मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
हरिनाम मुखाने गाती , कमलो...

मानसगीत सरोवर - हरिनाम मुखाने गाती , कमलो...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


हरिनाम मुखाने गाती, कमलोद्भवसुत ते जाती ॥

मार्गि ते ॥ तिन्हि लोकि जयाची वस्ती, नारायण वदनी वदती ॥मा०॥

अगणीत शिष्य सांगाती, करि टाळ-विणा वाजविती ॥मा०॥चाल॥

बकध्यान लावुनी कान शस्त्र करि धरुन लक्षि मार्गाला ॥

वाल्मीक किरातहि बनला ॥ मार्गि तो ॥

क्षणभंगुर धन-सुत-दारा, झडकरी करी सुविचारा ॥वाल्मिका ॥धृ०॥१॥

मुनिमेळ दटाउनि बोले, द्या धन तुम्हि मज या वेळे ॥विप्रहो ॥

उडवीन तुमचि शिरकमळे, मी पारधि मृग तुम्हि सगळे ॥विप्रहो ॥

तापसी कितिक म्या वधिले, मी व्याघ्र अहा तुम्हि कोल्हे ॥विप्रहो॥

या स्थळी कोणि नसे बळी, करिन रांगुळी, जिवित सांभाळा ॥

देऊन शीघ्र वित्ताला ॥विप्रहो॥ क्षण०॥२॥

वचनोक्ती ऐकुनि कानी, करि प्रश्ना नारदमूनी ॥वा०॥

दुष्कृते घडलि तुजकडुनी, तू केलिस सुकृतहानी ॥वा०॥

समयास येइना कोणी, करि विचार पुरता स्वमनी ॥वा०॥चाल॥

हा शीण कासया धन व्यर्थ स्त्रीस्वजन न ये कामाला ॥

अंतरी भजे रामाला ॥वा०॥क्षण०॥३॥

पाव निमा पाउण सगळा, कोण घेई पातक गोळा ॥वा०॥

जा पुसे सदनि स्वजनाला, थांबतो अम्ही स्थानाला ॥वा०॥

सत्संगतिमहिमा असला, मुनिबोध मानसी ठसला ॥वा०॥चाल॥

झडकरी जाय तो घरी पुसे अंतुरी रिक्त का आला, अधि संपत द्यावी मजला ॥प्रियकरा॥क्षण०॥४॥

आप्तासि विनोदे बोले, अजवरी कष्ट बहु केले ॥

स्वजनहो ॥ मम पातकमेरू बनले, कोण घेता निमे सगळे ॥स्वज०॥

करचरण अता मम थकले, तरि सार्थक करिन मि अपुले ॥ स्वजनहो ॥चाल॥

हा त्रास नको मज खास धरीतो कास गुरुचरणाला ॥गुरू०॥

जो दावि आत्मकिरणाला ॥स्वज०॥क्षण०॥५॥

वदे जननि-जनक त्या समया, तुजवरी अमुचि बहु माया ॥

मिळविता ॥ कामीन म्हणे पतिराया, शयनार्थ घालिम मी शय्या ॥

मिळविता सोयरे भगिनि भाईया, अम्हि सर्व सौख्य भोगाया, मिळविता ॥चाल॥

पातका कोण घे फुका, अम्हि आलो सुखा, बघुन धनश्रीला ॥

ऐकूनि मानसी विरला ॥ वालि तो ॥क्षण०॥६॥

घेइना पाप कुणि माझे, जड झाले दुष्कृत ओझे ॥ मुनिवरा ॥

ही माया डाकिण गांजे, झोटिंग काम हा भाजे ॥मुनि०॥

हा दीन पदी तव लाजे, नामामृत पाजवि ताजे ॥मुनि०॥चाल॥

विधिसूत मस्तकी करा, ठेवि दे वरा, जपे तू "मरा" बसुन या ठाया ॥

करि त्याग सर्व ही माया ॥वाल्म०॥क्षण०॥७॥

तो उलट्या नामा गाई, वारुळाकृती तनु होई ॥ त्या स्थळी ॥

टोणपा वृक्ष वर येई, बहु काळे नारद पाही ॥ त्या स्थळी ॥

भीतरी नामध्वनि होई, उकरिता लागला पायी ॥ त्या स्थळी ॥

भीतरी नामध्वनि होई, उकरिता लागला पायी ॥ त्या स्थळी ॥

हो पाप भस्म लवलाही, आलिंगुनि धरिला ह्रदयी ॥ त्या स्थळी ॥चाल॥

शतकोटि ग्रंथ तू करी, कृतयुगांतरी, अवतरे हरी, देत वर ऐसा ॥

श्रीरामकथामृत परिसा ॥ सुजन हो॥क्षण०॥८॥

अवटीत साधुचा महिमा, लोहाचा जाय काळीमा ॥गुरुकृपे ॥

रसनाग्री धरिता नामा, परब्रह्म सापडे तुम्हा ॥गुरुकृपे ॥

काय देउ तयासी उपमा, पोचवी शीघ्र निजधामा ॥गुरुकृपा ॥चाल॥

विश्वास धरिता खास, करी भवनाश गुरू वरदाता ॥

नच कृष्णेसी भवचिंता ॥गुरुकृपे ॥क्षण०॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP