विवेकचूडामणी - श्लोक संग्रह १०१-१५०

विवेकचूडामणी ह्या ग्रंथात आत्मानात्मविचार आणि तत्त्वज्ञान पूर्णपणे भरलेले आहे, शिवाय ईश्वरप्राप्तीचा ज्ञानमार्ग उत्तम प्रकारे दर्शविला आहे.


अंधपणा, मंददृष्टि, अथवा चलाख दृष्टि हे डोळ्याचे धर्म आहेत. आणि ते त्याच्या (डोळ्याच्या) बरेवाईटपणापासून होत असतात. तसेच बहिरेपणा, मुकेपणा इत्यादिक धर्मही श्रोत्रादिकांचे आहे. पण साक्षीभूत आत्म्याचे नव्हेत. ॥१०१॥

उच्छ्वास, निःश्वास, जांभई, भूक हालणे-चालणे, आणि एका शरीरातून निघून दुसर्‍या शरीरात जाणे इत्यादिक क्रिया, ही प्राणादिकांची कामे आहेत; आणि तहान व भूक हे प्राणाचेच धर्म आहेत, असे तत्त्ववेत्ते म्हणतात ॥१०२॥

या चक्षुरादिक इंद्रियांवर आणि शरीरावर चिदाभासाच्या तेजाने 'मी मी' असा अभिमान धरून जे अंतःकरण राहिले आहे तोच; कर्ता आणि भोक्ता अशा प्रकारचा अभिमान बाळगणारा अहंकार असे समजावे तोच अहंकार सत्वादिक गुणांच्या योगाने जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांना भोगीत असतो, विषय पाहिजेत ते असले म्हणजे तो सुखी असतो, आणि नकोत ते असले म्हणजे तो दुःखी होतो. तस्मात सुख आणि दुःख हे अहंकाराचे धर्म आहेत; पण सदानंदरूपी आत्म्याचे धर्म नव्हेत ॥१०३॥॥१०४॥॥१०५॥

विषय आत्म्याच्या कामी पडतो म्हणून तो फार आवडता आहे; पण तो स्वतः आवडता नाही आणि आत्मा तर स्वतःच सर्वांना अतिशय आवडता आहे. म्हणून आत्मा हा सर्वदा आनंदरूप आहे. याला दुःख कधीही होत नाही. सुषुप्तीमध्ये विषयरहित आत्मानंद सर्वांच्या अनुभवास येतो. या आत्मानंदाच्या अनुभवाविषयी श्रुति, प्रत्यक्ष, परंपरागत प्रसिद्धि आणि अनुमान ही चार प्रमाणे आहेत ॥१०६॥॥१०७॥

अव्यक्त हे नाव धारण करणारी, अनादी अविद्यारूप, त्रिगुणात्मक, कार्याहून पलीकडची आणि कार्यांवरून जिच्याविषयी पंडितांना अनुमान करता येते, अशी जी परमेश्वराची शक्ति तीच माया समजावी. या मायेच्या योगाने हे सर्व जग उत्पन्न होते ॥१०८॥

ही माया खरी नाही,खोटी नाही, आणि खरे व खोटे या दोहोंनी मिश्र अशा स्वरूपाचीही नाही, तशीच ही आपल्या अधिष्ठानाहून भिन्न नाही, अभिन्न नाही, आणि भिन्न व अभिन्न अशा मिश्र स्वरूपाचीही नाही. ही साकार नाही, निराकार नाही व साकार आणि निराकार अशा मिश्र स्वरूपाचीही नाही. तर ही फार आश्चर्यजनक आणि अनिर्वचनीय म्हणजे जिच्या स्वरूपाचा निर्णय करता येत नाही अशी आहे. ॥१०९॥

जसे रज्जूचे ज्ञान झाल्याने तिच्यावर झालेली सर्पभ्रांति दूर होते, तद्वत शुद्ध आणि अद्वितीय अशा ब्रह्माच्या ज्ञानाने या मायेचा नाश होतो. हिच्या सकल विदित कार्यांवरून हिचे सत्व, रज आणि तम हे तीन गुण प्रसिद्ध आहेत. ॥११०॥

क्रियारूप जी विक्षेपशक्ति ती रजोगुणाची आहे. या विक्षेपशक्तीपासून अनादिकाळची संसारप्रवृत्ति चालली आहे. राग, विषयाची आवड, आणि दुःख इत्यादिक जे मनाचे विकार, ते नेहमी विक्षेपशक्तीपासूनच उत्पन्न होत असतात ॥१११॥

काम, क्रोध, लोभ, दंभ, असूया अहंकार, ईर्ष्या आणि मत्सर इत्यादिक जे घोर विकार आहेत, ते रजोगुणाचे धर्म होत. ज्यापेक्षा ही पुरुषाची प्रवृत्ति यापासून होते. त्यापेक्षा रजोगुण बंधास कारण होय. ॥११२॥

एक प्रकारची वस्तु असता दुसर्‍याच प्रकारची जिच्यापासून दिसते, अशी जी आवरणशक्ति; ती तमोगुणाची होय. आणि हीच पुरुषाला संसार प्राप्त होण्याचे व विक्षेपशक्तीच्या अधीन होण्याचे कारण होय. ॥११३॥

पुरुष बुद्धिमान, पंडित, चतुर आणि अतिशय सूक्ष्मदृष्टीचा जरी असला, व त्याला पुष्कळ प्रकारे स्पष्ट कितीही जरी समजावले. तरी तो तमोगुणाने जोपर्यंत घेरलेला असतो तोपर्यंत खरी गोष्ट समजत नाही. भ्रांतीने कल्पिलेलेच त्याला बरे वाटते आणि त्या कल्पित वस्तूच्याच गुणांना तो अवलंबून राहतो. अरेरे! या दुर्निवार तमोगुणाची आवरणशक्ति मोठी शिरजोर आहे. ॥११४॥

या आवरणशक्तीचा त्याला संसर्ग झाला, अशा पुरुषाला अज्ञान, गैरसमज, कल्पना आणि संशय ही खरोखर कधीही सोडीत नाहीत, आणि विक्षेपशक्ति त्याला निरंतर हैराण करीत असते. ॥११५॥

अज्ञान, आलस्य, जडता, निद्रा, प्रमाद आणि मूढता इत्यादिक तमोगुणाचे धर्म आहेत. या गुणांचा ज्यांच्यात संचार झाला, तो पुरुष काही जाणत नाही. केवळ झोपाळूसारखा किंवा खांबासारखा स्तब्धच राहतो. ॥११६॥

सत्वगुण जरी पाण्यासारखा अगदी निर्मळ आहे; तथापि तो रजोगुण आणि तमोगुण यांशी मिश्र झाला म्हणजे बिघडतो. त्या सत्वगुणांत प्रतिबिंबित झालेले आत्मस्वरूप सूर्याप्रमाणे सकल जड वस्तूंना प्रकाशित करीत असते. ॥११७॥

मानी नसणे, नियम, यम, श्रद्धा, भक्ति मुमुक्षता, दैवी संपत्ति आणि दुष्ट पदार्थांपासून दूर असणे हे मिश्र झालेल्या सत्वगुणाचे धर्म आहेत. ॥११८॥

प्रसन्नता, स्वस्वरूपाचा अनुभव, अतिशय शांतता, तृप्ति अतिशय आनंद आणि जिच्या योगाने सर्वदा आनंदरसाची प्राप्ति होईल अशी परमात्म्याचे ठिकाणी निष्ठा हे अतिशय शुद्ध अशा सत्वगुणाचे धर्म आहेत. ॥११९॥

या (सत्व, रज आणि तम) तीन गुणांची, जी साम्यावस्था तिला अव्यक्त म्हणतात. तेच आत्म्याचे कारण नावाचे शरीर होय- सर्व इद्रियांच्या आणि बुद्धीच्या वृत्ति जिच्यात लीन झालेल्या आहेत, अशी सुषुप्ती या अव्यक्ताची वेगळी (स्वतंत्र) अवस्था होय. ॥१२०॥

सर्व प्रकारच्या म्हणजे इंद्रियादिक प्रमाणांचा लय होणे आणि बुध्दीचे निजरूपाने राहणे यालाच सुषुप्ति म्हणतात. या सुषुप्तिमधल्या 'मी काही जाणत नाही' अशा आपल्या अज्ञानाच्या अनुभवाला प्रत्येक मनुष्य प्रसिद्ध करतो म्हणून सुषुप्तीमध्ये आत्मा साक्षिरूपाने असतो असे समजते. ॥१२१॥

देह, इंद्रिय, प्राण, मन आणि अहंकार इत्यादिक सर्व विकार, सुखादिक विषय, आकाशादिक भूते आणि अव्यक्तापर्यंत सकल जगत हे सर्व अनात्मा होय. ॥१२२॥

माया आणि महतत्वापासून देहापर्यंत सगळे मायेचे कार्य, ही अनात्मा असून निर्जल प्रदेशातिल मृगजलाप्रमाणे मिथ्या आहेत. ॥१२३॥

शिष्या ! आता तुला मी परमात्म्याचे स्वरूप सांगतो. जे स्वरूप जाणल्याने मनुष्य बंधांतुन सुटून मुक्तीस प्राप्त होतो. ॥१२४॥

नेहमी 'मी मी' अशा प्रत्ययास अवलंबून असणारा असा स्वतः म्हणून कोणी (आत्मा ) आहे. तो तीन अवस्थांचा साक्षी आणि पंच कोशाहून वेगळा आहे. ॥१२५॥

जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्थांमध्ये जो सकल जाणतो. तसेच बुद्धीच्या आणि तिच्या वृत्तींच्या सत्तेला व अभावाला जो जाणतो तो हा आत्मा 'मी' होय. ॥१२६॥

जो स्वतः सर्व जाणतो; पण ज्याला कोणी जाणत नाही. जो स्वतः बुद्ध्यादिकांना चेतना देतो; पण बुद्ध्यादिक ज्याला चेतना देत नाहीत, तो हा आत्मा होय. ॥१२७॥

हे सकल जगत ज्याने व्यापले आहे; पण ज्याला कोणी व्यापीत नाही. आणि जो प्रकाशू लागला म्हणजे आभासरूप हे सर्व प्रकाशते, तो हा आत्मा होय. ॥१२८॥

देह, इंद्रिये, मन आणि बुद्धि ही केवळ ज्याच्या सानिध्यानेच आपापल्या कार्याचे ठाई प्रेरणा केल्यासारखी प्रवृत्त होतात, तो हा आत्मा होय. ॥१२९॥

सूर्य जसा आपल्या प्रकाशाने घटाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे जो नित्यज्ञानस्वरूपी अहंकारापासून ते देहापर्यंत वस्तूंना आणि सुखादिक विषयांना जाणवितो, तो हा आत्मा होय. ॥१३०॥

हा अंतर्यामी पुराणपुरुष (आत्मा) निरंतर अखंड सुखरूप व अनुभवरूप आहे. सदा एकरूप आहे. आणि ज्ञानरूप आहे. वाणी आणि इंद्रिये ही या आत्म्याच्या प्रेरणेनेच विषयांचे ठाई प्रवृत्त होत असतात. ॥१३१॥

सत्वगुणमय अशा या बुद्धिरूप गुहेमध्ये अव्याकृतरूप आकाश आहे. त्या आकाशात आत्मा सूर्याप्रमाणे अतिशय प्रकाशतो आहे. आणि स्वताच्या तेजाने या सकल जगाला प्रकाशित करीत आहे. ॥१३२॥

मन आणि अहंकार यांच्या विकारांना व देह, इंद्रिये, आणि प्राण यांनी केलेल्या क्रियांना जाणणारा आणि लोखंडासारखा जसा अग्नि होतो, त्याप्रमाणे त्यांना (अहंकारादिकांना) अनुसरणारा जसा आत्मा स्वतः काही क्रिया करीत नाही, व काही विकारही पावत नाही. ॥१३३॥

हा अविनाशी आत्मा उत्पना होत नाही, मरण पावत नाही, वाढत नाही, क्षीण होत नाही, विकार पावत नाही आणि घडा फुटला तरी त्यातले आकाश जसे नाश पावत नाही, त्याप्रमाणे हे शरीर लयास गेले तरी पण तो स्वतः लयास जात नाही. ॥१३४॥

कारण आणि कार्य याहून वेगळा, शुद्ध ज्ञान हेच ज्याचे स्वरूप, कार्यकारणरूप सकल जगाला प्रकाशित करणारा, ज्याच्या ठिकाणी कोणताही विशेष (फेरफार) नाही, असा परमात्मा जागृति आदिअवस्थांचे ठाई 'मी मी' अशा बुद्धीच्या साक्षिरूपाने प्रत्यक्ष प्रकाशमान होत आहे. ॥१३५॥

हे शिष्या ! वश केलेल्या मनाने आणि बुद्धीच्या निर्मळपणाने तू या आत्म्याला 'हा मी आहे' असे आपल्या ठिकाणी स्पष्टपणे समज; जन्ममरणरूप (असंख्य) तरंग असल्यामुळे ज्याचा पार नाही अशा संसारसागराला तर; आणि ब्रह्मस्यरूपाने राहून कृतार्थ हो. ॥१३६॥

या अनात्म्याच्या ठिकाणी जी 'मी' अशी बुद्धि हाच ह्या जीवाला अज्ञानाने बंध प्राप्त झाला आहे. हा बंधच जन्म आणि मरण यापासून होणारे क्लेश प्राप्त होण्यास कारण आहे. या मिथ्या शरीराला 'हे सत्य आहे' आणि 'हेच मी आहे' अशा समजुतीने जीव त्याचे विषयांच्या योगाने पोषण करतो, त्याची वज राखतो, आणि त्याचे रक्षण करतो, व कोळी जसा आपण रचलेल्या तंतूनीच आपण बांधला जातो. त्याप्रमाणे तो आपल्या हातानेच आपण बांधला जातो. ॥१३७॥

अंधकाराने घेरलेल्या पुरुषाला विवेक नसल्याने जशी सर्पाच्या ठिकाणी 'ही रज्जु आहे' अशी भ्रांति पडते, तद्वत अज्ञानाने घेरलेल्या जीवाला विवेक नसल्यामुळे अनात्म्याचे ठिकाणी 'हा आत्मा आहे' अशी बुद्धि होते. त्यापासून अनात्म्याचे आत्मस्वरूपाने ग्रहण करणारावर मोठाच अनर्थांचा समुदाय येऊन कोसळतो, आणि त्यापासून जो खोटा ग्रह उत्पन्न होतो तोच बंध, तो कसा तो ऐक बाबा. ॥१३८॥

राहु जसा सूर्यमंडळाला झाकतो, तद्वत अखंड, नित्य आणि अद्वितीय अशा ज्ञानशक्तीने स्फुरण पावणार्‍या अनंतैश्वर्यसंपन्न आत्म्यालाही ही तमोगुणात्मक आवरणशक्ति झाकते. ॥१३९॥

अतिशय शुद्ध ज्याचे तेज असे आत्मस्वरूप झाकले गेले असता जीव मोहाने या अनात्मरूप शरीराला 'मी' असे मानतो ॥६५॥ नंतर या जीवाला रजोगुणाची विक्षेप नामक प्रबल शक्ति कामक्रोधादिक जी बंधनाची साधने त्यांच्या योगाने फार पीडा करते. ॥१४०॥

महामोहरूपी भूताने पछाडल्यामुळे ज्याला स्वरूपाचे भान उरले नाही असा आणि स्वताला अनात्मरूप मानल्यामुळे बुद्धीच्या अनेक अवस्था स्वताच्या आहेत असे मानून त्याप्रमाणे वागणारा व म्हणूनच दुःखी होणारा हा दुर्बिद्धि पुरुष विषयरूप विषाने भरलेल्या अपार संसार समुद्रत गटांगळ्या खात खात फिरत आहे. ॥१४१॥

सूर्याच्या तेजापासुन उत्पन्न झालेली मेघांची पंक्ति सूर्याला आच्छादित करून जशी स्वतः प्रकाशते, त्याप्रमाणे आत्म्यापासून उत्पन्न झालेला अहंकार आत्मतत्त्वाला आच्छादित करून स्वत प्रकाशित होतो. ॥१४२॥

दाट मेघांनी झाकून टाकला आहे सूर्य ज्यामध्ये असे दुर्दिन उदयास आले असता थंडगार सोसाट्याचा भयंकर वारा जसा लोकांना हैराण करतो, त्याप्रमाणे एकसारख्या तमोगुणाने आत्म्याला झाकून टाकले असता तीव्र विक्षेपशक्ति मूढबुद्धीच्या पुरुषाला फार दुःखे देऊन हैराण करते. ॥१४३॥

आवरणशक्ति आणि विक्षेपशक्ति या दोघींच्या पायीच पुरुषाला बंध प्राप्त झाला आहे, कारण, या दोघींच्या योगाने फार मोहीत झालेला पुरुष देहाला आत्मा मानीत असतो. ॥१४४॥

आवरणशक्ति ही संसाररूप वृक्षाचे बीज आहे. देहाला आत्मा मानणे हा त्या वृक्षाचा अंकुर होय. (विषयांची) आवड ही त्याची पालवी होय. कर्म हे त्याला उदक होय. शरीर हे त्याचे खोड होय. प्राण ह्या त्याच्या फांद्या होत. इंद्रियांचा समुदाय ह्या त्याच्या डिर्‍या होत. शब्दादि विषय ही त्यांची फुले होत. अनेक कर्मांपासून उत्पन्न झालेले नानाविध दुःख हे त्यांचे फल होय. आणि जीव हा त्या झाडावरचा फले खाणारा पक्षी होय ॥१४५॥

ज्याचे मूळ अज्ञान असा हा अनाम वस्तूंचा बंध स्वाभाविक, अनादि आणि दुरंत असा सांगितला आहे हा ह्या जीवाला जन्म, मरण, व्याधि, जरा इत्यादिक दुःखांच्या प्रवाहात पाडीत असतो.. ॥१४६॥

हा बंध ईश्वराच्या कृपेने सिद्ध झालेल्या विवेकविज्ञानरूप सुबक व जबरदस्त खडगावाचून दुसर्‍या अस्त्रांनी, शस्त्रांनी अग्नीने वायूने अथवा कोट्यवधि कर्मांनी तोडण्याजोगा नाही. ॥१४७॥

वेदालाच मुख्य प्रमाण मानणार्‍यांची स्वधर्मावर निष्ठा असते. स्वधर्मनिष्ठ पुरुषाच्या अंतःकरणाची शुद्धि स्वधर्मनिष्ठेनेच होते. चांगले शुद्ध ज्याचे अंतःकरण झाले अशा पुरुषाला परमात्म्याचे ज्ञान होते. परमात्म्याच्या ज्ञानानेच संसाराचा समूळ नाश होतो. ॥१४८॥

जसे विहिरीतले पाणी आपोआप उत्पन्न झालेल्या शेवाळ्यांच्या जाळ्यांनी वेढल्यामुळे लक्षात येत नाही. तद्वत आपल्या शक्तीपासून (मायेपासून) उत्पन्न झालेल्या अन्नमयादिक पाच कोशांच्या योगाने वेढलेला आत्मा लक्षात येत नाही. ॥१४९॥

ते शेवाळ्यांचे जाळे दूर केले असता मनुष्याची तहान आणि ताप दूर करणारे व तत्काळ उत्तम सौख्य देणारे चांगले निर्मळ पाणी जसे प्रत्यक्ष दिसते, ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP