मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
आज फिरुनि कां दारिं ?

आज फिरुनि कां दारिं ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


आज फिरुनि कां दांरि उगवलां ?

शपथ घेउनी गेलां त्या दिनिं केलि न कां दुज नारि ? ध्रु०

खचित वाटलें याल कधींहि न,

भाजुनि पोळुनि गेलें हें मन,

ओस जाहलें सारें त्रिभुवन,

जिती मरें संसारिं. १

मन गुंतविण्या कांहिं न उरलें,

दिवस सुखाचे सारे सरले

असें समजुनी मना मारिलें,

आस जाळिली सारि. २

झालें ते दिनिं मी संन्यासिनि

आशा-तृष्णा सकल जाळुनी,

राख तयांची उरीं बाळगुनि

हिंडें मी व्यवहारिं. ३

काय फायदा आतां येउनि ?

हवें त्यापरी मोल चढवुनी

शोधा दुसरी सुंदर रमणी,

दुनियेच्या बाजारिं. ४

"त्या राखेचा प्रसाद देउनि

कृतार्थ करि मज अंगा फासुनि,

तव नामाची स्मरणी धरुनी

सफल गणिन ही वारि. ५

जर आशेचा उरला अंकुर

दडला कोठे राखेमंधि तर

जीवन दे त्या, डुलुं दे तरुवर,

नयनिं भर कां वारि?" ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - सृष्टिलता

राग - सोहनी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - ५ मार्च १९३५


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP