श्रीदत्तलीलामृताब्धिसार - चतुर्थलहरी

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.


॥श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः॥

महाराज सोमवंशीं। गाधी कन्या झाली त्यासी । सत्यवती मागे तीसी । ऋचकर्षी ॥१॥

राजा चिंती कैसी द्यावी । कन्या मान्य जैसी देवी । याला फिरवावा केवीं । शापील हा ॥२॥

मग राजा म्हणे त्याला । माझा एक पण झाला । जो दे श्यामकर्णाश्वांला । सहस्त्रेंशीं ॥३॥

त्याला कन्या द्यावी ऐसी । प्रतिज्ञा हे तुला कैसी । साधे मुनि वदे त्यांसी । देतों अश्‍व ॥४॥

त्यानें तो वरुणापाशीं । अश्‍वां पाहोनी वेगेंसी । येवोनीतो मुनी त्यासी । सर्व सांगे ॥५॥

वरुणही तें ऐकोनी । तेव्हां डचकला मनीं । मागें फिरवितां मुनी । शापील हा ॥६॥

अश्‍वां पाजितां मदिरा । ते न जाती मुनीश्‍वरा । तो योजूनी याप्रकारा । दे अश्‍वातें ॥७॥

योगबळें ते घेवून । आला त्याला तो पाहून । हर्षें देई कन्यादान । मानपूर्व ॥८॥

देव पाहोनी हाणती । योगीश्‍वरां मोठी शक्‍ती । अघटित घटविती । मिती न हो ॥९॥

गाघी म्हणे परगोत्रा । कन्या गेली न मीं पुत्रा । देखें म्हणोनी हो भित्रा । मुनिवर्या ॥१०॥

मुनी म्हणे होवो तुला । पुत्र जातों आश्रमाला । सवें घेवोनी पत्‍नीला । ताता भेटों ॥११॥

मग पत्‍नीला घेवोनी । भृगूपाशीं तो येवोनी । सांगे सर्व त्या वंदूनी । भृगू हर्षे ॥१२॥

सत्यवती पतिव्रता । भर्तृ-श्‍वशुरांच्या चित्ता । धर्में शर्म’ दे अश्रांता । भृगु तोषे ॥१३॥

बोले इष्‍ट वर घेई । सती लीन झाली पायीं । मला योग्य सुता देई । आयीला ही ॥१४॥

मुनी बोले तूं अश्‍वत्था । औदुंबरा तुझी माता । सेवो संस्कारुनी भाता । खांता सिद्धी ॥१५॥

मग तातगेहीं ये ती । भर्त्यासह तेणे रीती । करि चरु घेतां भ्रांती । होती झाली ॥१६॥

कन्या मातृचरु भक्षी । माता कन्येचा ते वीक्षी । ज्ञानदृष्‍टी भृगू साक्षी । तेथें आला ॥१७॥

म्हणे सुने हो व्यत्यय । तुझा पुत्र हो क्षत्रिय । मातेचा तो विप्र होय । काय केलें ॥१८॥

खिन्न सून पायीं घेई । मिठी पोटीं विप्र येई । ऐसें करावें उपायीं । म्हणे दीन ॥१९॥

भृगु बोले विप्र होय । पुत्र पौत्र हो क्षत्रिय । ऐसें आश्‍वासोनी जाय । निजाश्रमा ॥२०॥

व्याली सत्यवती पुत्र । जमदग्नी जो पवित्र । शंकरांश ज्ञानपात्र । मंत्रदृष्‍टा ॥२१॥

तीची माता व्याली पुत्र । नामें तो हो विश्‍वामित्र । विप्रपूज्य हो सर्वत्र । मंत्रबळें ॥२२॥

गौरीकला रेणूसुता । जमदग्नीची ती कांता । रेणुकाख्या पतिव्रता । शांताकारा ॥२३॥

तिला झाले तीन सुत । चौथा पोटीं ये साक्षांत । केशवांश जो विख्यात । रामनाम ॥२४॥

वेदशास्त्र तो पढला । धनुर्वेदाभिज्ञ झाला । ज्याणें शिवा तोषविला । शिष्यधर्में ॥२५॥

एके दिनीं ती रेणुका । देखे गंधर्वनायका । नदीमध्यें घे स्त्रीसुखा । मुखा चोंखी ॥२६॥

तें पाहोनी ती भुलली । किंचिज्जळांत चालिली । दैवें मनीं डचकली । ओली आली ॥२७॥

म्हणे कैसी झाली भूल । आतां पती कीं शापिल । त्वरें घेवोनी ये जल । शीलवती ॥२८॥

पती कोपें तिला बोले । तोंड न दावीं आपुलें । वाटती जे तुला भले । चाले तेथें ॥२९॥

तेव्हां थरथर कापे । पुत्रा सांगे मुनी कोपें । ईचा मुंडा तोडा पापें । जाती तेव्हां ॥३०॥

तिघेही ते स्नेहें भ्याले । तीचें शीर न तोडीलें । तातें त्यांतेंही शापिलें । केलें भस्म ॥३१॥

रानीं समिद्दर्भांसाठीं । राम गेला तो ये पाठीं । तेव्हां मुनीची ये दृष्‍टी । तयावरी ॥३२॥

बोले ही हो अमंगळा । रामा ईचा काटीं गळा । न विचारीं तूं ये वेळा । बलाढया रे ॥३३॥

राम मनीं न शंकितां । हातीं परशू जो होता । तीच्या कंठी तो मारितां । तुटे शीर ॥३४॥

धड पडे भूमीतळा । वाहे लोह भळा भळा । जरीं राम पाहे डोळां । तरीं न भी ॥३५॥

तेव्हां शांत झाला मुनी । म्हणे रामा आलिंगोनी । माझे वाक्यें त्वां जननी । मारीली हे ॥३६॥

पूर्ण तूं रे पितृभक्‍त । धन्य हो तूं अनासक्‍त । आता काय तुझें चित्त । वर इच्छीं ॥३७॥

राम म्हणे माझी माता । उठो बंधू तेही आतां । चिरंजीवित्व दे ताता । विजयत्व ॥३८॥

माझ्याहुनी न हो शूर । कोणी युद्धी धुरंधर । मुनी बोले दिल्हे वर । रामा हे म्यां ॥३९॥

तेव्हां आपोआप शीर । जडे तेव्हां ती सत्वर । उठे तैसे ते भ्‍रातर । जिते झाले ॥४०॥

राम मनीं आनंदला । पायीं मातेच्या लागला । तीणें त्याला आलिंगीला । पुत्रस्नेहें ॥४१॥

म्हणे धारातीर्थी पुत्रा । शुद्ध केलें माझ्या गात्रा । पुनः याच्या स्मृतिमात्रा । न शीवसी ॥४२॥

पातिव्रत्या सांभाळी ती । ह्या ख्यातीते धरो चित्तीं । जातां अन्याठायीं वृत्ती । गती ऐशी ॥४३॥

उँ रे चित्ता कामासक्‍ता । आम्हां बुडविशी संता । तुला धिक् धिक् तूं हो आतां । शांत दांत ॥४४॥

काम ठाईचा चावटा । भल्याचाही करी तोटा । बुडवी हा कट कटा । मोठा खोटा ॥४५॥

लुटी सर्वा ऐशा चोरा । कां देशी रे चित्ता थारा । आतां धरीं सुविचारा । सारासार ॥४६॥

मोक्ष किंवा स्वर्गलोक । तुझ्यायोगें ये नरक । तेव्हां आतां तूंच ऐक । एक सांगे ॥४७॥

मुमुक्षेचा करीं काम । प्रियपादीं घे विश्राम । तेणें लाभे सर्वोत्तम । धाम जे तें ॥४८॥

ऐसे चित्त वळवूनी । साध्वी ठेवी स्थिरावूनी । भर्तृपादी लीनपणीं । सेवी भावें ॥४९॥

एके दिनीं तो अर्जुंन । जातां वनीं विलोकून । जमदग्न्याश्रमस्थान । आला तेथें ॥५०॥

तो रेणुका मुनीश्‍वर । पाहे जेवीं गौरीहर । प्रेमें करी नमस्कार । दूर राहे ॥५१॥

मुनी भूपा बैसवूनी । पुसे क्षेम समाधानीं । कामधेनुप्रसादोनी । त्या जेववी ॥५२॥

राजा वदे दे धेनूसी । देतों धन गोधनासी । मुनी म्हणे देऊं कैसी । होमधेनू ॥५३॥

बलात्कारें त्या धेनूला । राजा घेवोनी चालला । मागें वनांतूनी आला । राम वेगें ॥५४॥

धेनू नेली हें ऐकोनि । भूपावरी तो कापोनी । हाती परशू घेवूनी । धांवे वेगें ॥५५॥

मेघगंभीर वचनें । फिरवूनी भूपा म्हणे । रे रे चोरा माझे भेणें । न घेसी कीं ॥५६॥

राजा नव्हे तूं चोरटा । कुळा लावीयेला बट्टा । न मानी हे मूर्खां थट्टा । कंठा छेदीं ॥५७॥

भेदीं तुझ्या वक्षस्थळा । दावी कळा तूं कूशळा । क्षत्रा पाहे विप्रबळा । बळावें त्वां ॥५८॥

तेव्हां रामा पाहे भूप । तो त्या भासे उग्ररुप । जेवीं अग्नी खातां तूप । ज्वाळामाळी ॥५९॥

न हा विप्र शस्त्रधारी । माझ्यासाठीं आला हरी । याशीं युद्ध घोर करीं । मारील हा ॥६०॥

लहान हा दिसे परी । द्यावी वामनाची सरी । ऐसें विचारुनी करी । स्वारी भूप ॥६१॥

तेव्हां पंचशत चाप । सज्ज करि करी भूप । राहे रामाच्या समीप । तपनसा ॥६२॥

न साहिला यत्‍प्रताप । कोणी तो हा दीप्‍तरुप । सहस्त्रकर अमूप । तपःसिद्ध ॥६३॥

सिद्धसाध्य देवमुनी । स्वर्गीं विमानीं बैसोनी । युद्ध पाहती हर्षोनी । मनीं तेव्हां ॥६४॥

अचूक त्याचें संधान । सोडी पांचशें मार्गण । वेळोवेळ आच्छादूत । ठेवी राम ॥६५॥

वेळोवेळ अभिनव । शस्त्र सोडी वेगें राव । पाहूनी हस्तलाघव । राम हर्षे ॥६६॥

राम म्हणे वीर धन्य । याला मारी कोण अन्य । प्रतापी हा भंगशून्य । मान्य वीरा ॥६७॥

राम तोडी त्याचे बाण । तरी मारि तो दारुण । मग परशू घेवून । बाहू तोडी ॥६८॥

तोडी बाहू पटपटा । शस्त्र वाजे खटखटा । पडती ते चटचटा । उठाउठी ॥६९॥

बाहू जेथोनी तुटती । पुनः तेथोनी फूटती । तेही हाणाया उठती । मती खचे ॥७०॥

खचे राम तेव्हां मनीं । ध्वनी झाला व्योमांतूनी । पूर्वीं न टाकीं तोडुनी । बाहू याचे ॥७१॥

दत्तात्रेयवरें जाण । उरी भुजबीजस्थान । आहे पूर्वीं ते शोषून । छेदीं मग ॥७२॥

तेव्हां आग्नेयास्त्रें राम । शोषून घे तत्रिर्गम । मग भूप जपे नाम । श्रीदत्ताचें ॥७३॥

रामें ते भुज तोडिले । दोन अभेद्य राहिले । बाहूंचे पर्वत झाले । भूमीतळीं ॥७४॥

दोघे वीर अनिवार । महाशूर महाधीर । करुं वांच्छिती जर्जर । परस्परां ॥७५॥

सोडिताति वारंवार । तोडिताती परस्पर । शस्त्रें दोघे भराभर । मार देती ॥७६॥

राम चिंती स्वगुरुला । तेव्हां भूप समजला । म्हणे अंतकाळ आला । ह्या देहाचा ॥७७॥

मग गुरुपदेशातें । आठवूनी इंद्रियातें । मनी योजी त्या मनांतें । प्राणामध्यें ॥७८॥

धारणेनें प्राण योजी । अनुक्रमें राजा तेजीं । तेजा तेजःपुंजामाजीं । योजी योगें ॥७९॥

अखंडैक रसत्व जें । तत्वं पदार्थांचे साजे । जेथें कांहीं नसे दुजे । भजे त्या तो ॥८०॥

तेव्हां राम तोडी शीर । खालीं पडे कलेवर । झाला जयजयकार । सुरलोकी ॥८१॥

कार्तवीर्य दत्तभक्‍त । ब्रह्मनिष्‍ठ जीवन्मुक्‍त । झाला राम हा निमित्त । त्याच्या वधा ॥८२॥

मूर्धा अर्जुंनाचा फुटला । लिंगदेह भिन्न झाला । स्वकारणीं गेल्या कला । समरसे ॥८३॥

स्वयें होय स्वयंज्योती । पाहोनी ही त्याची गती । देवां करोनी प्रणती । स्तुती केली ॥८४॥

पुष्पवृष्‍टी रामावर । करिती ते सुरवर । झाला वाद्यांचा गजर । सुरलोकीं ॥८५॥

भूपा लाधलें परंधाम परंतू घेतां तन्नाम । अद्यापी हो नष्‍टागम । क्षेम लोकां ॥८६॥

वीर समागमें होते । परशूनें त्या सर्वांतें । रामें मारुनी धेनूतें । मुक्‍त केली ॥८७॥

राम घेवूनी धेनूतें । आला शीघ्र स्वाश्रमातें । वंदूनी जमदग्नीतें । सांगे सर्व ॥८८॥

मुनी म्हणे हाय हाय । पुत्रा केलें त्वां हें काय । शीरीं घेतला अपाय । जा येथूनी ॥८९॥

अरे आम्हां राजाश्रय । तपःसिद्धी देयी श्रेय । जरी नेता एक गाय । काय हानी ॥९०॥

जो संरक्षी सप्‍तद्वीपा । निवारी जो पापा तापा । पुण्यश्लोक ऐशा भूपा । कां मारिलें ॥९१॥

श्रीदत्ताचा शिष्य योगी । ऐसा न हो दुजा जगीं । स्वल्पदोषें वीतरागी । तो मारिला ॥९२॥

ऋद्धी सिद्धी ज्याच्या दासी । दे अमित गोदानासी । या धेनूची चाड त्यासी । काय बोल ॥९३॥

लीलेनें ही धेनू नेली । त्याची ग्रीवां त्वां तोडिली । राम म्हणे गती झाली । प्रारब्धें ही ॥९४॥

तें ऐकूनी बोले मुनी । दहा श्रोत्रिय मारुनी । पाप जें तें ये लागुनी । भूपवधे ॥९५॥

अभिषेक शिरावरी । झाला त्याला ठार मारी । तो भूप्रदक्षिणा करी । तरी शुद्ध ॥९६॥

आतां जाईं तूं येथून । करीं सर्वतीर्थीं स्नान । तेव्हां हें पाप जावून । शुद्ध होशी ॥९७॥

रामें ती आज्ञा मानून । केलें सर्वतीर्थीं स्नान । पुनः भेटला येवून । जनकातें ॥९८॥

शतपुत्र अर्जुनाचे । और्ध्वदेहिक ताताचें । आचरोनी मागें वाचें । बोलती हें ॥९९॥

विप्र असोनी दे बळी । भूपाचा त्या तिळांजळी । करुं आमची ते वेळीं । ऋण मुक्ति ॥१००॥

इति श्रीदत्तलीमृताब्धौ अर्जुनमुक्‍तिश्‍चतुर्थ लहरी संपूर्णा ॥ओव्या॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP