पोवाडा - दुसरे बाजीराव पेशवे यांजवर पोवाडा १

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

ह्या पेशव्यांचा जन्म इ.स. १७७५ चे जानेवारी महिन्यात धार मुक्कामी झाला. ह्यांचे बाळपण आनंदवल्ली व कोपरगाव वगैरे मुक्कामी जाऊन पुढे ते शिवनेरी किल्ल्यात होते. सवाई माधवराव साहेब हे आक्टोबर१७९५ महिन्यात मृत्यू पावल्यावर, नाना फडणीस, परशराम भाऊ, शिंदे, होळकर वगैरेच्या दरम्यान कित्येक राजकारणे होऊन बाजीरावास दिजंबर १७९६ मधे पेशवे पदावर स्थापण्यात आले. यांची बहुतेक कारकीर्द दान धर्म, राजकारणाचे ज्यास काडीभरही ज्ञान नाही अशा लोकांची संगत व सल्ला, स्वारी शिकारीचा पूर्ण अभाव, आणि देशी व परदेशी फौजबंद सरदाराचे द्वेश संपादन, यात गेली. अखेर सन १८१७ चे नवंबर महिन्यात खडकीचे लढाईत इंग्रजांनी पराभव करून ता. १७ रोजी शनवार वाड्यावर आपला बावटा चढविला. आणि बाजीराव याणीं पळ काढला. याप्रमाणे पळण्यात सुमारे सहा महिने लोटल्यावर महू येथे ता. ३ जून १८१८ रोजी पेनशनाचे मोबदला मराठेशाहीचे उदक मालकमसाहेब यांचे हातावर सोडून ब्रह्मवर्तास रवाना झाले, आणि तेथे काळक्रमण करीत असता १८५१ जानेवारी महिन्यात मृत्यू पावले. सदरील हकीकतीचे वर्णन ह्या पोवाड्यात संक्षेपाने केले आहे.


यशस्वी झाले श्रीमंत पहिले सवेलढायाला ।

आताच आले अपेश कोठुन बाजीरायाला ॥ध्रु०॥

दादासाहेब पुण्यप्रतापी निस्सीम शिवभक्त ।

स्वारी करुन दरसाल हालविले दिल्लीचे तक्त ।

आनंदीबाई सुशील शिरोमणी सगुणसंयुक्त ।

पतिभजनी सादर घडोघडी अखंड आसक्त ।

बाजिरावसाहेब सदोदित जो जीवनमुक्त ।

जन्मांतरी तप केले निराहारी राहुन एकभुक्त ॥चा०॥

शके सोळाशे शहाण्णवी अति उत्तम जयसंवत्सरी ।

पौषशुद्ध दशमिस भरणी नक्षत्र भौमवासरी ।

ठीक पहिल्या प्रहरात जन्मले रात्रीच्या अवसरी ॥चा०॥

पहा बाईसाहेब धारमुक्कामी राहुनी ।

कंठिला काळ काही दिवस दुःख साहुनी ।

केले तेथुन कुच सुपुत्रमुख पाहुनी ॥चा०॥

गंगातिरी येऊन राहिली अपूर्व ठायाला ।

कचेश्वर शुक्लेश्वर सन्निध दर्शन द्यायला ॥१॥

समाधान सर्वास वाटले कोपरगावास ।

स्वारी शिकारीस बरोबर जाती कथा उत्सवास ।

जे करणे ते पुसून करिती अमृतरावास ।

एकास नख लागल्या दुःख होई त्रिवर्ग भावास ।

असे असुन नानांनी मांडिला अति सासुरवास ।

हळुच नेऊन जुन्नरास ठेविले श्रीमंतरावास ॥चाल०॥

इतक्या संधीत सवाई माधवराव मरण पावले ।

तेव्हापासून नानांनी राक्षसी कपट डौल दाविले ।

परशुराम रामचंद्र निरोपुन मग वाटेस लाविले ॥चा०॥

आले खडकी पुलावर श्रीमंतास घेउनी ।

दर्शनास नाना परिवारे येउनी ।

दाखविली याद रावास एकांती नेऊनी ॥चाल पहिली॥

भय मानून शिंद्यांचे निघाले बाईस जायाला ।

सातार्‍यात राहून लागले भेद करायाला ॥२॥

आपण बाळोबा होउन एक केली खचीत मसलत ।

चिमाप्पास धनी करून राखिलि जुनाट दौलत ।

करारात दोघांच्या झाली काही किंचित गफलत ।

म्हणुनी फिरून नानांनी उलटी मारुनी केली गल्लत ।

सूत्रधारी जो पुरुष ज्याच्या गुणास जग भुलत ।

हातात सगळे दोर पतंगापरी फोजा हालत ॥चाल॥

परशुराम रामचंद्र आणि बाळोबास ठाउक रण ।

राज्यकारणी नव्हेत एक केसरी एक वारण ।

कठीण गाठ नानांशी न चाले तेथे जारण मारण ॥चाल॥

महाडास बसुनी नानांनी बेत ठरविले ।

बाळोबास शिंद्यांकडून कैद करविले ।

शिवनेरी गडावर पटवर्धन धरविले ॥चाल पहिली॥

रास्ते झाले जामीन प्रसंगी अवघड समयाला ॥

असा गुजरला वक्त नेले मांडवगण पाहायाला ॥३॥

घडी बसवून महाडाहुन नाना त्वरितच उलटले ।

द्वेषबुद्धि विसरून संशय सर्वांचे फिटले ॥

शिंदे भोसले होळकर मुश्रुलमुल्क एकवटले ।

दलबादल डेर्‍यात श्रीमंतासंन्निध संगटले ।

बाजीराव राज्यावर बसता आनंदे जन नटले ।

तोफांचे भडिमार हजारो बार तेव्हा सुटले ॥चाल॥

नंतर नाना एकविसांमधी समाधीस्त झाले ।

महाल मुलुख शिंद्यांनी बावीसामधि आपले पाहिले ।

यशवंतराव होळकर लढाईस जमुन उभे राहिले ॥चाल॥

शिंद्यांनी करून माळव्यात खातरजमा ।

केली फौज गंगेच्या रोखावर खुप जमा ।

सोडीना कंबर कधी काढिना पायजमा ॥चाल पहिली॥

कुच मुकाम दररोज बनेना पलंगी निजायाला ॥

घेई जोठाची पचंग समरी कोण जिंकील याला ॥४॥

दिला मार पळणास जातिने पुण्यास येऊनिया ।

शहर सभोते वेढुन बसले चौक्या ठेवुनिया ।

खंडेराव रास्त्यांनी प्रभुला वसईस नेउनिया ।

सुखात होते स्वस्थ सतत पंचामृत जेउनिया ।

इंग्रजास कुमकेस प्रसंगी बरोबर घेउनिया ।

सरंजाम अलिबहादरपैकी तयास देउनिया ॥चाल॥

अगोदर सोजर तरुक धावले मप्याशी दक्षिणी ।

त्या भयाने होळकर परतले नाही कोणी संरक्षणी ।

भरघोसाने श्रीमंत त्यावर पुण्यास येता क्षणी ॥चाल॥

झाला बंदोबस्त सर्वही पहिल्यासारखा ।

परि घरात शिरला शत्रु सबळ पारखा ।

लाल शरीर टोपी अंगी आठ प्रहर अंगरखा ॥चाल पहिली॥

धर्म कर्म ना जातपात स्थल नाही बसायाला ।

असे असुन सम्पूर्ण व्यापला प्राण हरायाला ॥५॥

फार दिवस आधि जपत होते या इंग्रज राज्याला ।

अनायासे झाले निमित्त पंढरपुरास कज्जाला ।

संकट पडले काहि सुचेना प्रधानपूज्याला ।

रती फिरली सारांश मिळाले लोक अपूज्याला ।

भय चिंता रोगांनी ग्रासिले काळीज मज्जाला ।

पदर पसरिती उणाख आणखी नीच निर्लज्जाला ॥चाल॥

परम कठिण वाटले आठवले त्रिभुवन राव बाजीला ।

थोर थोर मध्यस्थ घातले साहेबांचे समजीला ।

निरुपाय जाणुनी हवाली केले मग त्रिंबकजीला ॥चाल॥

ठेविला बंदोबस्तीने नेउन साष्टीस ।

एक वर्ष लोटल्यानंतर या गोष्टीस ॥

केले गच्छ भाद्रपद वद्यांतिल षष्ठीस ॥चाल पहिली॥

स्वदेशी जागा बिकट पाहिली निसुर बसायाला ।

शोध लावून साहेबांणी तेथे पाठविले धरायाला ॥६॥

इंग्रजाचा अन्यायी निघाला पाठ पेशव्याची ।

म्हणून साहेब लोकांनी आरंभिली अगळिक दाव्याची ।

वसई प्रांत कल्याण गेली गुजराथ पुराव्याची ।

रायगड सिंहगड बेलाग जागा केवळ विसाव्याची ।

कर्नाटक दिले लिहून ठाणी बैसली पराव्यांची ।

कोणास न कळे पुढील इमारत इंग्रजी काव्याची ॥चाल॥

अश्विनमासी वद्य एकादशी दोन प्रहर लोटता ।

श्रीमंत बापुसाहेब एकांती पर्वतीस भेटता ।

हुकूम होताक्षणी रणांगणी मग फौजा लोटता ॥चाल॥

बैसले राव दुर्बिणीत युद्ध लक्षित ।

भले भले उभे सरदारसैन्य रक्षित ।

लागुन गोळी ठार झाले मोर दिक्षित ॥चाल प०॥

तसाच पांडोबांनी उशीर नाही केला उठायाला ।

उडी सरशी तरवार करुन गेले विलयाला ॥७॥

आला त्रास वाटते फार ह्यावरून लक्षुमीस ।

विन्मुख होऊन श्रीमंत आणिले चहुकडून खामीस ।

फसले शके सत्राशे एकुण चाळीसच्या रणभूमीस ।

ईश्वर संवत्सरात कार्तिक शुक्ल अष्टमीस ।

प्रहर दिसा रविवारी सर्व आले आरब गुरमीस ।

खुप मोर्चा बांधून विनविती श्रीमंत स्वामीस ॥चाल॥

दारूगोळी पुरवावी आम्ही आज हटकुन त्यांशी लढू ।

गर्दीस मिळवून देऊन पलटणे क्षणात डोंगर चढू ।

शिपाइगिरीची शर्थ करून समशेरी सोन्याने मढू ॥चाल॥

लाविले बापुसाहेबांनी तोंड जाउनी ।

दीड प्रहर रात्र होते श्रीमंत दम खाउनी ।

गेली स्वारी महाला हिलाला मग लावुनी ॥चाल पहिली॥

जलदी करुनी साहेबांनी लाविले निशाण पुणियाला ।

खेचुन वाड्याबाहेर काढले कदीम शिपायाला ॥८॥

सकळ शहरचे लोक हजारो हजार हळहळती ।

सौख्य स्मरून राज्याचे मीनापरी अखंड तळमळती ।

रात्रंदिवस श्रीमंत न घेता उसंत पुढे पळती ।

यमस्वरूप पलटणे मागे एकदाच खळबळती ।

धडाक्याने तोफांच्या वृक्ष आणि पर्वत हादळती ।

त्यात संधी साधून एकाएकी दुरून कोसळती ॥चाल॥

भणाण झाले सैन्य सोडिली कितीकांनी सोबत ।

कितीक इमानी बरोबर झुकले घर टाकुनी चुंबत ।

कितीक मुकामी अन्न मिळेना गेली साहेब नौबत ॥चाल॥

कोठे डेरे दांडे कोठे उंट तट्टे राहिली ।

कोठे सहज होऊन झटपट रक्ते वाहली ।

कोठे श्रीमंत बाईसाहेब सडी पाहिली ॥चाल पहिली॥

बहुत कोमावली पाहवेना दृष्टीने उभयाला ।

हर हर नारायण असे कसे केले सखयाला ॥९॥

माघ शुद्ध पौर्णिमेस बापुसाहेब रणी भिडले ।

जखम करुन जर्नेलास फिरता जन म्हणती पडले ।

गोविंदराव घोरपड्याचे दोन हात भले झडले ।

आनंदराव बाबर ढिगामधी खुप जाऊन गढले ।

मानाजी शिंदे मागे फिरताना डोई देऊन अडले ।

छत्रपती महाराज तळावर समस्त सापडले ॥चाल॥

घाबरले श्रीमंत सुचेना मन गेले वेधुनी ।

बाईसाहेबांना तशिच घोड्यावर पाठीस बांधुनी ।

नेले काढुनिया अमृतराव बळवंत ज्येष्ठ बंधुनी ॥चाल॥

दहा प्रहर पुरे पंतप्रधान श्रम पावले ।

नाही स्नान शयन नाही स्वस्थपणे जेवले ।

आले आले ऐकता उठपळ राव धावले ॥चाल॥

गर्भगळित जाहले लागले शुष्क दिसायाला ।

बाईसाहेबांना फुरसद न पडे बसून न्हायाला ॥१०॥

दिवाळी आणि संक्रांत कंठिला दुःखांत फाल्गुन ।

रागरंग नाही आनंद ठाऊक रायालागुन ।

सदैव चिंताग्रस्त शब्द बोलती वैतागुन ।

कर जोडून फौजेस पाहिले घडोघडी सांगुन ।

धैर्य धरून कोणी कसून लढेना क्रियेस जागुन ।

कर्म पुढे प्रारब्ध धावते लगबग मागुन ॥चालव

पांढरकवड्यावर रचविल्या धनगारा अद्भुत ।

थंडीने मेले लोक उठविले गारपगार्‍यांनी भुत ।

बेफाम होते लष्कर नव्हती काही वार्ता संभुत ॥चाल॥

ओधवले कसे सर्वांचे समयी संचित ।

कडकडून पडले गगन जसे अवचित ।

दुःखाचे झाले डोंगर नाही सुख किंचित ॥चाल पहिली॥

अनुचित घडली गोष्ट दिसेना ठाव लपायाला ।

कोणे ठिकाणी नदीत लागले सैन्य बुडायाला ॥११॥

जे श्रीमंत सुकुमार वनांतरी ते भटकत फिरती ।

कळेल तिकडे भरदिसास प्रभु काट्यामधी शिरती ॥

आपला घोडा आपण स्वहस्ते चुचकारुन धरती ।

खाली पसरुन उपवस्त्र दिलगिरीत वर निद्रा करती ॥

अस्तमानी कधी रात्री भात भक्षिती पाटावरती ।

दरकुच दर मजलीस कृपेतिल सेवक अंतरती ॥चाल॥

पेशव्यांचे वंशात नाही कोणी असा कट्टर पाहिला ।

हत्ती घोडे उंट खजीना जेथील तेथे राहिला ।

बाजीराव होय धन्य म्हणून यापरी आकांत साहिला ॥चाल॥

नर्मदेस शालिवाहन शक संपला ।

त्या ठायी ठेविल शकपंती आपला ।

भरचंद्रराहुग्रहणात जसा लोपला ॥चाल पहिली॥

सांब कसा कोपला लागले गलीम लुटायाला ।

सिद्ध झाले मालकमास राव राजेंद्र मिळायाला ॥१२॥

समस्त लष्कर दुःखित पाहुनी श्रीमंत गहिवरले ।

सद्गद जाला कंठ नेत्र दोन्ही पाण्याने भरले ।

आम्हापुढे जे शत्रु रणांगणी नाही क्षणभर ठरले ।

ते आमच्या जन्मास दुष्ट चांडाळ पुरुन उरले ।

केवळ असा विश्वासघात केल्याने कोण त ले ।

इंद्र चंद्र आदिकरुन आल्या संकटास अनुसरले ॥चाल॥

तुमची आमची हीच भेट आता राव सर्वांना सांगती ।

कृपालोभ परिपूर्ण करित जा द्या दर्शन मागती ।

ऐसे उत्तर ऐकून शतावधी पायी सेवक लागती ।

॥चाल॥ महाराज उपेक्षुन आम्हांस जाऊ नये ।

दूर ढकलुन शरणागतास लावू नये ।

पहाकसबाचे घर गाईस दावू नये ॥चाल पहिली॥

हिंमत सोडू नये सर्व येईल पुढे उदयाला ।

कोण काळ कोण दिवस धन्यांनी पुसावे ह्रदयाला ॥१३॥

प्राण असुन शरिरात बुडालो वियोग लोटात ।

बरोबर येतो म्हणुन घालिती किती डोयी पोटात ।

निराश जाणुन झाली रडारड मराठी गोटात ।

निर्दयांनी लांबविली पालखी पलटण कोटात ।

मातबर लोकांची ओझी चालतात मोटात ।

गरीब करी गुजराण प्रसंगी एक्या जोटात ॥चाल॥

कुंकावाचुन कपाळ मंगळसूत्रावाचुन गळा ।

तया सैन्यसमुदाय उदाशित रंग दिसे वेगळा ।

धर्म बुडाला अधर्म दुनियेमधि आगळा ॥चाल॥

कसे प्रभूंनी ब्रह्मावर्त शहर वसविले ।

अगदीच पुण्याच्या लोकांना फसविले ।

हुर हुर करीत का उन्हात बसविले ॥चाल पहिली ॥

काही तर तोड पुढे दिसेना जीव जगायाला ।

कोणास जावे शरण कोण हरि देईल खायाला ॥१४॥

विपरित आला काळ मेरुला गिळले मुंग्यांनी ।

पंडीतास जिंकिले सभेमध्ये मदांध भंग्यांनी ।

भीमास आणिले हारीस रणांगणी अशक्त लुंग्यांनी ।

कुबेरास पळविले अकिंचन कसे तेलंग्यांनी ।

जळी राघव माशास अडविले असंख्य झिंग्यांनी ।

जर्जर जाहला विष्णुवाहन बदकांचे दंग्यांनी ॥चाल॥

ईश्वरसत्ता विचित्र सारे दैवाने घडवीले ।

हरिश्चंद्र आणि रामचंद्र नळ पांडवास रडवीले ।

फितुर करुन सर्वांनी असले राज्य मात्र बुडवीले ॥चाल॥

म्हणे गंगु हैबती पावेल जर शंकर ।

तर दृष्टीपुढे पडतील राव लवकर ।

महादेव गुणीजन श्रीमंतांचे चाकर ॥चाल पहिली ॥

प्रभाकरची जडण घडण कडकडीत म्हणायाला ।

धुरू नारो गोविंद वंदी त्या निशिदिन पायाला ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP