शनिवारचे अभंग - शरण शरण हनुमंता । तुज आ...

शनिवारचे अभंग


शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥

काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥२॥

शूर आणि धीर । स्वामीकाजीं तूं सादर ॥३॥

तुका म्हणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा॥४॥

*

काम घातला बांदोडीं । काळ केला देशोधडी ॥१॥

तया माझे दंडवत । कपिकुळीं हनुमंत ॥२॥

शरीर वज्रा ऐसे । कवळी ब्रह्यांड जो पुच्छें ॥३॥

रामरायाच्या सेवका । शरण आलों म्हणे तुका॥४॥

*

हनुमंत महाबळी। रावणाची दाढी जाळी॥१॥

तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर॥२॥

करोनि उड्डाण। केलें लंकेचे शोधन ॥३॥

जाळियेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका॥४॥

*

केली सीताशुद्धि । मूळ रामायणा आधीं॥१॥

ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥२॥

जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥३॥

रामलक्षुमण । नेले आणिले चोरुन ॥४॥

जोडुनियां कर । उभा सन्मुख समोर ॥५॥

तुका म्हणे जपें । वायुसुता जातीं पापें॥६॥

*

मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं तुमचे गुण। उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामांचे ॥१॥

नाम चांगले माझे कंठी राहो भलें । कपिकुळ उध्दरिलें। मुक्त केलें राक्षसा ॥२॥

द्रोणागिरी कपीहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयीं ॥३॥

शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ति वाखणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥४॥

राम जानकी जीवन । योगियांचें निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो॥५॥

*

पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपती ॥१॥

अवघे लंकेमाजी झाले रामाचे दूत । व्यापले सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥२॥

अवघे अंगलग तुझे वधियले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥३॥

तुका म्हणे ऐक्याभावें रामासी भेटी । करुनि घेई आतां या संबंधेंसी तुटी॥४॥

*

पैल आला रामराणा । लंका दिधली बिभीषणा ॥१॥

नळ नीळ जांबुवंत । मध्यें चाले रघुनाथ ॥२॥

भोंवते वानरांचे थाट । पुढें गर्जताती भाट ॥३॥

केला अयोध्याप्रवेश । म्हणे नामा विष्णुदास॥४॥

*

जन्मजन्मांतरीं असेल पुण्यसामुग्री । तरीच नाम जिव्हाग्रीं येईल श्रीरामाचें ॥१॥

धन्य कुळ तयाचें रामनाम हेंचि वाचें । दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणताचि ॥२॥

कोटी कुळांचें उद्धरण मुखीं राम नारायण । रामकृष्णस्मरण धन्य जन्म तयाचें ॥३॥

नाम तारक सांगडी नाम न विसंबे अर्धघडी । तप केलें असेल कोडी तरीचे नाम येईल ॥४॥

ज्ञानदेवीं अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेले वैकुंठा हरि हरि स्मरतां ॥५॥

*

मन हें राम झालें मन हें राम झालें । प्रवृत्ति ग्रासूनि कैसें निवृत्तीसी आलें ॥१॥

श्रवण कीर्तन पादसेवन कैसें विष्णुस्मरण केलें । अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले ॥२॥

यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले । ध्यान धारणा आसन मुद्रा कैसें समाधीसी आले॥३॥

बोधी बोधिलें बोधितां नये ऐसें झालें । बापरखुमादेवीवरु विठ्ठलें माझें मीपण हारपलें॥४॥

*

राम म्हणतां रामचि होइजे। पदिं बैसोनि पदवी घेइजे ॥१॥

ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहे ॥२॥

रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥३॥

तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें॥४॥

*

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । ह्रदयमंदिरीं । स्मरा कां रे ॥१॥

आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडा वेगी ॥२॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण माळा । ह्रदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति रया ॥३॥

*

झालें रामराज्य काय उणें आम्हासीं । धरणी धरी पीक गाई वोळल्या म्हैसी ॥१॥

राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दळितां कांडितां जेवितां गे बाईये ॥२॥

स्वप्नींही दु:ख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥३॥

तुका म्हणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासा येणें जाणें खुंटलें ॥४॥

N/A

N/A
Last Updated : January 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP