पोवाडा - अहिल्याबाई होळकरीण

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.
अहिल्याबाईचा जन्म इ.स. १७२५ साली झाला. तिचे लग्न वयाचे आठवे वर्षी म्हणजे १७३३ मधे मल्हारराव होळकर सुभेदार यांचा पुत्र खंडेराव याजबरोबर झाले. खंडेराव १७५४ साली मृत्यू पावला. अहिल्याबाईची राजकारणदक्षता, शौर्य व परोपकारी वृत्ति इतक्या वयापासूनच मल्हारराव यांचे अनुभवास आली असल्याकारणाने, ते प्रसंग विशेषी तिची सल्ला घेत व तिच्यावर कामकाजही सोपवीत. अहिल्या बाईचा मुलगा मालीराव हा दुर्व्यसनी होता. तो व्यसनाचे नादात अत्यंत क्रूर कृत्येही करी. मल्हारराव होळकर हे सन १७६६ मधे मृत्यू पावले व पुढे एकच वर्षाने मालीरावही मरण पावला. यद्यपि तुकोजीराव होळकर-कै. मल्हारराव यांचा मानीव पुत्र -सेनापति म्हणून मोहिमांवर जाऊन शिपाई दर्जाचे सर्व काम करीत होता, तरी होळकर राशतीचा अंतस्थ राजकारभार सन १७६६ पासून अहल्याबाईच पहात होती. तो तिने मोठ्या दक्षतेने व चातुर्याने आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे माहे आगष्ट सन १७९५ पर्यंत, चालविला. ह्या पोवाड्यात अहिल्या बाईंच्या धार्मिक औदार्याचे विशेषतः वर्णन आहे.


सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥ ध्रुवपद ॥

महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी । सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्‍नखाणी ।

दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।

वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥चाल॥

उद्धार कुळाचा केला । पण आपला सिद्धिस नेला । महेश्वरास जो कुणी गेला ॥चाल पहिली॥

राहिला तेथे तो घेउन बाप भाई । संसार चालवी दीन दुबळ्यांची आई ॥१॥

प्रत्यही द्यावी ब्राह्मणास दश दाने । ऐकावी पुराणे बहुत आनंदाने ।

लाविली हरी हर मंदिरी तावदाने । गर्जती देउळे कीर्तन नादाने ॥

शोभती होम कुंडे द्विजवृंदाने । टाकिती हजारो नमात अवदाने ॥चाल॥

कधी कोटि लिंगे करवावी । वधुवरे कधि मिरवावी । अर्भका दुधे पुरवावी ॥चा०प०॥

पर्वणी पाहुन दान देतसे गाई । जपमाळ अखंडित हाती वर्णू काई ॥२॥

जेथे ज्योतिलिंग जेथे तीर्थ महा क्षेत्रे । घातली तेथे नेहमीच अन्नछत्रे ।

आलि जरा झालि काही ज्याची विकल गात्रे । पुरवावी त्यास औषधे वस्त्रे पात्रे ।

कितिकांनी घेतली स्मार्त अग्निहोत्रे । दिली स्वास्थे करुन त्या भटास क्षणमात्रे ॥चाल॥

आधि इच्छा भोजन द्यावे । उपरांतिक तीर्थ घ्यावे । वाढून ताट वर मग न्यावे ॥चा०प०॥

जेविल्या सर्व मग आपण अन्न खाई । रघुवीर चरित्रे रात्रीस गोड गाई ॥३॥

आल्या यात्रेकर्‍याला वाटी पंचेजोडे । कोणास आंगरखे कोणास नवे जोडे ।

कोणास महेश्वरी उंच धोत्रजोडे ।

कोणास दुशाला कोणास बट घोडे । गवयास मिळाति कडी कंठ्या तोडे ।

घाली गिराशांचे पायात बिड्या खोडे ॥चाल॥

बांधिले घाट मठ पार । कुठे शिवास संतत धार । कुठे वनात पाणी गार ॥चाल पहिली॥

त्यासाठी मुशाफर काय धावत जाई । विश्रांत पावती पाहुन अमराई ॥४॥

किती सूर्य ग्रहण संधीत तुळा केल्या । कधी कनक रौप्य कधी गुळाच्या भेल्या ।

संभाळ करून काशीस यात्रा नेल्या । कावडी शतावधी रामेश्वरी गेल्या ।

संसारी असुन वासना जिच्या मेल्या । तिजपुढे सहज मग मुक्ति उभ्या ठेल्या ॥चाल॥

कवी गंगु हैबती म्हणती ॥ पुण्याची कोण करी गणती ॥ राज्यास होती पडपण ती ॥चा०प०॥

महादेव गुणीचे लक्ष तिचे पाई । कवनात प्रभाकर करितसे चतुराई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP