सत्यदत्त व्रत कथा - अध्याय चवथा

योगीश्वर श्रीदत्तप्रभूंचे श्रेष्‍ठ व पापनाशक असे माहात्म्य, श्रीसत्यदत्तव्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तात्काळ सिद्धी देणारे आहे.


श्रीदत्त ॥ सूत उवाच ॥ प्राक्कृतात्पाह्यघादित्थं सकृद्ये प्रार्थयन्त्यपि ॥
तान् पात्यतो नित्ययुक्तभक्तोपेक्षा कथं हरेः ॥१॥
नीते हुण्डासुरेणार्भे प्रातःकाल उपागते ॥
प्रस्वापिन्यां गतायां जनः सुप्तोत्थितोऽभवत् ॥२॥
वीतनिद्रेन्दुमत्यर्भमपश्यन्ती समन्ततः ।
विललाप तदा तन्वी सा हाहाकारपूर्वकम्॥३॥
केन मे सर्वलक्ष्माढयः सुतो देवसुतोपमः ॥
दत्तो दत्तेन गुप्तश्च कथं कस्माद्धृतस्त्वितः ॥४॥
हा पुत्र वत्स हा बाल हा गुणाकार सुन्दर ॥
क्वासीति विलपन्ती सा मूर्च्छिताभून्मृतोपमा ॥५॥
श्रीदत्त ॥ श्रीसूत असे म्हणाले की, "आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर, अशी जे एकदाच प्रार्थना करतात, त्यांचेही जो परमात्मा रक्षण करतो अशा परमात्म्याची, नित्य चिंतन करणार्‍या भक्तांविषयी उपेक्षाबुद्धी कशी भासेल ? ॥१॥
इकडे हुंडासुराने ते अर्भक नेले असता, प्रातःकाल झाल्यावर, प्रस्वापिनी विद्येमुळे आलेली सर्वांनी निद्रा दूर झाली व सर्व लोक निजून उठले. ॥२॥
राणी इंदुमतीही निद्रेतून जागी झाली व चोहीकडे पाहते तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही, यामुळे अत्यंत दुःखित होऊन हाहाःकारपूर्वक विलाप करती झाली. ॥३॥
"माझा सर्व लक्षणांनी युक्त, देवपुत्राप्रमाणे असणारा, श्रीदत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र येथून कसा बरे नेला व कशासाठी नेला ? ॥४॥
हाय हाय ! हे पुत्रा ! हे गुणनिधाना !! तू कोठे आहेस ?" याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत् मूर्च्छित पडली. ॥५॥
राजाप्यप्रियमाकर्ण्य प्राप्यारिष्‍टं ददर्श ताम् ।
भूत्वातिविव्हलो दीनो विलपन्निदमब्रवीत् ॥६॥
दत्तात्रेयप्रसादस्य श्रुतं मे फलमक्षयम् ॥
लब्धोऽपि सगुणः पुत्रस्तत्र विघ्नः कथं त्वयम् ॥७॥
इह धर्मफलं नास्ति नास्ति वै तपसः फलम् ॥
नास्ति दानफलं नष्टे सुपुत्रे निश्चिनोम्यदः ॥
दीनवत्सल मां पाहि श्रीदत्तानन्यमातुरम् ॥८॥
अथ दत्तेरितः प्राप नारदो दिव्यदर्शनः ॥
प्रत्युद्गम्याभ्यर्च्य नृपस्तस्मै दुःखं न्यवेदयत् ॥९॥
नारद उवाच ॥ किं नश्वरेण पुत्रेण गृहेणाङेगन वा तव ॥
लोकः सुखोऽस्ति हृद्यात्मा दत्तोऽमुं शरणं व्रज ॥१०॥
श्रीआयू राजाही, ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर सूतिकागृहामध्ये येऊन मूर्च्छित झालेल्या राणीला पाहता झाला. त्यामुळे अतिशय विव्हळ व दीन होऊन विलाप करता झाला आणि असे म्हणाला की, "श्रीदत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते, असे मी ऐकले आहे. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान् असा पुत्रही झाला; पण एकाएकी हे संकट कशामुळे प्राप्त झाले ते समजत नाही." ॥६-७॥
दुःखातिरेकाने मोहित होऊन श्रीआयूराजा पुन्हा असे म्हणाला की, "या लोकात धर्माचरणाचे फळ काहीच नाही. तसेच तपश्चर्येचा व दानाचाही काही उपयोग नाही. माझा सुपुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला ! श्रीदत्तप्रभो !! या आर्तभक्ताचे आपण रक्षण करावे." ॥८॥
यानंतर श्रीदत्तांनी प्रेरित असे दिव्यदर्शन श्रीनारदमुनी त्या ठिकाणी आले. श्रीहरिभक्त, श्रीनारद मुनी आलेले पाहून, श्रीआयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजन करुन त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. ॥९॥
ते ऐकून श्रीनारदमुनी असे म्हणाले की, "राजा ! विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार ? तसेच गृह, क्षेत्र, शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार ? नित्य प्रकाशमान् आनंदरुप श्रीदत्तपरमात्मा हृदयातच आहेत. त्यांनाच तू शरण जा.॥१०॥
यं तु शोचसि हुण्डेन हन्तुं नीतोऽपि दैवतः ।
कस्यचिन्मुनिवर्यस्य गृहेऽस्ति स सुरक्षितः ॥११॥
विद्वान् हत्वाऽसुरं सार्द्धं पत्न्यागत्याशु शत्रुहा ॥
भुक्त्वेह राज्यमैन्द्रं च पदं मर्त्योऽपि भोक्ष्यति ॥१२॥
इत्युक्‍त्वाऽथ मुनौ याते भार्यांयै तच्छशंस सः ॥
देवर्ष्युक्तिः प्रिये सत्या वरः सत्योऽपि चेशितुः ॥१३॥
प्रसादो नान्यथा तस्माच्छोक जह्यङगशोषणम्॥
एवं मुनिप्रत्ययात्तौ स्मृत्वा माहात्म्यमीशितुः ॥१४॥
श्रीसत्यदत्तमभ्यर्च्य सुखमासतुरन्वहम्॥
तद्‌व्रतस्य प्रभावेण प्रेरतो मुनिपुङगवः ॥
वसिष्‍ठोऽप्येकदाहूय नहुषं तत्र तं जगौ ॥१५॥
ज्या पुत्राकरिता तू शोक करीत आहेस, तो तुझा पुत्र हुंडासुराने मारण्याकरिता उचलून नेला असताही, दैवयोगाने एका श्रेष्‍ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. ॥११॥
धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकरच हुंडासुराचा नाश करील व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल." ॥१२॥
असे सांगून श्रीनारदमुनी निघून गेले असता, ते वृत्त राजाने राणीस कथन केले की, "हे प्रिये ! देवऋषींची वाणी सत्य आहे. तसेच श्रीदत्तप्रभूंचा वरही सत्यच आहे. ॥१३॥
श्रीदत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल ? म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे." याप्रमाणे देवर्षी श्रीनारदमुनींवर विश्वास असल्यामुळे, श्रीदत्तांचे माहात्म्य स्मरण करुन व श्रीदत्तांचे पूजन करुन ते राजाराणी सुखाने राहते झाले. त्या व्रताच्याप्रभावाने प्रेरित झालेले मुनिश्रेष्‍ठ श्रीवसिष्‍ठऋषी, एके दिवशी असे श्रीनहुषाला बोलावून म्हणाले की, ॥१४-१५॥
आयोः सुतस्त्वं नहुष इन्दुमत्यात्मजो विधेः ॥
चारणानां भाषणतस्त्वत्तो मृत्युभयार्दितः ॥१६॥
हन्तुं कृतमतिर्दुष्टो हुण्डोऽरिष्‍ठादपाहरत् ॥
सूदायादाच्च हन्तुं त्वां स तु दैवादिहानयत् ॥१७॥
पालितोऽसि मया वत्स सोमवंशविभूषण ॥
क्षत्रोऽसि त्वमतो हिंसान्निहन्तुं मृगयां चर ॥१८॥
तत्रायुष्मन् महाबाहो धनुर्विद्याविशारद ॥
दत्तात्रेयाभिगुप्तस्त्वं गत्वा हुण्डासुरं जहि ॥१९॥
ब्राह्मणाः पितरो देवा दुरितात्पान्तु रोदसी ॥
पूषा च मा प्रभुवतु दुःशंसः सर्वथा जय ॥२०॥
"हे नहुषा ! तू आयूराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारील असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने, तुलाच मारुन टाकावे म्हणून हुंडासुराने सूतिकागृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरिता आचार्‍याजवळ दिले; पण सुदैवाने त्या आचार्‍यालाच दया उत्पन्न होऊन त्यानेच तुला या आश्रमात आणून ठेविले. ॥१६-१७॥
हे चंद्रवंशास भूषण असणार्‍या वत्सा ! तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्त्र पशूंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि हे आयुष्मन् महाबाहो ! धनुर्विद्यानिष्णात अशा नहुषा !! श्रीदत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ॥१८-१९॥
ब्राह्मण, पितर, देव, द्यावापृथिवी व पूषा हे सर्व संकटांपासून तुझे रक्षण करोत. तो हुंडासुर निष्प्रभ होवो व तुला पूर्णपणे विजय प्राप्त होवो. " ॥२०॥
इति प्रस्थापयामास लब्धाशीः सोऽपि तं गुरुम् ॥
भक्तया प्रणम्य श्रीदत्तं संस्मृत्य नहुषोऽब्रवीत् ॥२१॥
यो निषेकप्रभृत्यद्ययावत् स्नेहाद्ररक्ष माम् ॥
स चात्रिनन्दनो युद्धे जयं दत्वाऽवतु प्रभुः ॥२२॥
एकमुक्त्वा प्रतस्थैऽसौ हन्तुं हुण्डासुरं तदा ॥
पुष्पाणि ववृषुर्देवा आशीर्वादान् मुनीश्वराः ॥२३॥
अत्रान्तरे सहायार्थं शक्राज्ञप्तस्तु मातलिः ॥
नहुषं प्राप्य देवेन्द्रप्रेरितोऽस्मीत्युवाच च ॥२४॥
रथमास्थाय हर्यश्वं दिव्यं हुण्डासुरं जहि ॥
तत्‌श्रुत्वा नहुषो हृष्‍टो रथं नत्वारुरोह तम् ॥२५॥
असे सांगून श्रीसद्गुरुंनी त्याला युद्धाकरिता पाठविले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा श्रीनहुष भक्तीने श्रीसद्गुरुजींना नमस्कार करुन व श्रीदत्तांचे स्मरण करुन असे म्हणाला की, ॥२१॥
"जो गर्भाधानापासून आजपर्यंत स्नेहाने माझे रक्षण करता झाला तो श्रीअत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो." ॥२२॥
याप्रमाणे बोलून तो श्रीनहुष, हुंडासुराला मारण्यासाठी गमन करिता झाला. त्या वेळी देव पुष्पवृष्‍टी करते झाले व ऋषी आशीर्वाद देते झाले. ॥२३॥
त्या वेळी श्रीइंद्राच्या आज्ञेने त्याचा सारथी श्रीमातली, श्रीनहुषाजवळ रथासह येऊन असे म्हणाला की, "मला देवेंद्राने तुला साहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे. म्हणून मी आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर." ते ऐकून श्रीनहुष आनंदित होऊन व नमस्कार करुन रथामध्ये बसता झाला. ॥२४-२५॥
पायूक्तमन्त्रैः सन्नद्धो ययौ हन्तुं महासुरम् ॥
तत्राथ तत्सहायार्थं प्रापुर्दैत्यारिसैनिकाः ॥२६॥
सिद्धगुह्यकगन्धर्वयक्षविद्याधरोरगैः ॥
कृतं कलकलाशब्दं श्रुत्वा भीतोऽसुरोऽब्रवीत् ॥२७॥
दूत गच्छ कुतः शब्दस्तज्ज्ञात्वैहि पुनर्द्रुतम् ॥
गत्वा दूतोऽपि यत्नेन ज्ञात्वैत्याहायुनन्दनः ॥२८॥
शूर इन्द्ररथारुढो नहुषोऽजेय आगतः ॥
इत्या-कर्ण्यासुरः क्रुद्धो भार्यां दासीं च बल्लवम् ॥२९॥
हतो न वार्भो ब्रूतेति पप्रच्छ स पुनः पुनः ॥
ते हतो भवता लीढः सत्यमित्यूचूरासुरः ॥३०॥
वेदोक्तमंत्रांनी सन्नद्ध होऊन (चिलखत घालून) तो महिषासुराला मारण्यासाठी जाता झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या
साहाय्यासाठी देवसैनिक प्राप्त झाले. ॥२६॥
श्रीनहुषाचे सैनिक सिद्ध, गुह्यक, गंधर्व, यक्ष, विद्याधर, सर्प यांनी केलेला कलकला शब्द ऐकून, भयभीत झालेला हुंडासुर असे म्हणाला की, ॥२७॥ "हे दुता ! जा, हा मोठा कोलाहल शब्द कोठून ऐकू येत आहे ते जाणून लवकर परत ये." दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय आहे ते जाणून परत येऊन हुंडासुरास असे म्हणाला की, "आयुराजाचा पुत्र नहुष, मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धाकरिता आलेला आहे." हे ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासुर, भार्या, दासी व आचारी यांना हाक मारुन असे विचारता झाला की, "अरे ! तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा." तेव्हा ते असे म्हणाले की, "त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. ॥२८-२९-३०॥
दैवं हि बलवन्मत्वा दैत्यान् प्राहोग्रशासनः ।
सर्वैर्योद्धुंहि गन्तव्यं भीरुन्हन्मि क्षणादिह ॥३१॥
इत्यादिश्यासुरान् योद्धुं सन्नद्धोऽगात्स तैः सह ॥
क्रुद्धो हुण्डः समभ्येत्य नहुषं प्राह भीमवाक् ॥३२॥
मा गर्ज गर्ज मर्त्योत्‍थ हुण्डोऽस्मीह प्रतापवान् ॥
जीवन्नैष्यसि पश्चात्त्वं सहदेवैर्ममाग्रतः ॥३३॥
राजाह सोमवंशस्य चरितं क्वापि नेदृशम् ॥
शूरोऽसि यदि युद्धस्व वावदूकतयात्र किम् ॥३४॥
मां हन्तुमुद्यतस्थापि तव प्राणहरोऽस्म्यहम् ॥
दत्तात्रेयाभिगुप्तोऽस्मि को मूढो मां प्रधर्षयेत् ॥३५॥
खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून, ज्याची आज्ञा अत्यंत उग्र व कठोर आहे, असा तो हुंडासुर दैत्यांना असे म्हाणाला की, " तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जे कोणी भिऊन राहतील त्यांना येथेच एका क्षणात मी ठार मारीन." ॥३१॥
याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करुन तो हुंडासुर, चिलखत घालून दैत्य सेनेसह श्रीनहुषाबरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासुर गर्जना करीत श्रीनहुषासमोर येऊन त्याला असे म्हणाला की, ॥३२॥
"अरे माणसाच्या पोरा ! उगीच गर्जना करु नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासुर आहे. तू माझ्यापुढे युद्धाकरिता उभा राहशील; तर या देवांसह जिवंत परत जाणार नाहीस." ॥३३॥
ते ऐकून श्रीनहुष असे म्हणाला की, "चंद्रवंशांत उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असशील; तर युद्ध कर. येथे नुसता वाचाळपणा काय कामाचा ? ॥३४॥
प्रथमपासूनच मला मारण्यासाठी तू टपाला आहेस. पण तुझाच प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान् श्रीदत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील ?" ॥३५॥
इत्युक्‍त्वा निष्‍ठुरं चापमुद्यम्याकर्णमाशुगान् ॥
सन्धाय च ससैन्यौ तौ युयुधा ते परस्परम् ॥३६॥
न दिवा न निशा यत्र भ्राजते तुमुलेतराम् ॥
हस्तिनो वाजिनो विद्धा मृता भग्ना रथा अपि ॥३७॥
असुराणां ववू रक्तस्त्रवन्त्यो मांसकर्दमाः ॥
गुरुं प्रणम्य नहुषः स्मृत्वा चैवात्रिनन्दनम् ॥३८॥
ऐन्द्रीं शक्तिं मुमोचास्मै तया भिन्नो ममार सः ॥
अथैत्य जयिनं सार्द्धं रम्भयाऽशोकसुन्दरी ॥३९॥
प्राहास्मि धर्मपत्नी ते नहुषोपयमस्व माम्॥
स प्राहाग्रे वरिष्यामि गुरोर्मे यदि रोचते ॥४०॥
असे कठोर बोलून, धनुष्य आकर्ण ओढून, त्यावर बाण लावून, सैन्यासह ते परस्पर युद्ध करते झाले. ॥३६
अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती-घोडे घायाळ झाले. काही मृत झाले. रथही भग्न झाले. ॥३७॥
मांसरुपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी श्रीसद्गुरुंजीना प्रणाम करुन व अत्रिनंदन श्रीदत्तात्रेयांचे स्मरण करुन श्रीनहुषाने वासवी शक्ती हुंडासुरावर सोडली. तिच्या योगाने तो छिन्नभिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंभेला बरोबर घेऊन अशोकसुंदरी, त्या विजयी श्रीनहुषाकडे येऊन असे म्हणाली की, "हे नहुषा ! तुझी मी धर्मपत्नी आहे म्हणून माझ्याबरोबर तू विवाह कर." हे ऐकून श्रीनहूष असे म्हणाला की, "गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्यासमोरच मी तुझ्याशी विवाह करीन. हे जर तुला पटत असेल तर पाहा." ॥३८-३९-४०॥
तथेत्युक्‍त्वा रथे तस्य सा रम्भा चास्थिता मुदा ॥
नहुषोऽभ्येत्य गुरवे नत्वा सर्वं न्यवेदयत् ॥४१॥
हृष्‍टो वसिष्‍ठ उद्वाहं सुलग्नेऽकारयत्तयोः
द्रष्टुं प्रस्थापयामास पितरौ नहुषं मुनिः ॥४२॥
नत्वा गुरुं रथारुढः प्रभयार्क इव स्त्रिया ॥
पितरावेत्य तच्छोकं जहार परिसान्त्वयन् ॥४३॥
सरथं मातलिं रम्भां स्वर्गाय प्रेरयन्नतः ॥
प्रभोर्वरं गुरोर्वाक्यं श्रुत्वायुश्चेन्दुमत्यपि ॥४४॥
रतिस्मरोपमौ दृष्‍टवा स्नुषापुत्रौ ननन्दतुः ॥
पित्राभिषिक्तो विधिवत् पित्र्यं राज्यं शशास सः ॥४५॥
सम्राट् चैन्द्रं पदं भेजे चिरं तेनैव वर्ष्मणा ॥
वानप्रस्थविधानेन महिष्यायुः समं वनम् ॥४६॥
उषित्वाऽत्रिसुतं ध्यायन् लेभे सायुज्यमक्षयम्॥
श्रीसत्यदत्तमर्थार्थीं भजन्नेवं क्रमान्नृपः ॥
मुक्त एवं तन्महिमा कोऽपि भक्तो न नश्यति ॥४७॥
इति श्रीहृत्पुण्डरीकाधिष्‍ठित श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य
श्रीवासुदेवानन्दसरस्वतीयतिमतिकलिते श्रीसत्यदत्तोपाख्याने चतुर्थोऽध्यायः ॥४८॥श्रीदत्त॥
"बरे आहे "असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती व रंभा बसली." श्रीनहुषाने श्रीवसिष्‍ठऋषींकडे येऊन सर्व वृत्त कथन केले. ॥४१॥
ते ऐकून आनंदित झालेले श्रीवसिष्‍ठमहर्षी, सुलग्नसमयी अशोकसुंदरी व श्रीनहुष यांचा विवाह करते झाले आणि नंतर मातापितरांना भेटण्यासाठी श्रीनहुषाला पत्नीसह पाठविते झाले. ॥४२॥
श्रीवसिष्‍ठ-ऋषींना नमस्कार करुन, प्रभेसह निघणार्‍या सूर्याप्रमाणे, आपल्या भार्येसह रथारुढ झालेला श्रीनहुष मातापितरांच्याकडे आला आणि सांत्वनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करता झाला. ॥४३॥
श्रीदत्तात्रेयांचा वर व श्रीसद्गुरुवाक्य यांची आठवण होऊन, तसेच रती व मदनाप्रमाणे असणार्‍या आपल्या सुनेला व मुलाला पाहून श्रीआयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित होते झाले. श्रीआयुराजाने नंतर त्या श्रीनहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पित्यापासून प्राप्त झालेल्या राज्याचे रक्षण श्रीनहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. ॥४४॥
सम्राट् श्रीनहुष इहलोकी उत्तम सुख भोगून, त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचाही उपभोग घेता झाला. तसेच श्रीआयुराजाही यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारुन महिषीसह वनामध्येच वास्तव्य करिता झाला आणि नित्य अत्रितनय श्रीदत्तप्रभूंच्या ध्यानप्रभावाने अक्षय्य अशा सायुज्य मुक्तिप्रत प्राप्त झाला. ॥४५-४६॥
अर्थार्थी भक्त श्रीआयुराजाही श्रीदत्तात्रेयांची सेवा करुन ऐहिक सर्व सुखांचा उपभोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्रीदत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही, इतकेच नव्हे; तर उत्तरोत्तर कल्याणासच प्राप्त
होतो. ॥४७॥
॥इति श्रीसत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP