गोष्ट सोळावी


संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.
The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट सोळावी
लुच्चे मारती मजा, पण त्यांच्याकडून फसलेले भोगती सजा !

एका वनात वज्रदंष्ट्र नावाचा एक सिंह राहात असे. चतुरक नावाचा कोल्हा व क्रव्यमुख नावाचा लांडगा, हे दोघे त्याचे खासगी कारभारी होते. एके दिवशी एका झाडाखाली विश्रांती घेत बसलेल्या उंटिणीवर झडप घालून व तिचे पोट फोडून, वज्रदंष्ट्राने त्याला ठार केले. ती उंटीण गर्भवती असून तिची प्रसूतीची वेळ जवळ आली असल्याने, तिचे पोट फोडले जाताच, त्यातून एक जिवंत पिलू बाहेर पडले.' आपण एका गर्भवती उंटिणीला ठार मारले,' म्हणून वज्रदंष्ट्राला नंतर फार वाईट वाटले आणि त्याने तिच्या पिलाला अभय देऊन त्याचे नाव शंकुकर्ण असे ठेवले व त्याला आपल्या वनराज्यात निर्भयपणे रहायला सांगितले.
शंकुकर्ण हळूहळू मोठा होता होता ऐन तारुण्यत आला व वज्रदंष्ट्र सिंह एकदा बराच आजारी पडला. गुहेबाहेर पडून वनातील श्वापदांची शिकार करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी न उरल्याने त्याची आणि त्याच्याबरोबरच चतुरक व क्रव्यमुख यांची उपासमार होऊ लागली. तेव्हा 'स्वामीला जगविण्यासाठी मरणारास मरणोत्तर स्वर्ग मिळतो,' अशी लालूच चतुरक कोल्ह्याने शंकुकर्णाला दाखवून त्याला आपणहून मरायला तयार केले आणि त्याने तसे वज्रदंष्ट्रापुढे बोलून दाखवताच, चतुरक व क्रव्यमुख यांनी त्या भाबड्या उंटाला ठार केले. मग भुकेल्या वज्रदंष्ट्रानेही त्या उंटाचे मांस खाण्याचे कबूल केले.
शंकुकर्ण मरून पडताच चतुरक व क्रव्यमुख यांना वज्रदंष्ट्र म्हणाला, 'मी हळूहळू नदीवर जाऊन स्नानसंध्या उरकून येतो. तोवर या शंकुकर्णाच्या मांसाला तुम्ही तोंड लावू नका, किंवा इतर कुणालाही तसे करू देऊ नका.'
याप्रमाणे बोलून तो वज्रदंष्ट्र सिंह तेथून नदीकडे निघून जाताच चतुरकाच्या मनात विचार आला, 'या उंटाचे सर्व मांस आपल्या एकट्यालाच खायला मिळाले तर किती मजा येईल? मनात असा विचार येताच त्याला एक युक्ती सुचली. तो क्रव्यमुख लांडग्याला म्हणाला, 'वास्तविक या भोळ्या शंकुकर्ण उंटाला आपण दोघांनीच ठार मारले असल्याने, याचे मांस प्रथम खाण्याचा मान आपला आहे. तेव्हा वज्रदंष्ट्रमहाराज आता इथे नसल्याचे संधी साधून, तू याचे थोडेसे मांस खाऊन घे. समज, याचे मांस खाल्ल्याचे त्यांच्या लक्षात आलेच, तर त्यांची समजूत मी कशीही घालीन.' चतुरकाने असे आश्वासन दिल्यामुळे क्रव्यमुखाने त्या उंटाचे काळीज खायला सुरुवात केली.
तेवढ्यात अंघोळ करून, तोंडाने स्तोत्र पुटपुटत वज्रदंष्ट्र परतला. क्रव्यमुख उंटाचे काळीज खात असल्याचे त्याने पाहिले व त्याला दटावले, 'काय रे खादाडा, मी ताकीद देऊन गेलो असतानाही, तू या उंटाचे काळीज खायला कशी काय सुरुवात केलीस ?'
सिंहाच्या या दटावणीने घाबरलेला क्रव्यमुख- चतुरकाने आपली बाजू घेऊन बोलावे या अपेक्षेने त्याच्याकडे - बघू लागला असता चतुरक एकदम त्याच्यावर उलटून त्याला म्हणाला, 'अरे मूर्खा, 'शंकुकर्णाचे मांस तु खाऊ नकोस,' असे मी तुला परोपरीने सांगूनही तू माझे ऐकले नाहीस ना ? मग भोग आपल्या अधाशीपणाचे फळ.' चतुरक असा उलटताच, 'हा वज्रदंष्ट्र आता आपल्याला ठार मारल्याशिवाय रहाणार नाही !' असे भय वाटून क्रव्यमुख तिथून विद्युतगतीने पळून गेला.
उंटाच्या मांसाच्या तीन वाटेकर्‍यांपैकी क्रव्यमुख हा एक वाटेकरी तर पळून गेला; आता या वज्रदंष्ट्राला कसे नाहीसे करायचे व उंटाचे मांस आपल्या एकट्याच्या पदरात कसे पाडून घ्यायचे, याबद्दलचा विचार चतुरक करू लागला असता, एका दिशेने घंटा घणघणल्याचा आवाज त्याच्या व वज्रदंष्ट्राच्या कानी आला. वज्रदंष्ट्राने आजवरच्या आयुष्यात कधी घंटानाद ऐकला नसल्याने, त्याने भयभीत होऊन विचारले, 'चतुरका, हा ध्वनी कसला आहे रे ?'
हा घंटेचा नाद आहे, हे चतुरकाला कळत असूनही तो मुद्दामच म्हणाला, ',महाराज, मी बघून येतो. तोवर तुम्ही इथेच उभे रहा.' याप्रमाणे बोलून तो त्या घंटानादाच्या दिशेने गेला. काहीसे अंतर चालून जातो, तो पाठींवर ओझी लादलेला उंटांचा तांडा एका रानवाटेने चालला असल्याचे व त्या तांड्यातील आघाडीच्या उंटाच्या गळ्यातील घंटेचा आवाज होत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्या गोष्टीचा उपयोग वज्रदंष्ट्राला पळवून लावण्याच्या कामी करायचे ठरविले.
त्याप्रमाणे लगबगीने वज्रदंष्ट्राकडे परतून तो त्याला म्हणाला, 'महाराज, तुम्ही ज्याला अभय दिलेत, त्या शंकुकर्ण उंटाला ठार मारलेत ना ? म्हणून रेड्यावर बसलेला यम तुम्हाला मारायला येत असू, त्या रेड्याच्या गळ्यातला 'घंटा' नावाच्या वाद्यचा हा 'घणघण' असा आवाज येत आहे. तुम्हाला जर स्वतःचा जीव वाचवायचा असेल, तर याच क्षणी त्या आवाजाच्या उलट दिशेने तुम्ही कुठेतरी दूर पळून जा.'
'पण त्या उंटाला तर तू व क्रव्यमुख अशा दोघांनीच मारलेत ! मी काही त्याला मारले नाही. मग यम मला मारायला का येतोय ?' असा प्रश्न वज्रदंष्ट्राने केला असता चतुरक त्याला म्हणाला, 'महाराज, सेवकांनी जर एखादे पापकृत्य आपल्या धन्याच्या समक्ष केले, तर ते पापकृत्यच त्यांनी धन्याच्या आज्ञेने व संमतीनेच केले, असे यम समजतो व त्याबद्दलची शिक्षा तो त्या धन्यालाच देतो.' चतुरकाने केलेले हे स्पष्टीकरण ऐकून वज्रदंष्ट्र घाबरला आणि ताबडतोब तिथून पळून दुसर्‍या वनात निघून गेला. अशा तर्‍हेने क्रव्यमुख व वज्रदंष्ट्र या दोघांनाही पळवून लावल्यावर चतुरक कोल्ह्याने त्या उंटाचे सर्वच्या सर्व मांस मोठ्या चवीने व आपल्या सवडीने खाऊन खलास केले.'
ही गोष्ट सांगून दमनक करटकाला म्हणाला, 'दादा, अशा तर्‍हेने जे बुद्धिमान् असतात, ते आपली उद्दिष्ट अशा युक्तीप्रयुक्तीने साध्य करून घेतात.'
इकडे दमनक आपल्या मोठ्या भावाला - करटकाला - ही गोष्ट सांगत असता, तिकडे संजीवक विचार करीत होता, 'दमनक म्हणतो त्याप्रमाणे इथून दूर कुठेतरी पळून जाण्यात अर्थ नाही. समजा, दूर पळून गेलो तरी तिथेही तो पिंगलक मला मारण्यासाठी येणार नाही याची खात्री कुणी द्यावी ? त्यापेक्षा पिंगलकाच्या भेटीस जाऊन, त्याचा जर काही गैरसमज झाला असला, तर तो दूर करण्याचा प्रयत्‍न करावा. समजा, त्याचा माझ्याविषयीचा गैरसमज दूर न होता तो मला मारायला आला, तर आपणही आपल्यापरीने त्याला पुरे पडण्याचा प्रयत्‍न करावा. मग भले त्यात मला मरण का येईना ? भेकडाप्रमाणे अपमानकारक जिणे जगण्यापेक्षा मर्दाचे मरण केव्हाही भूषणास्पद ठरते. म्हटलेच आहे -
महद्बिः स्पर्धमानस्य विपदेव गरीयसी ।
दन्तभङ्गोऽपि नागानां श्र्लाघ्यो गिरिविदारणे ॥

(थोरामोठ्यांशी स्पर्धा करताना संकटे आली तरी ते गौरवास्पद ठरते. पर्वताला धडक मारणार्‍या हत्तींचे सुळे मोडले तरी ते त्यांना भूषणावहच ठरते. )
मनाशी असे ठरवून संजीवक पिंगलकाकडे जाऊ लागला. पण त्याला दुरून पाहताच पिंगलक लालबुंद डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागला. ती त्याची भयकारी नजर पाहून, संजीवक घाबरला व पिंगलकाला नेहमीप्रमाणे नमस्कार करायचेही विसरून गेला. पण 'याने मुद्दामच आपल्याला नमस्कार केला नाही.' असा गैरसमज होऊन पिंगलकाने झटकन्‌ संजीवकाला मारण्यासाठी त्याच्यावर झेप घेतली. परंतु संजीवकानेही जिवाच्या कराराने क्षणार्धात आपली शिंगे उगारून ती पिंगलकाच्या पोटात खुपसण्यासाठी धडपड सुरू केली.
त्या दोघांमध्ये सुरू झालेली ती अटीतटीची झुंज दुरूनच दृष्टीस पडताच करटक दमनकाला म्हणाला, 'अरेरे ! दमनका, ज्या अर्थी मघाशी तू सांगितलेल्या गोष्टीतील त्या कपटी चतुरक कोल्ह्याचं कौतुक करायला तुला लाज वाटली नाही, त्या अर्थी तुझ्या नीचपणाला आता सीमा उरली नाही. तू केवळ स्वार्थासाठी पिंगलकमहाराज व संजीवक यांच्यात वैर निर्माण केलेस व ते वैर या थराला आणलेस. तू राजाचा मंत्री व्हायला पूर्णपणे अपात्र आहेस. अजूनही तुझ्यात जर थोडाफार चांगलेपणाचा अंश असेल, तर पिंगलकमहाराजांकडे जाऊन त्यांच्यापासून त्या निरपराध संजीवकाला वाचविण्याचा प्रयत्‍न कर. पण छे ! असली चांगली गोष्ट तू करणार नाहीस. अरे, तुझ्यासारख्या पाताळयंत्री व स्वार्थांध व्यक्तीला जर का महाराजांनी प्रधानपदी ठेवले, तर त्यांचे व त्यांच्याबरोबरच त्यांच्या राज्याचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही. म्हटलंच आहे ना ? -
नराधिपां नीचजनानुवर्तिनो
बुधोपदिष्टेन पथा न यान्ति ये ।
विशन्त्यतो दुर्गमार्गनिर्गमम् ।
समस्तसम्बाधमनर्थपंजरम् ॥

(नीचांच्या कलाने वागणारे जे राजे सूज्ञांनी दाखविलेल्या मार्गाने जात नाहीत, ते कुठल्याच बाजूने बाहेर पडण्याचा मार्ग नसलेल्या संकटरूपी पिंजर्‍यात अडकून पडतात.)
करटक पुढे म्हणाला, 'बाकी तुला कितीही जरी उपदेश केला, तरी त्याचा थोडाच उपयोग होणार आहे ? सुकलेले लाकूड जसे काही केल्या वाकत नाही, किंवा वस्तरा कितीही जरी परजलेला असला तरी दगडावर चालत नाही, त्याचप्रमाणे तुला केलेल्या उपदेशाचा तुझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. उलट, नको त्याला उपदेश करायला गेलेल्या त्या सूचिमुख पक्ष्याने जसे स्वतःवर संकट ओढवून घेतले, तसा तुला उपदेश केल्याने माझ्यावरच एखादे संकट ओढवण्याची शक्यता आहे.'
'त्या सूचिमुख पक्ष्यावर संकट कसे काय ओढवले?' असे दमनकाने विचारता, करटक म्हणाला, 'त्याचं असं झालं-

N/A

References : N/A
Last Updated : January 30, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP