केकावली - प्रसंग ३

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


शिवे न तुझिया पदा अदयताख्य दोष क्षण;

प्रभो ! चुकतसो, तरी करिसि तूचि संरक्षण ।

नसेचि शरणागती घडलि सत्य अद्यापि ती;

रुचे विषय; ज्या मिळे अमृत, ते न मद्या पिती ॥४१॥

(क्षमस्व अशी प्रार्थना)

विपाक न गणोनि म्या प्रकट आपुल्या घातके.

कळोनि अमिते बळे विविध जोडिली पातके ।

'क्षमस्व भगवन्नजामिलसखोऽस्मि' ऐसे तुला

म्हणे नमुनिया सदुस्तरविपन्नदीसेतुला ॥४२॥

(भगवत्परीक्षेची वेळ)

नव्हे अनृत, सत्य ते, अचल ऊचलीला करे

तुवां हरिमदापहे बृहदुदारलीलाकरे ।

समुद्धरसि एकटा जरि जडासि या कर्दमी,

म्हणेन भुवनत्रयी तरि तुला 'भला मर्द, मी, ॥४३॥

(वैद्याचा दृष्टांत)

चिकित्सक 'भला भला' म्हणुनि फार वाखाणिला,

जरी बहुजनामयद्रुम समूळही खाणिला, ।

तथापि अतिदुःसहस्वगदशत्रुच्या अत्ययाविना,

न ह्रदयी धरी सरुज पामर प्रत्यया ॥४४॥

(खोद्धारार्थ उताविळपणा)

म्हणा मज उताविळा; गुणचि घेतला; घाबरे

असो मन असेचि बा ! भजकबर्हिमेघा ! बरे ।

दिसे क्षणिक सर्व हे भरवसा घडीचा कसे

धरील मन ? आधिने बहु परिभ्रमे चाकसे ॥४५॥

कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली;

पुरःसरगदांसवे झगडतां तनू भागली ।

सहाय दुसरा नसे तुजविणे बळे आगळा;

न हो जरि उताविळा, स्वरिपु कापितो हा गळा ॥४६॥

(प्रभुविषयी काळजी)

अवश्य करणे खरे प्रणतरक्षण स्वोचित;

उशीर मग का ? बसो कृपण मीहि का शोचित ?

नव्हे प्रभुवरा ! तुम्हा उचित एकटे धांवणे;

कृतांत शिवला नसे तव, दिसे बरे पावणे ॥४७॥

'कसे तरि करू तुझे अवन; पूरवू आळ जी

असेल मनि; आमुची तुज कशास रे काळजी ?' ।

असे जरि म्हणाल हो प्रियतमा ! जगज्जीवना !

तदाश्रितमृगासि ती सुखसमृद्धि बा ! जी वना ॥४८॥

सुखेचि सुख बाळका प्रकट होय मातेचिया;

तिला घडति जे श्रम, प्रियजनोत्तमा ! तेचि या; ।

म्हणोनि न शिवो पळ क्षणहि कष्ट जीवा ! तुला,

सुखेचि सुख बाळका प्रकट होय मातेचिया;

तिला घडति जे श्रम, प्रियजनोत्तमा ! तेचि या; ।

म्हणोनि न शिवो पळ क्षणहि कष्ट जीवा ! तुला,

विपज्जलधिसेतुला, सकललोकजीवातुला ॥४९॥

(प्रभूला आयुरर्पण)

असोत तुज आमुची सकल भाविकायुर्बळे;

जगोनि बहु काय म्या सुकृत जोडिले दुर्बळे ? ।

असे प्रियसख्या ! सुखी बहुतकाळ; मायातमी

जना सुपथ दाखवी; मुदित सत्तमा ! यात मी ॥५०॥

(देवाचे अत्यंत क्षमाशीलत्व )

भले परिशिले सुरासुरनरी तसे लक्ष मी'

म्हणोत म्हणणार बा ! तुज असा नसेल क्षमी; ।

उरी भृगुपदाहती मिरवितोसि, अद्यापि ती,

कवी तव यशःकथा नवसुधानवद्या पिती ॥५१॥

(विषयवासनेचे दुर्निवार्यत्व)

'भवन्मतिस आवडे जरि, धनादिकांलागि ते

मदीय गुणकीर्तनश्रवण कां तरि त्यागिते ? ।'

असेहि म्हणशील बा ! जरि तरी तुझी मावली

तुज त्यजुनि पाजिता, कशि दुधाकडे धावली ? ॥५२॥

अनावर पिशाचिका विषयवासना सत्य, जी

असे करवि कृत्य, जी भुलविते, कधी न त्यजी; ।

म्हणोन तुज जाणत्या विनवितो, इला गाढ गा !

करीन मग, तू जरी म्हणसि, आपणा गाढ गा’ ॥५३॥

तुझ्या गुणकथा महासुरभि, त्यांत ही रासभी

शिरे विषयवासना; जसि शुका अहीरास भी, ।

तशी न इतरास भी; इस सदंडही हाकिती;

तथापि बहु लाथळी; मग अदंड मी हा किती ॥५४॥

(विषयवासनाक्षयार्थ प्रभुकृपाच समर्थ)

खरासुर जसा, तशी विषयवासना हे खरी;

हिचा वध करावया तुजच शक्ति आहे खरी; ।

बकि सुमति, ताटका लघु, न हे भली; लाजशी

उगाचि, तशि एक ही; व्रजवनांत लीला जशी ॥५५॥

कसे तरि असो मग; स्वपणरक्षणाकारणे

अवश्य शरणागतव्यसन तो स्वये वारणे; ।

तुम्हा विहित मुख्य हे; न पुसतां करा हो ! खरी

निजोक्ति; खर काय तो अधिक? संहरा हो ! खरी ॥५६॥

खरी करीतसे कशी तव जनीहि सत्ता पहा;

हिचा वध न निंद्य बा ! प्रबळ मूर्त सत्ताप हा; ।

’कथासुरभिचा रस स्वहित, पुष्कळ, स्वादुही,’

म्हणे, ’त्यजुनि कां मला निजधना, परखा दुही?’ ॥५७॥

(कथासुरभीचे अत्यंत कारुण्य)

कथासुरभि या भल्या स्वजननीहुनी वाटती;

शिशूंसि जरठांसही निरखितां रसे दाटती; ।

दुहोत भलते सदा, तरि न लेशही आटती;

स्ववत्समल भक्षिती परि न सर्वथा बाटती ॥

कथांसि उपमा दिली सुरभिची, दिसे नीट ती;

परंतु बहु मंद मी, म्हणुनि सच्छुती वीटती; ।

कथा निरुपमा तयांप्रति पशूपमा शुद्ध तें

नव्हेचि; न विचारिले बुधजनासि म्यां उद्धते ॥५९॥

असेहि उपदेशिती गुरु रहस्य मंदा रुचे

निजस्तव जसा तसा, अगुण घे न वंदारुचे; ।

म्हणोनि निमगस्तुता भलतसे तुला वानितो;

परंतु ह्रदयी महाजनभयास मी मानितो ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP