गुलाम

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


घणघणती चक्रें प्रचंड आक्रोशात

फिरतात पिसाटापरी धुंद वेगात !

अणुअणूस आले उधाण वातावरणी

जणु विराट स्थंडिल फुलवी वादळवात !

तो गुलाम होता उभा अधोमुख तेथे

शूलासम कानी सले उग्र संगीत !

आक्रंदत काळीज विदीर्ण वक्षाखाली

फुटलेल्या पणतित जळे कोरडी ज्योत.

ओठावर होती मुकी समाधी एक

पोटात जिच्या विच्छिन्न मनाचे प्रेत !

बेहोष घोष तो ऐकुनिया चक्रांचा

क्षण मनास आली मादकता विक्लान्त

हिमगिरीप्रमाणे विरघळलेले जग भवती

अन् जागी झाली माणुसकी ह्रदयात !

क्षणि दुभंग झाल्या ह्रदयांतील समाधी

पांगळी पिशाच्चे उठली नाचत गात !

वर पुन्हा पाहता उरी कसेसे होई

डोळ्यांचे खन्दक-जमे निखारा त्यात !

आकुंचित होई आवेगात ललाट

थरथरुनी किंचित हलला उजवा हात

पाहिले सभोती फोडुनि अन् किंकाळी

चक्रात घातले मनगट आवेशात !

कक्षेत रवीच्या तुटून ये ग्रहखण्ड

ओढला जाउनी तसा फिरे चक्रात

तनु दुभंग झाली आणि थांबले चाक

घंटाध्वनि घुमला गभीर अवकाशात !

N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - पुणे

सन - १९३८


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP