मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
स्फुट ओव्या

स्फुट ओव्या

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


झोपाळ्यावर बसूं, सारख्या साड्या नेसूं,

फांदीच्या साळुंक्या ग सारख्या बहिणी दिसूं. १

मोहरा आला आंबा, फळा आली ग चमेली,

माझ्या राव्यासाठीं तुझीं मैना ग तान्हेली. २

शेजारीण बाई, सडा घाला अंगणांत,

रावा, मैना दोघां जेवूं घालूं दुधभात. ३

माझ्या दारावरी कोण आले दोघेजण ?

भाऊबीजे आले भाऊ रामलक्षुमण. ४

शेजारीण बाई, तुझा गुलाब कांट्यांचा,

माझ्या जुईला ग नाहीं बाई झेपायाचा ! ५

थोरल्या विहिणीबाई, नका सांगूं हो गार्‍हाणीं;

कोण पुसे तुम्हां नांदतां राजाराणी ? ६

श्रीमंतीण बाई, तुझा शृंगार कांट्याचा,

मानितें गरीबीचा संसार झपाट्याचा. ७

तुझ्या गळा बाई, सोन्याचं ग लोढणं,

पोतेचं गरीबीचं मंगलसूत्र माझं लेणं ८

वेल फोफावली, तिला ये ना बाई फळ;

दारीं हत्ती-घोडे, घरीं नाहीं बाई मूल ! ९

हत्ती-घोडे दारीं, चोपदाराच्या ललकारी,

नाहीं मंगलवाद्यं, तोरण नाहीं दारीं ! १०

शितं तिथं भुतं घरीं एक गजबज,

बोबडा बोल नाहीं, नाहीं कानीं कुजबूज ११

माझ्या दारावरी गलबला ग कशाचा ?

आता कीं वेणूसाठीं तंटा चालला राजांचा. १२

N/A

कवी - भा. रा. तांबे

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २३ फेब्रुवारी १९३५


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP