणोनि म्हणती । क्षमा करोनि कृपामूर्ती । करा प्रीती दासातें ॥४८॥

जयजय वैकुंठपति रमाधवा । मी बहु अपराधी केशवा । नेणें करुं कांहीं तुझी सेवा । अभिमानी काजवा जन्मलों ॥४९॥

जयजय शिवशूळपाणी । मी दुराचारी गा अवगुणी । अर्चन नेणें कुभाव मनीं । व्यर्थ जन्मोनी वायां कीं ॥५०॥

जयजय स्वामी विघातिया । नाहीं सेविलें म्या तुझिया पायां । व्यर्थ शीण दिधला जन्मोनिया । वृथा काया पुष्ट केली ॥५१॥

तुम्ही महामूर्ति सर्व संपन्न । धन्य स्वामी तुमचें महिमान । पतित अनाथ अनन्य शरण । करितां पावन तयातें ॥५२॥

म्हणोनिया पायांपाशीं । विनीत झालों जी कृपाराशी । नपाहतां दोषगुणांसी । चरणापाशीं ठाव द्या ॥५३॥

आम्हीं शुद्ध अत्यंत अज्ञान । नाहीं घडलें सेवाअर्चन । नाहीं घडलें जप ध्यान तपाचरण तेही नसे ॥५४॥

नाहीं साधिला योग । नाहीं घडले कांहीं याग । तीर्थ व्रत नेम चांग । नाहीं जोग साधिला ॥५५॥

शुद्ध जैसे वनीचें ढोर । तेवींच घडला सर्व विचार । इंद्रियपोषणीं सादर । स्वहित सार नेणेंची ॥५६॥

सेवा न जाणें सज्जनाची । कैंची मग सोय परोपकाराची । कैंचीं कोडें पुरतीं अर्थिल्याचीं । वार्ता सुखाची न वदे वाचा ॥५७॥

सर्व गुणें आम्हीं हीन । देवा पातकी आणि मलीन ऐसिया नष्टा दुष्टा कराल पावन । तरीच धन्य सर्वेश ॥५८॥

अत्री अनसूयेच्या स्तवना । सकळही तुकविती माना । म्हणती केवढा हा लीनपणा । धरोनिया करुणा गाइली ॥५९॥

धन्य धन्य यांचे आचरण । परी किंचित न धरी अभिमान । हेंचि योग्यतेचें लक्षण चतुर सुजाण जाणती ॥६०॥

पीका सरसावतां कां गोणी । भू लक्षीतसे अवलोकनीं । जंव जंव हाय कणभरणी । तंव तंव लवणीं विशेष ॥६१॥

जे का अभागी द्वाड । फळ ना पोकळ दीर्घ वाड । स्पर्शूं जातां खडबडबड । कोण सुरवाढ तयांचा ॥६२॥

तैसा नोव्हे हा अत्रिमुनी । शांति वैराग्याची खाणी । पवित्र अनसूया सुशील गृहिणी । पुण्यपावनी पतिव्रता ॥६३॥

ऐसे करितां ऋषि अनुवाद । तंव त्रिमूर्तीस झाला आनंद । मग सप्रेमयोगें आशीर्वाद । देती प्रसिद्ध आवडीनें ॥६४॥

म्हणती बारे अत्रिमुनी । तुम्ही उभयतां धन्य मेदिनीं । तुम्हांऐसे नयनीं । न देखों कोण्ही दूसरे ॥६५॥

उदंड तपी तापसी पाहिले । योगी ध्यानी अवलोकिले । गृहस्थाश्रमी सभाग्य भले । परि मन न झालें शांत कोठें ॥६६॥

आचरण कर्में देखिलें अपूर्व । अभिमान ऊर्मीचे गौरव । दिसती परी दांभिक सर्व । अनन्य शुद्ध भाव नसेचि ॥६७॥

तो आम्हीं येथेंचि पाहिला । मूर्तिमंत तुम्हा पाठीच ठेला । निरभिमान योग साधिला । आनंद झाला पाहतां ॥६८॥

धन्य धन्य हें तुझें अर्चन । धन्य या विनयत्वाचें लक्षण । श्रद्धा भली परिपूर्ण । भाव सघन सदृढ तो ॥६९॥
धन्य तुमचा हा अधिकार । आवडी पूजनीं तुम्हां थोर । केला पाहोनि सत्कार । आमुचें अंतर निवालें ॥७०॥

तुम्ही उभय आनंदमूर्ती । हे आम्हां सकळांची विश्रांती । सदैव कल्याण तुम्हांप्रती । असो कीर्ति वाढो सदा ॥७१॥

निर्विघ्न चालो तुमचा योगक्षेम । सिद्धीं जावोत तुमचे नेम । अढळ हृदयीं राहो प्रेम । पुरोत काम सकळही ॥७२॥

निर्दोष घडो तपाचरण । सदैव सदयता वसो पूर्ण । आरोग्य काया शक्तिसंपन्न । असो धनधान्य विपुल तें ॥७३॥

प्रपंच घडो परमार्थरुप । सकळ देवता असोत सकृप । नुरो जीवीं कांहीं संताप । ज्ञानदीप प्रज्वळो ॥७४॥

सेवा घडो सर्वांभूतीं । द्वैत कल्पना न बाधो कल्पांतीं । नुरो देहीं कांहीं भ्रांती । आत्मप्राप्ती असो तुम्हां ॥७५॥
न बाधो कदा कोणताही शीण । असो औदार्य प्रपंचीं अनृण । नांदा कुशल रुप सुखी सधन । स्वरुपीं उन्मन वृत्ती असो ॥७६॥

ऐसा वरदपुष्पें गुंफोनि हार । अत्री अनसूये वोपितां सत्वर । त्रिगुणात्मकें अभयकर । मस्तकावर दीधला ॥७७॥

आनंदोनी तेव्हां ऋषिमंडळी । प्रेमें आल्हादें पिटिती टाळी । अत्री भाळ ठेवी चरणकमळीं । सप्रेम जळीं वर्षत ॥७८॥
तंव ते विमानें सिद्ध झालीं । निशाणभेरी खणाणिली । देवांसह तये वेळीं । ऋषीमंडळी उठे त्वरें ॥७९॥

तै उल्हासलें सकळांचें मन । दर्शनें जीवजंतू झाले पावन । आनंदलाटा उसळती सघन । हेलावे संपूर्ण वोलावती ॥८०॥
परी अनसूयेचे अंतरीं । किंचित उठली खेदलहरी । ते जाणे एक ब्रह्मचारी । जया करी ब्रह्मावीणा ॥८१॥

अनसूयेचे वर्म जाणोन । म्हणे तूं चतुर होसी सुजाण । धैर्य धरोनि धरीं चरण । करीं भाषण इच्छित जें ॥८२॥

विमानासन्निद्ध देव जाती ऋषिगण तयां बोळविती । तैसियामाजी अनसूयासती । नमोनि विनविती पैं झाली ॥८३॥

इकडे वाद्यांचे गजर । होतां नादें कोंदलें अंबर । न कळे शब्द अणुमात्र । गुजबुज थोर दुमदुमली ॥८४॥

तंव अनसूयेतें देखोनी । वाद्यें राहविलीं तत्‌क्षणीं । तुम्ही शब्द न बोला जी कोण्ही । निश्चळपणीं असावें ॥८५॥

नाद अवघे स्तब्ध होतां । विनविती झाली पतिव्रता । अहो जी स्वामीसमर्था आम्हा अनाथां तारिलें ॥८६॥

सुप्रसन्नें दिधलें वरदान । तें सिद्धची असे कृपेंकरुन । आपण करितां पालन । मग तें न्यून कैसेनी ॥८७॥

भानु मंदिरीं येवोनी प्रगटेल । तेथें अंधार कोठोनि राहील । हिमकर प्रीतीं भेटेल । ताप उरेल मग कैंचा ॥८८॥

कृपा करितां चिंतामणी । दरिद्रा गेली सहज पळोनी । कल्पतरु उगवतांच अंगणीं अर्थ मनीं केंवी राहे ॥८९॥

प्रसन्न होतांचि कामधेनू । मग सांगा तयासी काय वाणूं । रोगिया होतां अमृतपानू । तया मरणू कैसेनी ॥९०॥
तेवीं तुम्ही अपंगितां । कोठोनि बाधेल आम्हां चिंता । तुम्ही सर्वज्ञ सर्व जाणता । कासया वृथा शिणवावें ॥९१॥

ऐकोनि अनसूयेची उक्ती । देव चकित झाले चित्तीं । विचारें मानसीं शोधिती । परि कोणाप्रति नुमजे तें ॥९२॥

शब्दरोहोकेचितेरो होकले । थकित ठाईं उभे ठेले । निरसिल्यावीण पाउलें । पुढें नुचलेंचि तयांते ॥९३॥

तंव नारद म्हणे कां जी स्थीर । विमानीं आरुढावें सत्वर । कासया करितां उशीर । वाट सुरवर पाहती ॥९४॥

शंकर म्हणे जावयालागुनी । उशीर कैचा नारदमुनी । परि या अनसूयेच्या प्रार्थनीं । पडिलों गुंतोनि नुगवे हें ॥९५॥

नारद म्हणे त्रिपुरांतका । परम होसी तूं भक्तसखा । अनुसूयेचे मनींची शंका । विश्वव्यापका दूर कीजे ॥९६॥

आपण होवोनि सुप्रसन्न । बहुतेक दिधलें वरदान अनसूयेचा हेतू कोण । तोही जाणून घेईजे ॥९७॥

सवेंचि म्हणे अनसूयेसी । कोण प्रश्न तुझिये मानसीं । तो निवेदी पायापासी । संकोच यासी न धरावा ॥९८॥

तुमचे पुरवावया हेत । हे प्रगटले तिघे साक्षात । ऋषिगण गंधर्व पाहात । धन्य पुनीत दिवस आजी ॥९९॥
सकळांसी झाली समसाम्यता । हें महत्पर्व जाणोनि आतां । निवेदी आपुल्या अंतरआर्ता । साधी स्वार्था प्रयुक्तीं ॥१००॥

परिसोनि ऐसिया वाक्यासी । अनसूया वदे नारदासी । श्रवणीं साठवा शब्दासी । देवऋषी तुम्हीं सर्व ॥१॥

अहो हे सकळांचे वडील । आम्हां दीनांवरी झाले दयाळ । स्वलीलें होवोनि बाळ । मज स्नेहाळ भाग दिला ॥२॥

नसतां उद्भवलें येणें । केलीं आवडीं पयःपानें । यालागीं मंदिरीं पाळणें । घालोनि म्हणे जोजो मी ॥३॥

तेणें लोभमोहा जाली वृद्धीं बाळरुपीं जडली बुद्धी । नसतां दाविली उपाधी । सोडिलें मधीं पाहा केसें ॥४॥

आतां स्वपदां हे आनंदे जाती । नारदा पालख रिते मज दिसती । याची गुणें जीवीं खंती । ऐसियाप्रती काय करुं ॥५॥
नारदा पूर्वीं होतों आनंदघन । नव्हती यांची आम्हां आठवण । यांनींच स्वतां येऊन । वधलें मज काय वदूं ॥६॥
जेधवां पाहीन पालख । मोहें अंतर करी लखलख । हरपोनि जाईल सर्व सुख । अनिवार दुःख वाढेल ॥७॥

तया दुःखभरें करोनी । नारदा निद्रा न यावी नयनीं । हें उचित कीं तुम्हांलागोनी । पाहा शोधोनी मानसीं ॥८॥

नारदा बोल प्रारब्धासी । काय रुसोनि सांगों तुम्हांसी । स्वस्थ जावें स्वपदासी । दया मानसीं असूं द्या ॥९॥

स्वपरिवारें सुखसंपन्न । चिरायु नांदा पदीं जाऊन । परी शरणागताची आठवण । नका विसरुन राहूं कीं ॥१००॥
अनंत ब्रह्मांडाची घडामोडी । तुम्हां अन्य कार्याची तांतडी । तेथें आम्ही केउतीं बापुडीं । होईल अनावडी स्मरणाची ॥११॥

ललना परिवारीं सुरवाड । भोग उपभोगीं उपजे आवंड । केवीं स्मरणाची चाड । तेचि गोड तुम्हां होती ॥१२॥

म्हणोन विनीत होवोन । तुम्हां देतसों आठवण । एवढेंचि द्यावें कृपादान । आमुचें स्मरण न विसरावें ॥१३॥

तंव नारद म्हणे जी करुणालया । या अनसूयेवरी करावी दया । तैं कृपा उपजली देवराया करिती छाया पूर्णंत्वें ॥१४॥

सकळांचेनि सन्निधानीं । देव वदती प्रसादवाणी । अनसूये तुझें प्रेम पाहोनी । तुष्टलों मनीं सत्य पैं ॥१५॥

तुमचे भक्ति आदरीचें ऋण । कधींही न फिटे आम्हांलागून । परि किंचित्‌ तोषवूं तुझें मन । सागरा अर्पण बिंदू जेवीं ॥१६॥

येचविषयीं माते । आवईं निवेदितों तूंतें । तें परियेसी सावधान चित्तें । आपंगी आम्हांतें जीवेंभावें ॥१७॥

तुझें केलें पयःपान । तें अमृताहुनी गोंड गहन । तेथें गुंतलें आमुचें मन । पुढतीं सेवन करुं तें ॥१८॥

यासाठीं मी शंकर । तुझिये पोटी धरितों अवतार । दुर्वासनामें करी गजर । हा अभय वर घे माझा ॥१९॥

तंव विधाता बोले आपण । मीही तुझा पुत्र होईन । न करीं आतां संकोच मन । घेई वचन हें माझें ॥१२०॥

दोघांचा पाहोनि वरद । विष्णूसी झाला आल्हाद । म्हणे माते न करी खेद । धरिला छंद पुरवीन मी ॥२१॥

दोघांहोनि आगळें । माझें कृत्य असें वेगळें । हीनदीन जनांचे पाळें । पावन स्वलीलें करीन मी ॥२२॥

माते तुज सांगतो खूण । या दोघांचे वेंगळेचि दोन गुण । ते मजमाजी अंसंती पूर्ण । यांहोनि भिन्न भिन्न वेगळा मी ॥२३॥

त्रिगुणात्मकें मी दत्त । तुझा बाळ होईन सत्य । योग दावीन सिद्धांत । सर्वातीत राहोनी ॥२४॥

तुझिया मनोरथासी । पूर्ण करुं निश्चयेसी । मातें त्वां स्वस्थ मानसीं । आनंद सुखवासी असावें ॥२५॥

नारद म्हणे धरी पोटीं । बांधी आतां शकुनगांठी । अनसूया चरणीं घाली मिठी । स्फुंदे गोरटी सप्रेमे ॥२६॥

उठवोनिया लवलाही अनसूया देवें धरिली हृदयीं । मुख कुरवाळोनि तें समयीं म्हणे राही आम्ही येतो ॥२७॥

वर देवोनि संबोखिता । आनंद सुख जाहले समस्ता । सुमनसंभार अनसूयेवरुता । झाला वर्षता अमरेंद्र ॥२८॥

अत्रिऋषिवर्या भेटोनी । तात्काळ बैसले देव विमानीं । दुंदुभीनाद गर्जती गगनी । उठती ध्वनी अनुपम्य ॥२९॥

स्वर्गी चढतांचि विमानें गंधर्वं विद्याधर गाती गायनें । अप्सरा नृत्य कला करिती तनानें । मृदंग वीणे वाजविती ॥१३०॥

झाली विमानांची दाटी । अमर करिती पुष्पवृष्टी । देव मिळोनी तेहतीस कोटी । नेती पटी मिरवत ॥३१॥

देवललना धावोनि येती । आरत्या घेवोनि ओवाळिती । प्रथम कैलासभुवना जाती । शिव स्थापिती शिवपदी ॥३२॥

परस्परा सकळां सन्मान । करोनि तोषविती शिवगण । आनंदमय सर्व कैलासभुवन । भक्तजन डुल्लती ॥३३॥

अपर्णेसी कैलासीं ठेविलें । गणांसमवेत शिव निघाले । सत्य लोकाप्रती पावले । पदीं स्थापिलें विधातीया ॥३४॥

आनंदोनि सत्य लोकवासी । सन्मान देती सकळांसी । सत्कार करोनि वेगेसीं । समारंभासी गौरविलें ॥३५॥

तंव बोलतसे रमारमण । आम्हांसी निरोप द्यावा आपण । सवें यावयाचें कारण । कासया शीण करितसां ॥३६॥

तंव बोलतसे उमावर । बरवा शोधिला जी विचार । हा तो नोव्हे क्षीरसागर । वैकुंठपुर असें कीं ॥३७॥

देखोनि सकळांची आवडी । ओळखोनी शिवहृदयींची गोडी । भाषणें करतील कडोविकडी । ती सुरवाडी गोड पुढें ॥३८॥

हा अध्याय आनंदभरित । वाचितां आनंदचि होय प्राप्त । वरदे शोभला शोभिवंत । मनोरथ पुरवावया ॥३९॥

अत्रि अनसूयेची कामना । पूर्ण व्हावया दे वरदाना । श्रवणीं पठणीं जडतां भावना । त्या देवराणा करी दया ॥१४०॥

तोचि त्रिगुणात्मकें करुन । सर्वा ठायीं राहिला व्यापून । प्रीतिभावाते निरखोन । करी पावन जगद्‌गुरु ॥४१॥

सद्‌गुरु तोचि दत्त अविनाश । शरणागताचे तोडी पाश । ज्ञानबोधें बोधवी मानस । करवी नाश विकाराचा ॥४२॥

शुद्ध सत्त्व जो आपुला गुण । प्रेमें दे तेथील अधिष्ठान । करोनि द्वैताचे खंडन । अद्वय पूर्ण बाणवी ॥४३॥

एसा समर्थ हा गुरुदत्त । याची कृपा व्हावया प्राप्त सहाकारी तुम्ही साधुसंत । दयावंत जिवलग ॥४४॥

म्हणोनि धरिली तुमची कास । जीवेंभावें म्हणवी दास । न करा जी माझी निरास । पुरावा आस दयासिंधु ॥४५॥

तुमचिया प्रसादें करुन । हा ग्रंथ होतसे निरुपण । कर्ता म्हणतां लागे दूषण । तुमचें महिमान तुम्हां ठावें ॥४६॥

संतचरणकमळ जें सुंदर । अनंतसुत येथील भ्रमर । मकरंद सेवी निरंतर । धालि गुंजारव सप्रेमें ॥४८॥

इति श्रीदत्तप्रबोधग्रंथ । यासी नारदपुराणीचें संमत । श्रोते परिसोत भाविक भक्त । सप्‍तमोऽध्याय गोड हा ॥१४८॥

॥ इति सप्तमोध्यायः समाप्‍तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 08, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP