उमर खैयाम

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


पुष्पांची पसरीत रास अपुल्या पाऊलवाटेवरी

सह्याद्रीमधल्या दर्‍या कवण हा पांथस्थ हो आक्रमी !

न्यारी वेष-तर्‍हा, झगा झुळझुळे पायावरी रेशमी

मुद्रा शांत उदास, केश रुळती किंचित् हिमानी शिरी.

सोन्याची सुरई करात, उसळे त्यातूनिया वारुणी

फेसातील छटा पहा, वितळली रत्‍ने जणू आरुणी !

आहे वृद्ध कवी परी सहचरी रंगेल ये संगती

वस्त्रांतून जिच्या फुले नवतिची उन्मादशाली रती !

देखा, चाहुल लागता फुलतसे वाटेतला ताटवा

त्यासी बाहुनि जादुगार जगता संदेश सांगे नवा

वृक्षाखालिल सावलीत सखिच्या संगे सुराप्राशन

गाणे गात रसाळसे, मग मरूभूमीवरी नंदन !

केला कुंभ कुणी कुठे वसतसे कुंभार तो हुन्नरी ?

राहे तो मशिदीत वा रमतसे या उंचशा मंदिरी

आहे निर्गुण का ? कशास श्रमसी या अक्षरांच्या रणी

आमंत्री पसरूनि बाहु इकडे ही 'द्राक्षकन्या' गुणी !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३४


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP