नागनाथ माहात्म्य - अज्ञानसिद्धकृत संकटहरणी - प्रसंग पाचवा

नागनाथ हे नवनाथापैकी असून ते साक्षात शंकराचाच अवतार होय.


श्री गुरु नागनाथाय नमः । जय जयाजी इच्छादानी ।

भक्तालागी निज शिरोमणी ।

अखंड ऐसा तुझे ध्यानी । संतकर्णी सांगती ॥१॥

सदा संत घरी वसे । तिष्ठसी तू परेश ।

आठविता संकटास । पावलासी नामी हरा ॥२॥

हर हरा दीन बंधु । कृपेचा तू करुणासिंधु ।

अखंड हेचि पाय वंदु । संत साधु हेचि भले ॥३॥

हेचि एक कामना । अंतःकरण मन बुद्धि जाणा ।

चित्त अहंकार गर्जना । माया सुमना हेचि भले ॥४॥

कर धावती पुजावया ।

चरण धावती सुमन तोडावया ।

डोळे भरी ध्यान पहावया ।

शिवराया हेचि भले ॥५॥

राऊळी पाखाळणी पाया । धावे उदक घेऊनिया ।

सखी माझी तुर्था । भोगी शिवराया हेचि भले ॥६॥

नामी मुद्रा भोगी समाधी । मेळवोनि संतमांदी ।

पुढे नाचेन कीर्तन छंदी ।

प्रेम मद उन्मादी हेचि भले ॥७॥

गुंफू हार सुमन माळा ।

चरणी माथा घालू संत गळा ।

प्रेम बुक्का लावू भाळा । पाहू डोळा हेचि भले ॥८॥

दोघे नाचू मागे पुढे । तू वाजवी डौर खोडे ।

तेणे मज अधिक वाढे ।

निचाडा चाड हेचि भले ॥९॥

अमूर्त मूर्त शिवसंत । आपणची होवोनि सभा महंत ।

मज नामी चेष्टवीत । आवडी बहुत हेचि भले ॥१०॥

कडकडाट शिव भजन । ऐकोनि आले सुरगण ।

स्वर्गी ध्वजा उभारून । वर्षाव सुमन हेचि भले ॥११॥

ब्रह्मानंद शिव कीर्तनी । कैलासी उभे गुढ्या तोरणी ।

विष्णु ब्रह्मा हात जोडोनी ।

कीर्तन ध्यानी हेचि भले ॥१२॥

ऐसा गौरव सांडोनी । काय मागू शूळपाणी ।

हेचि वारंवार धरणी ।

पडोनी मागणे हेचि आता ॥१३॥

संतात्मा तू शिवमूर्ती । संतोषीनी नामी कीर्ती ।

लळित कथा कीर्तनपंथी । प्रेमार्थी हेचि भले ॥१४॥

भक्ति नैवेद्य भाव ताटी । एकमेका कवळ ओठी ।

हेचि भोजन सारोटी । ताट वोटी हेचि भले ॥१५॥

उदक सप्रेम लोटणा । मुखशुद्धि शिवराणा ।

विडा वैराग्य रंगणा । माया सुमना हेचि भले ॥१६॥

गजबजोनी संतसभा । मध्ये पंचवदन उभा ।

एकमेका आनंद शोभा ।

अलभ्य लाभा हेचि भले ॥१७॥

अलभ्य लाभ बांधोनी गाठी ।

मी सुखे लावीन लंगोटी ।

घरी धान्य नसोका मुष्टी ।

भाजा कटकटी हेचि भले ॥१८॥

जन वेडे म्हणती मज । परी कैसा आहे ठाऊक तुज ।

काय मज पांथिकासी काज ।

सोडिली लाज हेचि भले ॥१९॥

तयासारिखे जरी चालावे ।

तरी का आपुले मुद्दल बुडवावे ।

पुनः पुनः यावे जावे ।

मग कासया प्रार्थावे हेचि भले ॥२०॥

बहुत काय बोलणे वाढू । तेचि होय तात्काळ कडू ।

विष अमृत गोड ना कडू । हेचि भले ॥२१॥

आता सर्व सांडणी मांडणी ।

येवोनी कळेना जठरी जननी ।

पुनः ऐसी उत्तम योनी । नामी मानी हेचि भले ॥२२॥

पाहोनी तुझे ध्यान रोकडे ।

अनंत जन्माचे संकट बिरडे ।

तुटोनिया संताकडे । पायी पडे संताचिया ॥२३॥

आता संत समर्थ उदार । शिव ध्यानी डोळाभर ।

उन्मदरसे मातले थोर । कैसे संसार राहातील ॥२४॥

ते शिवस्वरूप ध्यानी दृढ ॥

विसरले विषयसुख काबाड ।

कुंजरा लाकडे मुंगी खडे ।

विचारा चाड पुढिले प्रसंगी ॥२५॥

या श्रीगुरु नागनाथ योगी । हेचि संकट हरणा प्रसंगी ।

पुढे निरोपण श्रीनाथयोगी ।

वाणी सांगी कडकडाट ॥२६॥

इति श्री संकट हरणी शिव ग्रंथ ।

भावे प्रार्थिला कैलासनाथ ।

श्रोता सावधचित्त । प्रसंग वडवाळसिद्ध नागेश ।

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP