गोष्ट चव्वेचाळिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट चव्वेचाळिसावी

जिथे राज्य मूर्खांचे, तिथे राहणे धोक्याचे.

एका पर्वतावरील वृक्षावर 'सिंधुक' नावाचा एक पक्षी राहात होता. त्याच्या विष्ठेतून सोन्याचा रवा पडे. एकदा त्या वृक्षाजवळून एक पारधी चालला असता, तो सिंधुक त्याच्या समक्ष शिटला. त्याच्या विष्ठेत चमकत असलेले सोने पाहून त्या पारध्याने त्याला जाळ्यात पकडले.

मग त्याला घेऊन घरी जाताना तो पारधी मनात म्हणाला, विष्ठेतून सोने देणारा पक्षी मजपाशी आहे हे वृत्त जर राजाला कळले, तर तो या पक्ष्याला तर घेऊन जाईलच, पण त्याशिवाय तो मलाही शिक्षा ठोठवील. त्यापेक्षा हा पक्षी राजाला नेऊन दिलेला बरा. मनात असे ठरवून त्याने त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य राजाला सांगून, त्याला त्याच्या हवाली केले आणि राजाने त्या सिंधुकाला एक सेवेकाकरवी पिंजर्‍यात अडकविले.

तेवढ्यात त्या राजाचा प्रधान तिथे येताच, जेव्हा राजाने त्याला त्या पक्ष्याचे वैशिष्ठ्य सांगितले, तेव्हा तो म्हणाला, 'महाराज, पक्ष्याच्या विष्ठेतून सोने निघणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही त्या पक्ष्याला पिंजर्‍यातून मुक्त करा.' राजाने त्याप्रमाणे करताच तो पक्षी एका उंच जागी जाऊन शिटला. त्या विष्ठेतून चमचमणारे सुवर्णकण पाहून राजा म्हणाला, 'अरेरे ! विष्ठेतून सोने देणार्‍या या पक्ष्याला सोडून देणारा मी मूर्ख आहे !'

यावर सिंधुक पक्षी म्हणाला, 'हे राजा, या जगात तू एकटाच काही मूर्ख नाहीस. पारध्याच्या समोर सुवर्णभरित विष्ठा शिटलो तर तो आपल्याला पकडील ही गोष्ट कळत असूनही, मी त्याच्या समक्ष शिटलो व स्वतःहून त्याच्या जाळ्यात सापडलो. तेव्हा तुझ्याप्रमाणे मीही एक मूर्खच आहे. आणि तो पारधी ? विष्ठेतून सुवर्ण देणार्‍या मला पाळून स्वतः श्रीमंत होण्याऐवजी त्याने मला तुझ्या स्वाधीन केले ! तेव्हा तुझ्या-माझ्याप्रमाणे तो पारधीही मूर्खच ! थोडक्यात सांगायचे तर या जगात शहाणे थोडे. सगळीकडे मूर्खांचाच बाजार !' एवढे बोलला आणि तो पक्षी उडून गेला.

ही गोष्ट आपल्या आप्त संबंधितांना सांगून रक्ताक्ष म्हणाला, 'जो हा आपला किल्ला आजवर आपले रक्षण करू शकत होता, त्याच किल्ल्यात आता आपल्या राजाने व त्याच्या तोंडपुंज्या मंत्र्यांनी स्थिरजीवीसारख्या शत्रूला आणून ठेवल्याने, यापुढे इथे राहाणार्‍यांवर केव्हा प्राणसंकट येईल याचा भरंवसा देता येत नाही. म्हणून मी व तुम्ही इथून दूरच्या एखाद्या सुरक्षित स्थळी राहायला जाऊ या. 'गुहा कधी बोलत नाही' हे त्या चतुर कोल्ह्याने हेरले म्हणूनच त्याचे प्राण वाचले ना ?'

रक्ताक्षाने याप्रमाणे विचारताच, 'ती गोष्ट काय आहे ?' असा प्रश्न त्याच्या नातेवाईकांनी केला. तेव्हा तो म्हणाला, 'एकदा असं झालं-

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP