मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - सन आठराशें सत्याण्णव साला...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


सन आठराशें सत्याण्णव सालांत । आनंद झाला करवित शहरांत । पहिल्या शुक्रवारीं श्रावण महिन्यांत ।

चंद्र उगवला लक्ष्मी महालांत । पुत्र जाहला शाहू राजास । जू बाळा जू जू जू ॥

शाहूच्या गादीला चढलें भूषण । आनंद झाला पुत्र पाहून ।

करुनी सत्कार बाळावरुन वाटीती पेढे मानाप्रमाणं । जू बाळा जू जू जू ॥

शाहू राजाची पुण्याई थोर । गुड्या उभारूनि होई तोफेचा मार ।

आनंद झाला होतो गजर । पानसुपारी वाटा साखर । जू बाळा जू जू जू ॥

बिजलीच्या बत्तीचा प्रकार भारी । लखलखला राजमंदिरीं । पाहून तृप्त झाल्या नगरच्या नारी ।

आणूनी ओतीती पाण्याच्य घागरी । खणा नारळांनीं ओटया सावरी । जू बाळा जू जू जू

दोनी हिरकण्यावरती जन्मला हिरा । मोठमोठ्या शहरीं पाठवल्या तारा ।

बंदी कैद्यांच्या फोडल्या मोहरा । जागोजागीं निशाण उडे फरारा । जू बाळा जू जू जू

पहिल्या दिवशीं पहिला मजकूर । दुसर्‍या दिवशीं दुसरा प्रकार । हत्तीवरून बाटी साखर ।

घोडे कौतवाल जीलभेचीं म्होरं । रुणझुण बाजा वाजे सुंदर जू बाळा जू जू जू

तिसर्‍या दिवशीं त्रिभुवन येती । दत्ताची छाया बालकावरती । आपल्या नांवाची गर्जना करिती ।

करूनी शिणगार ओवाळी आरती । जू बाळा जू जू रे जू ॥

चवथ्या दिवशीं चंद्र पुनवेचा । गजानन महाराज आला द्वारकेचा । खेळत होता कृष्ण गोकुळिंचा ।

प्रकाश पडला म्हालीं सूर्याचा । जू बाळा जू जू रे जू ॥

पांचव्या दिवशीं सटवीचं येणं । तिला आज्ञा केली परमेश्वरानं । लिहिली अक्षरं आपल्या हातानं ।

सुवर्णाची पूजा होई सन्मान । हळदीकुंकूं घेऊन नगरांत जाणं । जू बाळा जू जू रे जू ॥

सहाव्या दिवशीं साव्वा उल्लास । सडासारवान केलं वाड्यास । तेल सुवासिक लावी अंगास ।

पाणी घालीती तान्या बाळास । जू बाळा जू जू रे जू ॥

सातव्या दिवशीं साती अप्सरा । गुप्तरीतीनं घालीती फेरा । लिंबू नारळ टाका उतारा ।

पाणी घालीती सख्या सुंदरा । दिष्ट काढूनी लावा अंगारा । जू बाळा जू जू रे जू

आठव्या दिवशीं आठवा आनंद । पोटीं जन्मला बाळ गोविंद । हार पुष्पांचा सोडीतो गंध ।

तेलाचा वास करी नगरा धुंद । जू बाळा जू जू रे जू ॥

नवव्या दिवशीं नवस केला । खेळणा पाळणा वाहिन तुला । कृष्ण बाळ बाई लाभूं दे मला । जू बाळा जू जू रे जू ॥

अकरव्या दिवशीं अकरावी पूजा । दास रामाचा उभा सरजा । अंगणीं वाजला नवा ग बाजा । जू बाळा जू जू रे जू ॥

बाराव्या दिवशीं आले बारशाला । सोन्याचा पाळणा मोत्यांनी विणला । अंगडं टोपडं किनखापीं त्येला ।

हिरे जोडीले पिंपळपानाला । शाहूच्या गादीला प्रभु नीजला । राजाराम नांव जाहीर सर्वांला । जू बाळा जू जू रे जू ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP