दशक पांचवा - मंत्रांचा

दशक पांचवा - मंत्रांचा

॥ श्रीरामसमर्थ ॥ ॥ श्रीमत् दासबोध ॥ ॥ मंत्रांचा पंचम दशक ॥ ५॥ समास पहिला : गुरुनिश्चय ॥ श्रीराम ॥ जय जज जी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा । अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥ जें वेदांस सांकडें । जें शब्दासि कानडें । तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २॥ जें योगियांचें निजवर्म । जें शंकराचें निजधाम । जें विश्रांतीचें निजविश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३॥ तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणचि होईजे आंगें । दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना सर्वथा ॥ ४॥ आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें । सांगिजेती तेणें प्रमाणें - । मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥ गुरु तों सकळांसी ब्राह्मण । जऱ्हीं तो जाला क्रियाहीन । तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावें ॥ ६॥ अहो या ब्राह्मणाकारणें । अवतार घेतला नारायेणें । विष्णूनें श्रीवत्स मिरविणें । तेथें इतर ते किती ॥ ७॥ ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्रांचे ब्राह्मण । धातुपाषाणीं देवपण । ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥ मुंजीबंधनेंविरहित । तो शूद्रचि निभ्रांत । द्विजन्मी म्हणोनि सतंत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥ सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण । वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥ ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें । कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥ ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत । पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥ ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । होऊन, जडे भगवंतीं । ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥ लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण । परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥ असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती । जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥ अंत्येज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन कायी करावा । ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तों न घडे कीं ॥ १६॥ जें जनावेगळें केलें । तें वेदें अव्हेरिलें । म्हणोनि तयासि नाम ठेविलें । पाषांडमत ॥ १७॥ असो जे हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विस्वास । ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८॥ ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्गुरु करावा । ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुविण नाहीं ॥ १९॥ स्वधर्मकर्मी । म् पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण । ब्रह्मज्ञान नस्तां सीण । जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥ सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं । अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१॥ ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें । म्हणौनि सद्गुरूचीं पाऊलें । सुधृढ धरावीं ॥ २२॥ जयास वाटे देव पाहावा । तेणें सत्संग धरावा । सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३॥ नाना साधनें बापुडीं । सद्गुरुविण करिती वेडीं । गुरुकृपेविण कुडकुडीं । वेर्थचि होती ॥ २४॥ कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें । गोरांजनें धूम्रपानें । साधिती पंचाग्नी ॥ २५॥ हरिकथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण । सर्व तीर्थें परम कठिण । फिरती प्राणी ॥ २६॥ झळफळित देवतार्चनें । स्नानें संध्या दर्भासनें । टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥ अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें । मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें । नाना प्रकारीचीं उपकर्णें । साहित्यशोभा ॥ २८॥ घंटा घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती । आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥ पंचायेत्न पूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें लाखोली । बेलें नारिकेळें भरिली । संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥ उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म । फळचि पावती, वर्म- । चुकले प्राणी ॥ ३१॥ येज्ञादिकें कर्में केलीं । हृदईं फळाशा कल्पिली । आपले इछेनें घेतली । सूति जन्मांची ॥ ३२॥ करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास । रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥ ३३॥ तरी सद्गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित । येमेपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ३४॥ जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती । गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५॥ ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ती भाव आणी भजन । सकळहि फोल ब्रह्मज्ञान - । जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥ सद्गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे । जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणी गडधरां ॥ ३७॥ जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८॥ सद्गुरुविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ । सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९॥ सद्गुरुचेनि अभयंकरें । प्रगट होईजे ईश्वरें । संसारदुःखें अपारें । नासोन जाती ॥ ४०॥ मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर । तयांसहि ज्ञानविज्ञानविचार । सद्गुरुचेनी ॥ ४१॥ श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अतितत्पर गुरुभजनीं । सिद्ध साधु आणी संतजनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२॥ सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक । तेहि सद्गुपदीं रंक । महत्वा न चढेती ॥ ४३॥ असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सद्गुरु करावा । सद्गुरुविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥ आतां सद्गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे । जयांचे कृपेनें प्रकाशे । शुद्ध ज्ञान ॥ ४५॥ त्या सद्गुरूची वोळखण । पुढिले समासीं निरूपण । बोलिलें असे श्रोतीं श्रवण । अनुक्रमें करावें ॥ ४६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयेनाम समास पहिला ॥ १॥


समास दुसरा : गुरुलक्षण ॥ श्रीराम् ॥ जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणिजेती । परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १॥ सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें । नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २॥ सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग । दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३॥ साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान । नाना वाद्यें सिकविती जन । तेहि येक गुरु ॥ ४॥ विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी । कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५॥ जो यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर । तेहि गुरु परी साचार- । सद्गुरु नव्हेती ॥ ६॥ आपली माता आणी पिता । तेहि गुरुचि तत्वतां । परी पैलापार पावविता । तो सद्गुरु वेगळा ॥ ७॥ गाईत्रीमंत्राचा इचारू । सांगे तो साचार कुळगुरु । परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८॥ जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानांधारें निरसी । जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९॥ विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत । तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्गुरु ॥ १०॥ भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी । केली, देखोनि सीघ्र सोडी । तो सद्गुरु जाणावा ॥ ११॥ प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें । ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्गुरु जाणावा ॥ १२॥ वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी । तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरु जाणावा ॥ १३॥ गर्भवास अति सांकडी । इछाबंधनाची बेडी । ज्ञान देऊन सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ॥ १४॥ फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार । तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५॥ जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्मचि करी रोकडें । फेडी संसारसांकडे । वचनमात्रें ॥ १६॥ जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी । शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गारवचनें ॥ १७॥ वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव । तोचि येक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८॥ संदेह निःशेष जाळी ॥ स्वधर्म आदरें प्रतिपाळी । वेदविरहित टवाळी । करूंच नेणे ॥ १९॥ जें जें मन अंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी । तो गुरु नव्हे, भिकारी- । झडे आला ॥ २०॥ शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन । ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥ जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी । इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥ २२॥ येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले । अतिदुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥ जें जें रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी । ऐसी कामना पापिणी । पडली गळां । २४॥ जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु । चोरटा मंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५॥ जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी । आणी सेखीं भीड करी । घातघेणा ॥ २६॥ तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा । भीड करूनियां, गोवा- । घाली बंधनाचा ॥ २७॥ जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन । तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८॥ देखणें दाखविती आदरें । मंत्र फु । म्किती कर्णद्वारें । इतुकेंच ज्ञान, तें पामरें- । अंतरलीं भगवंता ॥ २९॥ बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण । तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥ अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता । ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१॥ जैसा निरूपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो । कृतबुद्धीचा जयो । जालाच नाहीं ॥ ३२॥ निरूपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी । नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३॥ पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत । आणी सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥ ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ । ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५॥ निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे । दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥ बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं । कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७॥ निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत । अवघ्यांवेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८॥ अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९॥ सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्त्व आलें । तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४०॥ सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इछिती ते मूर्ख । कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥ ईश्वरेंविण जे कामना । तेणींचि गुणें नाना यातना । पावती, होती पतना- । वरपडे प्राणी ॥ ४२॥ होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात । सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३॥ म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु । तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४॥ मुख्य सद्गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान । निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५॥ याहीवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ । विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषईं ॥ ४६॥ याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण । जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥ जेथें सारासारविचार । तेथें होये जगोद्धार । नवविधा भक्तीचा आधार । बहुता जनासी ॥ ४८॥ म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन । हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥ अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन । तेथें बहु भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५०॥ नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार । कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१॥ म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन । कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥ यामधें येक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे । म्हणौन सर्वहि विलसे । सद्गुरुपासीं ॥ ५३॥ तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता । नाना साधनें समर्था । सद्गुरुपासीं ॥ ५४॥ साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुतां सवेंच भ्रष्टे । याकारणे दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५॥ आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती । जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६॥ कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव । तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७॥ नीच यातीचा गुरु । तोही कानकोंड विचारु । ब्रह्मसभेस जैसा चोरू । तैसा दडे ॥ ५८॥ ब्रह्मसभे देखतां । त्याचें तीर्थ नये घेतां । अथवा प्रसाद सेवितां । प्राश्चित पडे ॥ ५९॥ तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली । गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६०॥ गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्वतां । तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥ ऐसीं सांकडीं दोहींकडे । तेथें प्रस्तावा घडे । नीच यातीस गुरुत्व न घडे । याकारणें ॥ ६२॥ तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें । बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥ आतां असो हा विचारू । स्वयातीचा पाहिजे गुरु । नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥ जे जे कांहीं उत्तम गुण ॥ तें तें सद्गुरूचें लक्षण । तथापि संगों वोळखण । होये जेणें ॥ ६५॥ येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु । येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६॥ येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु । येक असद्गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७॥ येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु । येक बोलिजे जगद्गुरु । सकळकळा ॥ ६८॥ ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु । ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९॥ येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु । येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७०॥ जे जे यातीचा जो व्यापारु । ते ते त्याचे तितुके गुरु । याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१॥ असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु । परी जो मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२॥ नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । हें सद्गुरूचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुलक्षणनाम समास दुसरा ॥ २॥


समास तिसरा : शिष्यलक्षण ॥ श्रीराम् ॥ माअगां सद्गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण । आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १॥ सद्गुरुविण सच्छिष्य । तो वायां जाय निशेष । कां सच्छिष्येंविण विशेष । सद्गुरु सिणे ॥ २॥ उत्तमभूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडखाद । कां तें उत्तम बीज परी समंध । खडकेंसि पडिला ॥ ३॥ तैसा सच्छिष्य तें सत्पात्र । परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र । तेथें अरत्र ना परत्र । कांहिंच नाहीं ॥ ४॥ अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी । भाअग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५॥ तैसें येकाविण येक । होत असे निरार्थक । परलोकींचें सार्थक । तें दुऱ्हावे ॥ ६॥ म्हणौनि सद्गुरु आणी सच्छिष्य । तेथें न लगती सायास । त्यां उभयतांचा हव्यास । पुरे येकसरा ॥ ७॥ सुभूमि आणी उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण । तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ॥ ८॥ सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें । साधनेंविण तैसें जालें । साधकांसी ॥ ९॥ जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे । पीक आलियांहि, उगें- । राहोंचि नये ॥ १०॥ तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें । येक वेळ उदंड जेविलें । तऱ्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥ म्हणौन साधन अभ्यास आणी सद्गुगु । सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु । सत्कर्म सद्वासना, पारु- । पाववी भवाचा ॥ १२॥ सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणी स्वधर्म । सत्संग आणी नित्य नेम । निरंतर ॥ १३॥ ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान निवळे । नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदाईं ॥ १४॥ येथें शब्द नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्गुरुपासीं । सद्गुरु पालटी अवगुणासी । नाना येत्नें करूनी ॥ १५॥ सद्गुरुचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्गुरु न पालटे । कां जें थोरपण तुटे । म्हणौनिया ॥ १६॥ याकरणें सद्गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे । नाहिं तरी होईजे । पाषांडा वरपडे ॥ १७॥ येथें सद्गुरुचि कारण । येर सर्व निःकारण । तथापि सांगो वोळखण । सच्छिष्याची ॥ १८॥ मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्गुरुवचनीं विश्वास पूर्ण । अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥ शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ । शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २०॥ शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत । शिष्य पाहिजे नेमस्त । सर्वप्रकारीं ॥ २१॥ शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥ २२॥ शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार । शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३॥ शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी । शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४॥ शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध । शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५॥ शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त । शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६॥ शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत । शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता ॥ २७॥ शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढ व्रताचा । शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यसीळ ॥ २८॥ शिष्य असावा सात्विक । शिष्य असावा भजक । शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९॥ शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी । शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३०॥ शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र । शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१॥ शिष्य असावा सद्विद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा । शिष्य असावा अंतरींचा । परमशुद्ध ॥ ३२॥ शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी । शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देही ॥ ३३॥ जो संसारदुःखें दुःखवला । जो त्रिविधतापें पोळला । तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४॥ बहु दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे । संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५॥ जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास । विस्वासबळें दृढ कास । धरिली सद्गुरूची ॥ ३६॥ अविस्वासें कास सोडिली । ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं । नाना जळचरीं तोडिलीं । मध्येंचि सुखदुःखें ॥ ३७॥ याकारणें दृढ विस्वास । तोचि जाणावा सच्छिष्य । मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु ॥ ३८॥ जो सद्गुरुवचनें निवाला । तो सयोज्यतेचा आंखिला । सांसारसंगे पांगिला । न वचे कदा ॥ ३९॥ सद्गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा । सुटला वैभवाचा फांटा । सामरथ्यपिसें ॥ ४०॥ सद्गुरुस्वरूप तें संत । आणी देवांस मांडेल कल्पांत । तेथें कैचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१॥ म्हणौन सद्गुरुसामर्थ्य आधीक । जेथें आटती ब्रह्मादिक । अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसि हें कळेना ॥ ४२॥ गुरुदेवांस बराबरी- । करी तो शिष्य दुराचारी । भ्रांति बैसली अभ्यांतरीं । सिद्धांत नेणवे ॥ ४३॥ देव मनिषीं भाविला । मंत्रीं देवपणासि आला । सद्गुरु न वचे कल्पिला । ईश्वराचेनि ॥ ४४॥ म्हणौनि सद्गुरु पूर्णपणें । देवाहून आधीक कोटिगुणें । जयासि वर्णितां भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥ ४५॥ असो सद्गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे । देवसामर्थ्य तें केवढें । मायाजनित ॥ ४६॥ अहो सद्गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तयापासीं । ज्ञानबळें वैभवासी । तृणतुछ केलें ॥ ४७ ॥ अहो सद्गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळें । मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न यें ॥ ४८॥ ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्गुरुवचनीं दृढ भाव । तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥ ४९॥ अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें । पुढें सद्गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५०॥ लागतां सद्गुरुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें । तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ॥ ५१॥ शरण सद्गुरूस गेले । सच्छिष्य ऐसे निवडले । क्रियापालटें जाले । पावन ईश्वरीं ॥ ५२॥ ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वाटेकरी । येर माईक वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३॥ वाटे विषयांचे सुख । परमार्थ संपादणे लौकिक । देखोवेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४॥ जाली विषईं वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार । परमार्थचर्चेचा विचार । मळिण झाला ॥ ५५॥ मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा । भार वाहिला कुटुंबाचा । काबाडी जाला ॥ ५६॥ मानिला प्रपंचीं आनंद । केला परमार्थी विनोद । भ्रांत मूढ मतिमंद । लोधला कामीं ॥ ५७॥ सूकर पूजिलें विलेपनें । म्हैसा मर्दिला चंदनें । तैसा विषई ब्रह्मज्ञानें । विवेकें बोधिला ॥ ५८॥ रासभ उकिरडां लोळे । तयासि परिमळसोहळे । उलूक अंधारीं पळे । तया केवी हंसपंगती ॥ ५९॥ तैसा विषयदारींचा बराडी । घाली अधःपतनीं उडी । तयास भगवंत आवडी । सत्संग कैंचा ॥ ६०॥ वर्ती करून दांताळीं । स्वानपुत्र हाडें चगळी । तैसा विषई तळमळी । विषयसुखाकारणे । ॥ ६१॥ तया स्वानमुखीं परमान्न । कीं मर्कटास सिंहासन । तैसें विषयशक्तां ज्ञान । जिरेल कैंचें ॥ ६२॥ रासभें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्यें प्रतिष्ठला । न वचे, तैसा आअशक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३॥ मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा । लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ॥ ६४॥ तैसे सज्जनाचे संगती । विषई सज्जन म्हणविती । विषय आमेद्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५॥ काखे घेऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा । तैसा विषई सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥ ६६॥ असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख । नारकी प्राणी नर्क । भोगिती स्वैच्छा ॥ ६७॥ वैषेची करील सेवा । तो कैसा मंत्री म्हणावा । तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवी ॥ ६८॥ तैसे विषई बापुडे । त्यांस ज्ञान कोणीकडे । वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे जाले ॥ ६९॥ ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमधें कनिष्ठ । हीन अविवेकी आणी दृष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७०॥ ऐसे जे पापरूप । दीर्घदोषी वज्रलेप । तयांस प्राश्चीत, अनुताप- । उद्भवतां ॥ ७१॥ तेंहि पुन्हां शरण जावें । सद्गुरूस संतोषवावें । कृपादृष्टी जालियां व्हावें । पुन्हां शुद्ध ॥ ७२॥ स्वामीद्रोह जया घडे । तो यावश्चंद्र नरकीं पडे । तयास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचुनी ॥ ७३॥ स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें । तेणें गुणें उपतिष्ठले- । नाहीं ज्ञान । ७४॥ भाव आणिला जायाचा । मंत्र घेतला गुरूचा । शिष्य जाला दो दिसांचा । मंत्राकारणें ॥ ७५॥ ऐसे केले गुरु उदंड । शब्द सिकला पाषांड । जाला तोंडाळ तर्मुंड । माहापाषांडी ॥ ७६॥ घडी येक रडे आणी पडे । घडी येक वैराग्य चढे । घडी येक अहंभाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७॥ घडी येक विस्वास धरी । सवेंच घडि येक गुर्गुरी । ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८॥ काम क्रोध मद मत्सर । लोभ मोह नाना विकार । अभिमान कापट्य तिरस्कार । हृदईं नांदती ॥ ७९॥ अहंकार आणी देहपांग । अनाचार आणी विषयसंग । संसार प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८०॥ दीर्घसूत्री कृतघ्न पापी । कुकर्मी कुतर्की विकल्पी । अभक्त अभाव सीघ्रकोपी । निष्ठुर परघातक ॥ ८१॥ हृदयेंसुन्य आणी आळसी । अविवेकी आणि अविस्वासी । अधीर अविचार, संदेहासी- । दृढ धर्ता ॥ ८२॥ आशा ममता तृष्णा कल्पना । कुबुद्धी दुर्वृत्ति दुर्वासना । अल्पबुद्धि विषयकामना । हृदईं वसे ॥ ८३॥ ईषणा असूया तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें । देहाभिमानें हुंबरे । जाणपणें ॥ ८४॥ क्षुधा तृष्णा आवरेना । निद्रा सहसा धरेना । कुटुंबचिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५॥ शाब्दिक बोले उदंड वाचा । लेश नाहीं वैराग्याचा । अनुताप धारिष्ट साधनाचा । मार्ग न धरी ॥ ८६॥ भक्ति विरक्ति ना शांती । सद्वृत्ति लीनता ना दांती । कृपा दया ना तृप्ती । सुबुद्धि असेच ना ॥ ८७॥ कायाक्लेसीं शेरीरहीन । धर्मविषईं परम कृपण । क्रिया पालटेना कठिण । हृदये जयाचें ॥ ८८॥ आर्जव नाहीं जनासी । जो अप्रिये सज्जनासी । जयाचे जिवीं आहिर्णेसीं । परन्यून वसे ॥ ८९॥ सदा सर्वकाळ लटिका । बोले माईक लापणिका । क्रिया विचार पाहतां, येका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९०॥ परपीडेविषईं तत्पर । जैसे विंचु आणि विखार । तैसा कुशब्दें जिव्हार । भेदी सकळांचें ॥ ९१॥ आपले झांकी अवगुण । पुढिलांस बोले कठिण । मिथ्या गुणदोषेंविण । गुणदोष लावी ॥ ९२॥ स्वयें पापात्मा अंतरीं । पुढिलांचि कणव न करी । जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३॥ दुःख पराव्याचें नेणती । दुर्जन गांजिले चि गांजिती । श्रम पावतां आनंदती । आपुले मनीं ॥ ९४॥ स्वदुःखें झुरे अंतरीं । आणी परदुःखें हास्य करी । तयास प्राप्त येमपुरी । राजदूत ताडिती ॥ ९५॥ असो ऐसें मदांध बापुडें । तयांसि भगवंत कैंचा जोडे । जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेंकरूनी ॥ ९६॥ तयास देहाचा अंतीं । गात्रें क्षीणता पावती । जिवलगें वोसंडिती । जाणवेल तेव्हां ॥ ९७॥ असो ऐसे गुणावेगळे । ते सच्छिष्य आगळे । दृढभावार्थें सोहळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८॥ जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभिमान पाठीं लागे । ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९॥ जेणेंकरितां दुःख जालें । तेंचि मनीं दृढ धरिलें । तेणें गुणें प्राप्त जालें । पुन्हां दुःख ॥ १००॥ संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें । ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १०१॥ संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती । जाणोन डोळे झांकिती । पढतमूर्ख ॥ १०२॥ प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा । परमार्थ अवघाचि बुडवावा । हें विहित नव्हे ॥ १०३॥ मागां जालें निरूपण । गुरुशिष्यांची वोळखण । आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिष्यलक्षणनाम समास तिसरा ॥ ३॥


समास चवथा : उपदेशलक्षण ॥ श्रीराम् ॥ ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें । सांगतां तें असाधारणें । परी कांहीं येक सांगों ॥ १॥ बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती । येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २॥ शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र । अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३॥ मछकूर्मवऱ्हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र । भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४॥ भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र । नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५॥ शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमन्त्र वेताळमंत्र । झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे ॥ ६॥ बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र । बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७॥ पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र । सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८॥ पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी । तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९॥ असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा । विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १०॥ कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती । कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११॥ ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं । जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२॥ येक शिव शिव सांगती ॥ येक हरि हरि म्हणविती । येक उपदेशिती । विठल विठल म्हणोनी ॥ १३ ॥ येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्ण विष्ण । येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४॥ येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत । येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५॥ येक सांगती राम राम । येक सांगती ऒं ऒं म । येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६॥ येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्वरु । येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७॥ येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज । येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८॥ येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव । येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९॥ येक विश्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती । येक ते जप करविती । तुकाई तुकाई म्हणौनी ॥ २०॥ हें म्हणौनी सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें । इछेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१॥ येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी । येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२॥ येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी । येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३॥ येक संगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग । येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥ २४॥ येक तपें सांगती । येक अजपाअ निरोपिती । येक तत्वें विस्तारिती , तत्वज्ञानी ॥ २५॥ येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण । येक उपदेशिती तीर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६॥ येक माहावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती । येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनी ॥ २७॥ येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती । येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८॥ येक सांगती वशीकर्ण । स्तंबन मोहन उच्चाटण । नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९॥ ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती । ऐसे हे उपदेश असती । असंख्यात । ३०॥ ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेविण निरार्थक । येविषईं असे येक । भगवद्वचन ॥ ३१॥ श्लोक ॥ नानाशास्त्रं पठेल्लोको नाना दैवतपूजनम् । आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ शैवशाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मताः । अपभ्रंशसमास्ते । अपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥ न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥ याकारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे अन्न । म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२॥ सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश । येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ॥ ३३॥ श्लोक ॥ यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् । तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ॥ आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा । प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४॥ सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती । त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५॥ श्लोक: ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् । तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥ म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन । ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेशनाम समास चवथा ॥ ४॥



समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण ॥ श्रीराम् ॥ जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं निर्फळ । ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १॥ ज्ञान म्हणतां वाटे भस्म । काये रे बा असेल वर्म । म्हणौनि हा अनुक्रम । सांगिजेल आतां ॥ २॥ भूत भविष्य वर्तमान । ठाऊकें आहे परिछिन्न । यासीहि म्हणिजेत ज्ञान । परी तें ज्ञान नव्हे ॥ ३॥ बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान । वैदिक शास्त्र वेदाधेन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४॥ नाना वेवसायाचें ज्ञान । नाना दिक्षेचें ज्ञान । नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५॥ नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा । नाना नरांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ६॥ नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा । नाना स्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७॥ नाना पशूंची परीक्षा । नाना पक्षांची परीक्षा । नाना भूतांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८॥ नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा । नाना शस्त्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ९॥ नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा । नाना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १०॥ नाना पाषाण परीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा । नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११॥ नाना भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा । नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२॥ नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा । नाना अंकुर परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३॥ नाना पुष्पांची परीक्षा । नाना फळांची परीक्षा । नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४॥ नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा । नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १५॥ नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा । नाना मूर्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १६॥ नाना क्षत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा । नाना पात्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १७॥ नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा । नाना तर्कांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १८॥ नाना अनुमान परीक्षा । नाना नेमस्त परीक्षा । नाना प्रकार परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १९॥ नाना विद्येची परीक्षा । नाना कळेची परीक्षा । नाना चातुर्य परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २०॥ नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थांची परीक्षा । नाना भाषांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २१॥ नाना स्वरांची परीक्षा । नाना वर्णांची परीक्षा । नाना लेक्षनपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २२॥ नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा । नाना वृत्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २३॥ नाना रूपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा । नाना सुगंधपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २४॥ नाना सृष्टींची परीक्षा । नाना विस्तारपरीक्षा । नाना पदार्थपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २५॥ नेमकेचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें । सीघ्रचि कवित्व करणें । हें ज्ञान नव्हे ॥ २६॥ नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा । स्वरपालवी संकेतकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २७॥ काव्यकुशळ संगीतकळा । गीत प्रबंद नृत्यकळा । सभाच्यातुर्य शब्दकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २८॥ वग्विळास मोहनकळा । रम्य रसाळ गायनकळा । हास्य विनोद कामकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २९॥ नाना लाघवें चित्रकळा । नाना वाद्यें संगीतकळा । नाना प्रकारें विचित्र कळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३०॥ आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा । चौदा विद्या सिद्धि सकळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३१॥ असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- । म्हणोंचि नये ॥३२॥ हें ज्ञान होयेसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें । जेथें प्रकृतीचें पिसें । समूळ वाव ॥ ३३॥ जाणावें दुसर्याचें जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें । परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४॥ माहानुभाव माहाभला । मानसपूजा करितां चुकला । कोणी येकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५॥ ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासि परम ज्ञाता म्हणती । परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥ बहुत प्रकारींची ज्ञानें । सांगों जातां असाधारणें । सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७॥ तरी तें कैसें आहे ज्ञान । समाधानाचें लक्षण । ऐसें हें विशद करून । मज निरोपावें ॥ ३८ ॥ ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिले समासीं निरोपिलें । श्रोतां अवधान दिधलें । पाहिजे पुढें ॥ ३९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पंचवा ॥ ५॥



समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण ॥ श्रीराम् ॥ ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान । पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ॥ १॥ मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप वोळखावें । नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २॥ जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे । समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३॥ मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ॥ ४॥ जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान । विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५॥ सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया । परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६॥ दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७॥ जेथें सर्वचि नाहीं ठाईंचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचें । म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥ ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत । म्हणौनि शुद्ध ज्ञान सतंत । वेगळेंचि असे ॥ ९॥ ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण । या नांव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १०॥ माहावाक्यौपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला । तेथीचा तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११॥ माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥ माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां । त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥ माहावाक्याशें विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण । शुद्ध लक्ष्यांचें आपण । वस्तुच आहे ॥ १४॥ आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ । जें आदिअंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५॥ जेथून हें सर्व ही प्रगटे । आणि सकळही जेथें आटे । तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६॥ मतें आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें । अतिसूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७॥ जे या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ । या नांव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८॥ शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान । या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९॥ आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता । तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥ मी कोण ऐसा हेत- । धरून, पाहातां देहातीत । आवलोकितां नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१॥ असो पूर्वीं थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार- । पावले, ते साचार । ऐक आतां ॥ २२॥ व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी । जनकादिक माहाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३॥ वामदेवादिक योगेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर । शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४॥ सनकादिक मुख्यकरूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५॥ सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव । जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६॥ जें वेदशास्त्रांचें सार । सिद्धांत धादांत विचार । ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७॥ साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान । सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें संगिजेल आतां ॥ २८॥ तीर्थें व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें । पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९॥ सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ । जेणें संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥ छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत । या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१॥ जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी । तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२॥ पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मऱ्हाष्ट ग्रंथीं । हृदईं वसल्या कृपामुर्ती । सद्गुरु स्वामी ॥ ३३॥ आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत । माझा स्वामी कृपेसहित । हृदईं वसे ॥ ३४॥ न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रेत्नेंविण सौरस । सद्गुरुकृपा ॥ ३५॥ ग्रंथ मात्र मऱ्हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ । त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६॥ त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाहीं । जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगटजाला ॥ ३७॥ असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाहि मथितार्थ । अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८॥ अरे गहनाचेंही गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन । सद्गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९॥ सद्गुरुवचन तोचि वेदांत । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत । सद्गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४०॥ जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन । जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१॥ तें हें माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतों तुज । जरी अवधान देसी मज ॥ तरी आतां येच क्षणीं ॥ ४२॥ शिष्य म्लान्वदनें बोले । धरिले सदृढ पाउले । मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३॥ अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्ये । तोही सांगतों, ऐक्य- । गुरुशिष्य जेथें ॥ ४४॥ ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म । ये विषईं संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५॥ नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन । तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६॥ निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें । प्रकृति पुरुष जीयें । तेही ब्रह्म होती ॥ ४७॥ दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८॥ सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता । पिंड ब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठें ॥ ४९॥ ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केर आटे । तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५०॥ मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे । सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥ असो गुरूचे ठाईं अनन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता । वेगळेंपणें अभक्ता । उरोंचि नको ॥ ५२॥ आतां हेंचि दृढीकर्ण- । व्हावया, करीं सद्गुरुभजन । सद्गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥ या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान । भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥ देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा । देहाभिनानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५॥ असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा । सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६॥ कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७॥ शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें । तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८॥ अखंड घडे श्रवणमनन । तरीच पाविजे समाधान । पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥ शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसीं इंद्रियें बाष्कळ । तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६०॥ विषईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें । मणी टाकितांचि लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१॥ मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनिया तयाचा । मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२॥ ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन । जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३॥ म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या । तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४॥ सन्यपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे । औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५॥ तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । ज्ञानाउषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६॥ मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला । तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७॥ मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें । मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८॥ मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी । जागा जालियां तयासी । भयेंचि नाहीं॥ ६९॥ परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगी काविरें । पूर्ण जागृती श्रवणद्वारें- । मननें करावी ॥ ७०॥ जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण । जो विषईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१॥ जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें । तेणें साधन करावें । थोरीव सांडुनी ॥ ७२॥ साधन न मने जयाला । तो सिद्धपणे बद्ध जाला । त्याहूनि मुमुक्ष भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३॥ तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण । साधक सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४॥ याचें उत्तर श्रोतयांसी । दिधलें पुढिलीये समासीं । सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥



समास सातवा : बद्धलक्षण ॥ श्रीराम् ॥ सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार । परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १॥ ऐक तयांचें लक्षण । चत्वार ते कोण कोण । बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ २॥ यां चौघांविरहित कांहीं । सचराचरीं पांचवा नाहीं । आतां असो हें सर्वही । विशद करूं ॥ ३॥ बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षाचें लक्षण । साधकसिद्धवोळखण । कैसी जाणावी ॥ ४॥ श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध । मुमुक्ष साधक आणि सिद्ध । पुढें निरोपिले ॥ ५॥ आतां बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा । चक्षुविण दाही दिशा । सुन्याकार ॥ ६॥ भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी । पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥ न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्माधर्म । न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८॥ तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र । सन्मार्ग जो कां पवित्र । तो ही न दिसे ॥ ९॥ न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार । न कळे कैसा परोपकार । दानपुण्य ॥ १०॥ नाहीं पोटीं भूतदया । नाहीं सुचिष्मंत काया । नाहीं जनासि निववावया । वचन मृद ॥ ११॥ न कळे भक्ति न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान । न कळे मोक्ष न कळे साधन । या नांव बद्ध ॥ १२॥ न कळे देव निश्चयात्मक । न कळे संतांचा विवेक । न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३॥ न कळे परमार्थाची खूण । न कळे अध्यात्मनिरूपण । न कळे आपणासि आपण । या नांव बद्ध ॥ १४॥ न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनाचें फळ । न कळे तत्वतां केवळ । या नांव बद्ध ॥ १५॥ न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण । न कळे वस्तु विलक्षण । या नांव बद्ध ॥ १६॥ न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला । न कळे संकल्पें बांधला । या नांव बद्ध ॥ १७॥ जयासि नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण । तीर्थ व्रत दान पुण्य । कांहींच नाहीं ॥ १८॥ दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मित्रि नाहीं । शांति नाहीं क्ष्मा नाहीं । या नांव बद्ध ॥ १९॥ जें ज्ञानविशिं उणें । तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें । बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २०॥ नाना प्रकारीचे दोष- । करितां, वाटे परम संतोष । बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१॥ बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद । बहु द्वंद बहु खेद । या नांव बद्ध ॥ २२॥ बहु दर्प बहु दंभ । बहु विषये बहु लोभ । बहु कर्कश बहु अशुभ । या नांव बद्ध ॥ २३॥ बहु ग्रामणी बहु मत्सर । बहु असूया तिरस्कार । बहु पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४॥ बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा । बहु कुकर्माचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५॥ बहु कापट्य वादवेवाद । बहु कुतर्क भेदाभेद । बहु क्रूइर कृपामंद । या नांव बद्ध ॥ २६॥ बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिळाष । बहु प्रकारीचे दोष । या नांव बद्ध ॥ २७॥ बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट येकंकार । बहु आनित्य अविचार । या नांव बद्ध ॥ २८॥ बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी । तपीळ कुविद्या अनेकी । या नांव बद्ध ॥ २९॥ बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनर्थी । बहु डाईक दुर्मती । या नांव बद्ध ॥ ३०॥ बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना । बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥ ३१॥ बहु विकल्पी बहु विषादी । बहु मूर्ख बहु समंधी । बहु प्रपंची बहु उपाधी । या नांव बद्ध ॥ ३२॥ बहु वाचाळ बहु पाषंडी । बहु दुर्जन बहु थोतांडी । बहु पैशून्य बहु खोडी । या नांव बद्ध ॥ ३३॥ बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम । बहु विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४॥ बहु कृपण बहु खंदस्ती । बहु आदखणा बहु मस्ती । बहु असत्क्रिया व्यस्ती । या नांव बद्ध ॥ ३५॥ परमार्थविषईं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान । नेणे स्वयें समाधान । या नांव बद्ध ॥ ३६॥ परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर । संसारभार जोजार । या नांव बद्ध ॥ ३७॥ सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी । देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥ ३८॥ हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ । सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥ नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी । चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४०॥ काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण । द्रव्यदारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥ ४१॥ इंद्रियें करून निश्चळ । चंचळ होऊं नेदी पळ । द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥ ४२॥ द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ । द्रव्य दारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥ ४३॥ वेर्थं जाऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ । कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४॥ नाना चिंता नाना उद्वेग । नाना दुःखाचे संसर्ग । करी परमार्थाचा त्याग । या नांव बद्ध ॥ ४५॥ घटिका पळ निमिष्यभरी । दुश्चीत नव्हतां अंतरीं । सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६॥ तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ति कथा निरूपण । मंत्र पूजा जप ध्यान । सर्वही द्रव्य दारा ॥ ४७॥ जागृति स्वप्न रात्रि दिवस । ऐसा लागला विषयेध्यास । नाहीं क्षणाचा अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८॥ ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षपणीं पालटे जाण । ऐक तेही वोळखण । पुढिलीये समासीं ॥ ४९॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्धलक्षणनाम समास सातवा ॥ ७॥



समास आठवा : मुमुक्षलक्षण ॥ श्रीराम् ॥ संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें । जयाचेनि मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १॥ ऐसा प्रणी जो कां बद्ध । संसारीं वर्ततां अबद्ध । तायस प्राप्त जाला खेद । काळांतरीं ॥ २॥ संसारदुःखें दुखवला । त्रिविधतापें पोळला । निरूपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३॥ जाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास । म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४॥ प्रपंच जाईल सकळ । येथील श्रम तों निर्फळ । आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५॥ ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली । म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६॥ पूर्वी नाना दोष केले । ते अवघेचि आठवले । पुढें येउनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७॥ आठवे येमाची यातना । तेणें भयेचि वाटे मना । नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८॥ नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर । आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९॥ आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले । देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १०॥ निंदे ऐसे नाहीं दोष । तें मज घडले कीं विशेष । माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११॥ नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत । नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२॥ पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें । मन अव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३॥ नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार । नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४॥ भक्तिमाता हे बुडविली । शांति विश्रांति मोडिली । मूर्खपणें म्यां विघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५॥ आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक । पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६॥ कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा । कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७॥ नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला । दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८॥ कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं । आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९॥ पोटीं धरूनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान । अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २०॥ वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले । माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारींचे ॥ २१॥ सत्य तेंचि उछेदिलें । मिथ्य तेंचि प्रतिपादलें । ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें ॥ २२॥ ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला । तोचि मुमुक्ष बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३॥ पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी । विरक्त जाला संसारीं । या नांव मुमुक्ष ॥ २४॥ गेले राजे चक्रवर्ती । माझें वैभव तें किती । म्हणे धरूं सत्संगती । या नांव मुमुक्ष ॥ २५॥ आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । आपणासि निंदी दुःखें । या नांव मुमुक्ष ॥ २६॥ म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी । म्हणे मी काये अनाचारी । या नांव मुमुक्ष ॥ २७॥ म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ । म्हणे मी पापी केवळ । या नांव मुमुक्ष ॥ २८॥ म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन । म्हणे मी जन्मलो पाषाण । या नांव मुमुक्ष ॥ २९॥ म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं । म्हणे मी नाना वेसनी । या नांव मुमुक्ष ॥ ३०॥ म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर । म्हणे मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्ष ॥ ३१॥ म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ । म्हणे मी कुबुद्धि कुटीळ । या नांव मुमुक्ष ॥ ३२॥ म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें । आपलीं वर्णी कुलक्षणें । या नांव मुमुक्ष ॥ ३३॥ म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्चिळ अघोरी । म्हणे मी नीच नानापरी । या नांव मुमुक्ष ॥ ३४॥ म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी । म्हणे मी नव्हे परमार्थी । या नांव मुमुक्ष ॥ ३५॥ म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी । म्हणे मी भार जालों भूमीसी । या नांव मुमुक्ष ॥ ३६॥ आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास । धरी सत्संगाचा हव्यास । या नांव मुमुक्ष ॥ ३७॥

नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं । नाना ग्रन्थांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८॥ तेणें नव्हे समाधान । वाटे अवघाच अनुमान । म्हणे रिघों संतांस शरण । या नांव मुमुक्ष ॥ ३९॥ देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान । सांडूनि, संतचरणीं अनन्य- । या नांव मुमुक्ष ॥ ४०॥ अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी । मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्ष ॥ ४१॥ ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थाकारणें झिजे । संतापाईं विश्वास उपजे । या नांव मुमुक्ष ॥ ४२॥ स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा । अंकित होईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३॥ ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें वोळखिजे । पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥ ८॥



समास नववा : साधकनिरूपण ॥ श्रीराम् ॥ मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन । आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १॥ अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग । तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥२॥ जो संतांसि शरण गेला । संतजनीं आश्वासिला । मग तो साधक बोलिला । ग्रन्थांतरीं ॥ ३॥ उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक ॥ ४॥ धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी । मननें अर्थांतर काढी । या नांव साधक ॥ ५॥ होतां सारासार विचार । ऐके होऊनि तत्पर । संदेह छेदूनि, दृढोत्तर- । आत्मज्ञान पाहे ॥ ६॥ नाना संदेहनिवृत्ती- । व्हावया, धरी सत्संगती । आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसी आणी ॥ ७॥ देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी । श्रवण मन केलेंचि करी । या नांव साधक ॥ ८॥ विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान । विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥ ९॥ तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी । लावी ऐक्यतेची समाधी । या नांव साधक ॥ १०॥ आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार । विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११॥ उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरूपणें । बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव साधक ॥ १२॥ असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली । स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३॥ अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास । स्वरूपीं लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४॥ दृढ निश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे । सदा स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५॥ प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं । आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६॥ जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ॥ १७॥ जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहातांचि अंध करी । तें साधी नाना परी । या नांव साधक ॥ १८॥ जें साधूं जाता साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना । तेंचि अनुभवें आणी मना । या नांव साधक ॥ १९॥ जेथें मनचि मावळे । जेथे तर्कचि पांगुळे । तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥ २०॥ स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें । तेंचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१॥ अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । कांहींच नहोन असणें । या नांव साधक ॥ २२॥ परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी । स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३॥ देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ । साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४॥ विवेकबळें गुप्त जाला । आपेंआप मावळला । दिसतो, परी देखिला । नाहींच कोणीं ॥ २५॥ मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें । तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६॥ पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी । अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥ द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला । देहीं असोनि विदेह जाला । या नांव साधक ॥ २८॥ जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती । सकळ संदेहनिवृत्ती । या नांव साधक ॥ २९॥ पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार । निर्गुणीं जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥ स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतास नाहीं आलें । सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१॥ मायेचें जें प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण । स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२॥ निद्रा सांडूनि चेइरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला । माया सांडून तैसा गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३॥ ऐसि अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली । संसारौपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४॥ कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला । मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥ कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें । परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६॥ अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला । लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥ थोरपणासि पाडिलें । वैभवासि लाथाडिलें । महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥ भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला । पाईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥ विकल्पाचा केला वधू । थापें मारिला भवसिंधू । सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४०॥ भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें । मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१॥ देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला । कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२॥ अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें । पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३॥ गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थीं घातला । अनर्थ तोही निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४॥ मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें । शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥ द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी । धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥ ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चयो बळावला । अवगुणांचा संव्हार केला । वैराग्यबळें ॥ ४७॥ अधर्मास स्वधर्में लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झुगटिलें । लांटुन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८॥ तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला । विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९॥ कोपावरी घालणें घातलें । कापट्य अन्तरीं कुटिलें । सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५०॥ प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग । निवृत्तिपंथें ज्ञानयोग । साधिता जाहला ॥ ५१॥ विषयमैंदासि सिंतरिलें । कुविद्येसी वेढा लाविलें । आपणास सोडविलें । आप्ततस्करांपासूनी ॥ ५२॥ पराधीनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला । दुराशेचा त्याग केला । येकायेकीं ॥ ५३॥ स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना । साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४॥ अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला । प्रेत्न सांगातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५॥ सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्यविवेक । संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६॥ बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार । शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७॥ विसरास विसरला । आळसाचा आळस केला । सावध नाहीं दुश्चित्त झाला । दुश्चित्तपणासी ॥ ५८॥ आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरूपणें । तो साधक ऐसा येणें- । प्रमाणें बुझावा ॥ ५९॥ बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणोनि साधक बोलिजे । आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६०॥ येथें संशयो उठिला । निस्पृह तोचि साधक जाहला । त्याग न घडे संसारिकाला । तरि तो साधक नव्हे कीं ॥ ६१॥ ऐसें श्रोतयाचें उत्तर । त्याचें कैसें प्रत्युत्तर । पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधकलक्षणनिरूपण नाम समास नववा ॥ ९॥


समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण ॥ श्रीराम् ॥ मागां बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक । ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १॥ सन्मार्ग तोचि जीवीं धरणें । अन्मार्गाचा त्याग करणें । संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २॥ कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं । संसारिकां त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३॥ प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला । तरीच पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४॥ त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा । त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५॥ ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयतांस घडे सांग । निस्पृहास बाह्य त्याग । विशेष आहे ॥ ६॥ संसारिका ठाईं ठाईं । बाह्य त्याग घडे कांहीं । नित्य नेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७॥ फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे । पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८॥ मागां झालें निरूपण । साधकाची ओळखण । आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९॥ साधु वस्तु होऊनि ठेला । संशयें ब्रह्मांडाबाहेरी गेला । निश्चयें चळेना ऐसा झाला । या नांव सिद्ध ॥ १०॥ बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण । मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११॥ साधकासि संदेहवृत्ति । पुढें होतसे निवृत्ती । या कारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२॥ संशयरहित ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण । सिद्धाआंगीं संशयो हीन । लागेल कैसा ॥ १३॥ कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशय कालवला । सर्वांमध्यें संशयो भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४॥ संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें । संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५॥ व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव । व्यर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांही ॥ १६॥ व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ । व्यर्थ संशयाचा परमार्थ । निश्चयेंवीण ॥ १७॥ व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ संशयाची प्रीती । व्यर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८॥ व्यर्थ संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें । व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९॥ व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती । व्यर्थ संशयाची गती । निश्चयेंविण ॥ २०॥ व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ संशयाचा पक्ष । व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१॥ व्यर्थ संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित । व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण ॥ २२॥ व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता । व्यर्थ संशयाचा ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥ निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं । व्यर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४॥ निश्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें । बाष्कळ बोलिजे वाचाळपणें । निरर्थक ॥ २५॥ असो निश्चयेंविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना । संशयें काहीं समाधाना । उरी नाहीं ॥ २६॥ म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान । तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्चयेंसीं ॥ २७॥ तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय करावा कवण । मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८॥ ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा । नाना देवांचा वळसा । करूंचि नये ॥ २९॥ जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार । शुद्ध विवेकें परमेश्वर । ओळखावा ॥ ३०॥ मुख्य देव तो कोण । भक्तांचें कैसें लक्षण । असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१॥ आपुल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पहावें । संग त्यागून रहावें । वस्तुरूप ॥ ३२॥ तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्चयो । पहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३॥ पूर्वपक्षें सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत । मग पावावा निवांत । निश्चयो देवाचा ॥ ३४॥ देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो । चळों नेदावा निश्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५॥ सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान । याकारणें समाधान । आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६॥ आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी । याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७॥ आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची । अहमात्मा हें कधींची । विसरों नये ॥ ३८॥ निरोपिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण । संतांसी गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९॥ आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें । मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४०॥ सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो । याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१॥ देहसमंधाचेनि गुणें । लक्षणासि काये उणें । देहातीतांचीं लक्षणें । काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२॥ जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं । निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंसीं ॥ ४३॥ लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठाईंची निर्गुण । तेंचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरूप ॥ ४४॥ तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

॥ दशक पांचवा समाप्त ॥

N/A

N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP