TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

रुखवताचे उखाणे

११६.

रुखवत आला, रुखवत आला काय काय परी, करडई नाजूक, पापडी साजूक, हळदीची वाटी, वेल्ह्याची पाने, मुंबईचा चुना, पुण्याचा कात, जुन्नरची सुपारी, नारायणगावचा व्यापारी, उंबर तो झुंबर, ती गेली रुक्मिणीच्या काना, विहीणीने आणला रुखवत येईना आमच्या मना.

११७.

कोरी तवली कुंभाराची, विहीन बोल टचकार्‍याची, करी कदुरीची, चितांगाचा फासा, ईनीबाई पलंगावर बसा, व्याह्यानी विहीण घेतली कड नेली हलवायाच्याकड, तिथ बांधल जिलबीच पुड, विहीन फुंदू फुंदू रड, मला तिकडच न्या म्हण, व्याह्यानी विहीण घेतली कड, नेली सोनार्‍याकड तिथ घडवल सोन्याच तोड, व्याह्यानी विहीण घेतली कड, नेली अत्तराच्याकडे तिथ बांदल हळदीकुंकाच पुड, व्याह्यांनी नेली विहीन आंब्याच्या वनी, तिथ हातारला गंजीखाना विहीणीचा व्याही आला मना, बसाया पाट, तोंड धुवायला घंगाळ, विहीन म्हणते व्याही लई वंगाळ.

११८.

रुखवत आला रुखवत आला, रुखवतावर मोर, नवरा बिजलीची बत्ती, नवरी चंद्राची कोर.

११९.

रुखवत आला रुखवत आला, रुखवतावर मेथीची भाजी आणि नवरीच्या बहिणीच्या नाकातील नथ माझी.

१२०.

शिवरात्रीच पारण करते जीवाच्या कारण, नऊ नारळ बत्तीस केळ, द्राक्ष अंजीर सीताफळ, काशी भोफळा, विहीणीन फराळ केला, बळबळ खाल्ली पाटीभर केळ, पोतभर भगर, पोटभर खारका, विहीन मळ्याला गेली एक रसाची नांद पेली, एक गुळाची ढेप खाल्ली, चार पायलीचे खाल्ले शेंगदाणे, मणाच्या भाजल्या लाह्या, हवाईदादा जाताय तुमी खजुरीच झाड आणाया का बसू धपाट खाया ?

१२१.

आला आला रुखवत विहीणबाई विचार करी, गहू घेतले नळगावी, जाती टाकली तळगावी, आदण ठेवले विल्यावरी, भात वेरला पेठेवरी, चुळभरा चुळवदी, पंगती पडल्या बिनरवडी पान आणा पानवडी, कात आणा खडकत, खनावळी विडबांधा मजवडी, वस्कार टाका सासवडी तो फरडे परांडेच्या किल्ल्यावरी, गाडी जुंपा बारामती, धारण केली सोलापुरी, माप केले कोल्हापुरी, बस्ता बांधला ब्रह्मपुरी, भाजी घेतली नगरात, रोख केली बिंगरात, पाणी प्याली बोगत, निजरा केला मोदात, अंघोळ केली, घोमत तिथुन विहीण म्हणती दादा, हवा पाहु शिरवळची, पेठ पाहू आळंदीची, शिलंगन पाहू बडोद्याचे, डोले पाहू पुण्याचे, दिवाळी पाहू मुंबईची खडकीवडकी महमंदवाडी, पुण्याला काय दाट झाडी, तिथुन आगीनगाडी वरुन पळ घाटाखाली, कळवातणीच तळ, तळ्याची खडक, निर्मळ सडकावरला दिवा, दिव्याची बाडी मोरेकोन, गाव जाधववाडी भंडारवाडीत बंदुक सोडी, अंजीर डाळींबाची दाट झाडी, विहीणबाई बसली शिसारी, धनावड खेतावड, खडत खनावड, एकतपुर मजवड मका पिकतो भारी, विकरा होतो जेजुरीवरी, जेजुरीखाली सात खेडी, विहीन इरवाल्यात मंगळवार सोडी, व्याही म्हणतो विहीण किती हौसी एका इळात गाठली दमनवाडी तलावतोडी, तलावतोडीचा पराण ठाव, विहीण चिंतावली मनी, गेली केसरच्या रानी, केसरनाहीबरी वाई दिसती खरी, केंगाई किकळी हरणाई, वतूशी सरनदी सरली, एक नदी धावती, विहीणीला हिंडून आला फेरा, कराड कोल्हापूर, कोकणचा वारा, पाडघरावर दिलाय धारा, तिथुन समींदर दिसतो सारा, पंचमुखी मारुती नेत्रधरी तपसरी, परांडेच्या डोंगरावरी नऊ लाख पायरी, भवतनी भारी वनगाई दारी, तिथुन विहीण पंढरपुरी गेली, महाद्वारी घेतले पेढे, विठ्‌ठ‌ल रुखुमाईला घालती वेढे, तिकडून आला वैकुंठाचा तुका, विहीण म्हणती मला लेऊद्या देवाचा बुक्का, नामदेव जनाबाई सोपानकाका, मुक्ताबाई यांचे दर्शन झाले फार पुंडलीकाच्या देवळाला विनावार, तिकडून आली तुळजापूरची काठी, तुकाबाई केली दाटी, सहज आले देवदर्शनासाठी, बोदलेबुवा सांवतामाळी यांच्या आरल्या हुल्या अरण गावावरी, व्याही म्हणतो विहीणबाई सार्‍या नवसाचा झाला का झाडा, जुन्या दहिवडीत लक्षुमण आर्यचा वाडा, जित्या रेडयाच काळीज काढा, दहिटीच्या पाठला पुढ कोंबडयाचा भोदवाडा, तिथुन विहीण बाळोबाच्या डोंगरावर गेली व वचन दिल खर, पण साहेब बंगला बांधून देईना, भुई मारले सारे, काय सांगू मस्कोबाची बडाई राक्षसाची लढाई, लढाईच उठल थाळ, रावणाची लंका जळ, वानराच तोंड काळ, कडीभाई रोडखिळा चिचकुकलीला दिला धका, काळा घोडा कोठयाच्या मैदानी, सखा उभा पारशाला, म्हणती खुशाल आहे काका विहीणबाई चालण्याच्या मैदानात तिकडच झुका. तोंड धुतले रत्‍नापुरी, कुंकू ल्याली तुळजापूरी, बाजार केला तारापुरी, चांदसूर्य मेघराज्यान कळ उत्पन्न केली थोर, तिथुन विहीण पडली पार, विहीणीला हिंडून आल फेफर, विहीणीला हिंडून आली भोवळ, विहीणीची वाट पहातो किल्ल्यातील गारवौंड, विहीणीचे हिंडून सुजले पाय, विहीणीची वाट पहाती घाईटी, शिरभाय अंगणी हुती परशी लावली जाई, या आन्याची उतर घाल काय, मग टाका मांडवात पाय, या रुखवतावर चडवा आण्याला आणा भिडवा नाहीतर सांदडीला तोंड दडवा.

१२२.

आला आला रुखवत, रुखवतावर फणी, विहीणीची बोलणी, नका बोलू वनी, आडव लागत पुण पुण्याची पायरी, आडवी लागती जायरी, जायरीच वांग गांग्यागत राहू दिसल्यात भाऊ, भाऊला नाही माया, तळेगाव पाया, तळेगाव कांदा दवड टाकला बांदा, बांधल्या भेंडयाच्या भिंती शिखरापूर घाव घेती, शिखरापूरचा आड मुख्यान धाडला पाड, मुख्यान घरला जोरा, पिंपळगावान केला फेरा, पिंपळगावची येवत, म्होर लागती दवत, दवतीच्या गाया, ल्याक झाल बाया, आजारी बाजारी डोंगरगाव शेजारी डोंगरगाव, कासाकुस निर्‍यात हुत माझ भात, निर्‍यातळ पाटील जहागिरदार, म्होर लागती गोईल नदी, गोइल नदीच कावळ, म्होर लाग जवळ, जावळीचा कायगत मालची कायागत मळइयात निघाल्यात हाती, काठयाला जाती, कवठयाचा भरला बाजार, सई म्हणती शेजार, सेमणला पिकला मूळ, धाडा मांजरीला मूळ, मांजरीण पैक्याच्या जोरात, व्याही पडला तुरुंगात, खर चल तीनशेहजार मोत्याच्या भिवयांच्या आयाबाया, चला जाऊ बोलावाया बोलण्यात निसरली, लोण्यातून घसरली, लोणकरान दिली लाथ, डोंगरावर गेली, वचन दिल साहेब बंगला बांधून देईना. भुई मारले सारे काय सांगू म्हास्कोबाची बढाई, राक्षसाची लढाई लढाईच उठल थाळ, रावणाची लंका जळ, वानराच तोंड काळ, या आव्याची उत्तर द्या बळ, पाय मग टाका मांडवात, या रुखवतावर आण्याला आणा भिडवा नाहीतर सांदडीला जाऊन तोंड द्डवा.

१२३.

आला आला रुखवत पाटलाच्या आळी आत उघडून बघते तर दीडच पोळी. विहीण आली पाटलाच्या दारी, हाती तुपाची चरवी, वाढीना पोटभर न्‌ उगचच करिती येरझार.

१२४.

आला आला रुखवत रुखवतावर होती करपलेली पोळी, विहीण म्हणते मला शिवा जुन्या खणाची चोळी.

१२५.

आला आला रुखवत, रुखवतावर तीनशे पापड ऐंशी वडा, कोन रुखवत फोडा म्हणल त्याच नाकच धरुन ओढा.

१२६.

आला आला रुखवत, रुखवतावर मोत्याचा हार आमची नवरी सुकुमार तिला सासुरवास करु नका फार.

१२७.

आला आला रुखवत, रुखवतात नंदी,

रुखवत उघडाया आले कुंडलिक बंधु आधी.

१२८.

आला आला रुखवत, रुखवतात चांदी सोन्याचा गडू,

नवरा नवरीच लगीन लावाया आले तेहतीस कोटीच देव तर वाट सोडा बघू.

ब्रह्मा विष्णू शंकर येती नवरा नवरीच लग्न लावून जाती

उमा लक्ष्मी पार्वती, हळदी कुंकवाच वाण देती.

१२९.

आला आला रुखवत, रुखवतात लाह्या

रुखवत उघडाया आली अत्री ऋषीची अनुसूया.

१३०.

आला आला रुखवत, रुखवतात खेळाची फणी

रुखवत उघडाया आली नामदेवाची जनी.

१३१.

आला आला रुखवत, रुखवतात मोत्यांची आरती

रुखवत उघडाया आली लाडकी सून कमळावती.

१३२.

आला आला रुखवत, पाच दुरडया रुखवताच्या

सहावी दुरडी पानाची, रुखवत उघडाया आली विठ्‌ठल रुक्मिणी मानाची.

१३३.

आला आला रुखवत, रुखवतात काईबाई

रुखवत उघडाया आली रामाची सीताबाई.

१३४.

आला आला रुखवत, साखरेचा घोडा, काशीचा चुडा, पंढरीचा हुडा, राही रुक्मिणीचा वाडा. पंढरपुरी यात्रा मिळाली, गोपाळपुरची गर्दी फार, गोपाळपुरात साधुसंताची दाटी, चाफळच्या रामाची आली चिठ्‌ठी, चाफळाचा पहिला राम, नासिकचा निवृत्ती राहिला लांब, त्याला वाहते बुक्का, पुढे आहे देहूचा तुका, त्याला वाहते सोन, फिरुन मला आळंदीला जाण, आळंदीत ज्ञानोबा मुक्ताबाईच दर्शन घेते, इंद्रावनीच्या माशाला पाची पक्क्वानाच ताट देते, इंद्रावनी बन दाट, लागली काशीची वाट, काशीत जाते, सारे देव पहाते, चांदी सोन्याचे तांदूळ विश्वनाथाला वाहते, काशीत गेले, पाहिले सारे देव, पाची पांडव पाच जण भाव (भाऊ) पांडवाचा चढले डोंगर, पुढे दिसे शिंगणापूर, शिंगणापूरचा चढते कड (कडा), वाईचा गणपती आहे पुढ, तो येईना हाती, पुढे आहे पुण्याची पारबती (पार्वती-पर्वती), तिचा पहिला हात, पुढे आहे गोरक्षनाथ, तिथ झाल हंस, जोतीबा कंदारी डोंगर दिस, त्याला वाहते गुलाल, त्याच काळभैरी हळाल, काळभैरीच्या देवळाला चांदी सोन्याच दार, औदुंबरी यात्रा मिळाली फार दत्तात्रयाच्या दाराम्होर देखीली तानी गाय, फिरुन पंढरीला जाण हाय, पंढरीत जाते, विठ्‌ठलाचे दर्शन घेते, पुंडलीकाच्या दाराम्होर चंद्रभागेच पाणी रुखवत उघडते x x x x रावांची राणी.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:03:19.5070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उजवणी

  • स्त्री. ऊर्जितदशा ( भूमि , शस्त्र , मनुष्य , इ० कांस ). [ सं . ऊर्ज ] 
RANDOM WORD

Did you know?

जीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site