मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
वियोगिनी

वियोगिनी

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


"निर्जनीं घोर या वनीं कोण तुं सांगें,

गंधर्वसुता, वनदेवी, मनुज वा का गे ?

हा गिर वासुनी दरी पसरला येथें,

कांतार भयंकर कसें तुला रुचलें तें ?

बरगड्या लांब वांकड्या पसरल्या असती;

रक्तापरि लाली काय न दे ती भीती ?

बघ भुजंगसम उत्तुंग शिरावरुनिया

हे भस्मी ओहळ, मदचि फुटे गजसा या.

तृण कसें राठ हें असें पीत तांबूस !

जणुं थरारले हे त्या दैत्याचे केस.

पलिकडे वारि धडधडे धवल फेसाळ-

नरदुःखि खदखदा अट्टहास विक्राळ.

दे श्वास कोण श्वासास, अश्रु अश्रूला ?

नच सहानुभूती इथे मनुजयोनीला.

सहवास, वसे जो त्यास व्याघ्र-सिंहाचा-

नवपल्लवकोमलकुमरियोग्य का साचा ?

तारुण्य असुनि आरण्यवास कां रुचला ?

कां अपक्व आली पक्व दशा ही तुजला ?

गांजिली काय टाकिली वृद्ध तातांनी ?

तुज विक्रयभीती काय पिटाळी रानीं ?

संसारसुखाचे गार हरित दिन असुनी

कां वसंत दवडिशि आयुष्याचा विपिनीं ?

घन घनीं जसा लोपुनी दडावा तारा

त्यापरी दडशि कां इथे त्यजुनि संसारा ?

ज्यापरी गिरीच्या उदरिं हिरा लपलेला

पारख्यापासुनी तशी इथे तूं बाला.

ज्यापरी वनाभीतरीं कुसुम वाळावें

त्यापरी काय संकल्प तुझा सांगावें ?

वद वृक्षिं एकटे पक्षि कधीं का वसती ?

सहवासाविण जीवित्व भयंकर जगतीं.

अनिवार जिवाचा भार कसा एकानें

सोसावा स्त्रीविण नरें, तयाविण तीनें ?

चल पुरीं म्हणुनि सुंदरी, वाट तव पाही

सत्प्रीति ह्रदयिं या, तुला आदरें बाही.

अतिभव्य मनोहर दिव्य भुवन बागेंत

नगरांत पाहतें वाट तुझी चल तेथ.

पाहणें प्रणयलोचनें, हासणें रुसणें

रानांत असें सुख सांग कुठे गे सजणे ?

स्वर्गस्थ ज्योति अस्वस्थ धरेवर याया,

अति आतुर तुजला 'आई' ! संबोधाया.

लडिवाळपणानें बाळ अंकिं लोळावें,

पतिपत्‍नि, सुता-सुत एक ताटिं जेवावे !

हें पुरीं, तें वनीं परी; नीट बघ दोन्ही,

स्वीकरीं ह्रदय हें, देइं मुदित होवोनी.

आरक्त मदन आसक्त मधुर हो अधरीं

तो टाळुं पळशि वनिं तिथे पडे परि पदरीं.

छळुं तया नको गे ! दया करीं यावरती,

परतेल कसा या ह्रदयिं भरे जरि भरती ?

कां बरें नीर या भरे नील तव नयनीं ?

का कांहिं टोचतें तुला सांग या वचनीं ?

"हा झरा कसा झरझरा वाहतो पुढती !

का उलट तरुं शके कुणी प्रवाहावरती ?

झरझरा प्रीतिचा झरा लागला वाहूं;

त्या उलट झगडलें, दुःख किति अतां साहूं ?

तरु पहा उभा येथ हा, गार किति छाया !

तोडोनि डहाळ्या हाय शोधणें वाया !

साउली मला लाभली प्रीतिची असुनी

करिं फांद्या छेदुनि वणवण भणभण विपिनीं.

विनविलें किती प्रार्थिलें मला तैं त्यांहीं.

परि नाहिं पाहिलें तयां सदय नयनांहीं.

टाकुनी बोललें, 'वनीं चला येथोनी !'

कशि बाइ अवदसा सुचली मज कोठोनी ?

मत्प्राण तेच दिनिं जाण वनाला गेले;

हें शरीर मागुनि शोधित वनिं त्यां आलें,

ते जरी लाभले तरी लग्न होवोनी

यें, न तरि बरें वन पुरश्मशानाहूनी !

त्यावीण व्यर्थ की शीण पुरीं, जें म्हणतं

तें सर्व फळा ये छाया ती सांपडतां.

सत्प्रीति जरी भूवरति एक त्या ह्रदयीं,

ज्या स्थलीं दडुनि मत्प्राण निघे त्या समयीं.

तुम्हि चला कां बरें मला भुरळवूं बघतां ?

गिरिपरी तनू जड, काय खुळें तरी वदतां ?

कुणिकडे पाहुं तरि गडे, तुम्हांला नाथा ?

या पदर पसरतें, क्षमा करा मज आतां !"

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - भूपति

ठिकाण - धार

दिनांक - १३ जून १९०३


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP