TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

गोष्ट तेहेतिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट तेहेतिसावी

गोष्ट तेहेतिसावी

थोराशी जोडता नाते, येणारे संकट निघून जाते.

एकदा भयंकर दुष्काळ पडल्यामुळे, एका वनात असलेले एकमेव तळे पार आटून गेले व त्यामुळे त्या वनातील हत्ती आपला नेता 'चतुर्दन्त' याच्यासंगे पाच दिवस अहोरात्र प्रवास करून, अखेर दूरच्या वनातील पाण्याने तुडुंब भरलेल्या एका सरोवराकडे गेले.

पाण्याने काठोकाठ भरलेल्या तळ्यात मनमुराद विहार करायला मिळाल्यामुळे आनंदून गेलेले ते हत्ती, स्नानपान झाल्यानंतर, त्या तळ्याभोवतीच्या भुसभुशीत भूभागावर बराच वेळ नाचले व उंडारले, पण त्यामुळे त्या भूमीत बिळे करून राहणार्‍या सशांवर त्या हत्तींचे पाय पडले आणि त्यांच्या पायांखाली काही सशांचे पाय चिरडले, कुणाचे पाठींचे कणे मोडले, तर काही साफ चिरडले जाऊन प्राणांना मुकले. असा बराच वेळ धुडगूस घालून झाल्यावर ते हत्ती गवतपाला खायला नजिकच्या वनात निघून गेले.

त्यांचा तो कळप तिथून निघून जाताच ते ससे बिळांबाहेर आले. मग एक ससा इतरांना म्हणाला, 'दुष्काळी प्रदेशातून आलेले हे हत्ती यापुढे दररोज या सरोवरात पाणी प्यायला आणि डुंबायला येणार आणि आजच्यासारखाच धिंगाणा घालून, आपली वाताहत करणार. कारण म्हटलंच आहे ना ?-

स्पृशन्नपि गजो हन्ति जिघ्रन्नपि भुजङ्गमः ।

हसन्नपि नृपो हन्ति मान्यन्नपि दुर्जनः ।

(हत्ती हा नुसत्या स्पर्शाने - म्हणजे बारीकशा धक्क्यानेसुद्धा ठार करतो. सर्प हा केवळ [विषारी] उच्छ्‌वासानेसुद्धा जीव घेतो, राजा हा हसत हसतसुद्धा प्राण घेऊ शकतो आणि दुर्जन हा वरपांगी मान देत असतानाच आतून गळा कापतो.)

याप्रमाणे बोलून त्या सशाने प्रश्न केला, 'तेव्हा आपल्या रक्षणाच्या दृष्टीनं आपण काय करावं, असं तुम्हाला वाटतं ?'

यावर एका सशाने ते ठिकाण सोडून इतरत्र जाऊन राहण्याची सूचना केली, तर दुसर्‍याने तसे निघून जाण्यास हरकत घेतली. तो म्हणाला, 'पूर्वापार पिढयान्‌पिढ्या जिथे राहात आलो ते ठिकाण सोडून जाण्यात काय अर्थ ? त्यापेक्षा ते हत्ती यापुढे या सरोवराकडे फिरकणार नाहीत, असा काहीतरी धाक त्यांना दाखवायला हवा, मग तो धाक खोटा का असेना ? कुणीकडून आपला हेतु सफल झाल्याशी कारण. म्हटलंच आहे ना ? -

निर्विषेणापि सर्पेण कर्तव्या महती फटा ।

विषं भवतु मा वास्तु फटाटोपो भयंङ्करः ॥

(एखादा सर्प जरी विषारी नसला, तरी त्याने फणा उभारावी. त्याच्या ठिकाणी विष असो वा नसो, त्याने नुसती फणा उभारल्यानेच [दुसर्‍याच्या मनात] भय उत्पन्न होते.)

त्या सशाच्या या म्हणण्याला दुजोरा देऊन एक वृद्ध ससा म्हणाला, 'हा म्हणतो तसेच करायला हवे. आपल्यापैकी एकाने त्या हत्तींचा प्रमुख जो 'चतुर्दन्त' त्याला भेटावे व त्याला दडपून सांगावे, 'माझे नाव विजयदत्त असून, मी पृथ्वीवर असलेल्या सर्व सशांचा राजा पृथ्वीला रात्री प्रकाश देणार्‍या चंद्रमहाराजांचा दूत आहे. मी एरवी जरी चंद्रलोकी राहात असलो, तरी तुम्ही हत्तींनी या सरोवराकाठच्या माझ्या प्रजाजनांना त्रास द्यायला सुरुवात केली असल्याने, मी मुद्दाम तुम्हाला चंद्रमहाराजांचा निर्वाणीचा इशारा द्यायला पृथ्वीवर आलो आहे. यापुढे तुम्ही त्या सरोवराकडे चुकूनही जरी फिरकलात व त्या माझ्या प्रजाजन असलेल्या सशांना त्रास दिलात तर चंद्रमहाराज शाप देऊन तुम्हा हत्तींची राखरांगोळी करून टाकतील.'

त्या वृद्ध सशाने आणखीही मार्गदर्शन केल्यावर, 'चंद्रमहाराजांचा राजदूत म्हणून कुणाला त्या हत्तीप्रमुखाकडे पाठवावे, 'याबद्दल त्यांच्यात विचारमंथन सुरू झाले असता एक बहुश्रुत ससा म्हणाला, 'राजदूत कसा असावा याबद्दल राजनीतीवरील एका ग्रंथात असं सांगितलं आहे की -

साकारो निःस्पृहो वाग्मी नानाशास्त्रविचक्षणाः ।

परचित्तावगन्ता च राज्ञो दूतः स इष्यते ॥

(जो देखणा, निर्लोभी, प्रभावी वक्तृत्वाचा, नाना शास्त्रे जाणणारा व दुसर्‍याच्या मनात काय आहे हे ओळखणारा असतो, असाच राजाचा दूत असावा.')

त्या सशाने याप्रमाणे सांगताच, सर्व सशांनी लंबकर्ण नावाच्या एका देखण्या, बुद्धिमान्, हजरजबाबी व निःस्पृह अशा सशावर ते काम सोपविले. त्यानुसार तो लंबकर्ण ससा एका सोयीच्या अशा उंच टेकाडावर जाऊन बसला आणि हत्तीप्रमुख चतुर्दन्त हा त्या टेकाडाच्या पायथ्याजवळून जाऊ लागला असता, अगोदर ठरल्याप्रमाणे त्याला बोलला. त्याच्या या बोलण्याने मनी धसकून गेलेल्या चतुर्दन्ताने त्याला विचारले, 'काय रे विजयदत्ता, तू खरोखरच चंद्रमहाराजांचा राजदूत आहेस, याला पुरावा काय ?'

लंबकर्ण म्हणाला, 'हे चतुर्दन्ता, तुला पुरावा हवा ना? मग आज रात्री तू एकटाच त्या सरोवराकडे अगदी सावकाश ये. ज्या माझ्या प्रजाजनांना तुम्ही हत्तींनी पायांखाली चिरडून मारलेत त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करायला, ज्यांना तुम्ही जायबंदी केलेत त्यांना दिव्यौषधी देऊन बरे करायला, आणि जर तुम्ही इथून इतरत्र निघून जाणार नसाल, तर शाप देऊन तुम्हाला भस्मसात् करायला आज चंद्रमहाराज त्याच सरोवरापाशी येणार आहेत. ते आल्याचे मी तुला प्रत्यक्षच दाखवीन.'

त्या दिवशी रात्र पडताच चतुर्दन्त हत्ती हळूहळू त्या सरोवराकडे गेला असता, त्याला सरोवरात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब दाखवून लंबकर्ण म्हणाला, 'चतुर्दन्ता, चंद्रमहाराजांना पाहिलेस ना ? ते समाधी लावून बसलेत. तेव्हा एकही शब्द न बोलता, केवळ त्यांना नमस्कार करून, तू तुझ्या अनुयायांसह या वनातून निघून जा. त्यांची समाधी उतरल्यावर जर का तुमच्यापैकी कुणी त्यांच्या दृष्टीस पडला, तर ते शापाने त्याची राख करून टाकतील.' लंबकर्णाने दिलेली ही पोकळ धमकी खरी वाटून, चतुर्दन्त आपल्या अनुयायांसह त्या वनातून कायमचा निघून गेला.'

ही गोष्ट सांगून तो कावळा इतर पक्ष्यांना म्हणाला, 'म्हणून मी म्हणतो की, आपला संबंध थोरामोठ्यांशी असल्याचे नुसते जरी कळले तरी आपले काम होऊन जाते. तेव्हा घुबडासारख्या क्षुद्र पक्ष्यावर राजेपणाची भलतीच जबाबदारी टाकण्यात काय अर्थ ? पूर्वी ससा व चिमणी यांच्या भांडणात, न्यायदानाची जबाबदारी त्यांनी एका मांजरावर सोपविल्यामुळे, त्या दोघांनाही आपल्या प्राणांना कसे मुकावे लागले, ती गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे की नाही ?'

त्या पक्ष्यांना 'नाही' असे म्हणताच तो कावळा म्हणाला, 'एकदा असे झाले -

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-09-20T10:20:33.0200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

flapping

 • न. ताडण 
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.