पोवाडा - यशवंतराव होळकरावर

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.


सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती ।

भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती ।

बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती ।

नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा ।

मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा ।

उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा ।

खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली ।

अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली ।

सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली ।

तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती ।

सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति ।

बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती ।

फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी ।

जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला ।

शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा ।

मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा ।

अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी ।

सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP