आषाढ वद्य ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


‘कुलीखाना’ चा नेताजी पालकर !

शके १५९८ च्या आषाढ व. ४ रोजीं श्रीशिवाजीमहाराज यांनीं प्रसिध्द वीर नेताजी पालकर यास शुध्द करुन परत हिंदु धर्मात घेतलें.
नेताजी पालकर हा सातारा जिल्ह्यांतील खंडोबाची पाली येथील राहणारा. अफझलखानाच्या लोकांवर तुटून पडून त्याचा पराभव करण्यांत याचाच पराक्रम विशेषत्वानें कारणीभूत झाला. गनिमी काव्याचा आश्रय करुन नेताजीनें अनेक मुसलमानी अधिकार्‍यांना बेजार केलें होतें. दक्षिणेकडील मुलखांत धामधूम उडवून यानें पुष्कळ खंडणी वसूल केली होती. दक्षिणच्या मोहिमेंत ज्या वेळीं जयसिंग होता त्या वेळीं औरंगजेबाच्या सांगण्यावरुन जयसिंगानें नेताजीस दिल्लीस पाठविलें होतें. तत्पूर्वीच त्याचा व शिवाजीचा बेबनाव झालेला होता. ‘सरनोबत नेताजी पालकर याचा मेहुणा रात्रीस गैरहजर जाला. वर्तमान राजांस विदित होऊन रागास येऊन एक महिन्याची गैरहजेरी करूं लागले. त्या समयीं नेताजींनीं बहुत रदबदली केली. म्हणोन स्वामींनीं इतराजी करुन दूर केलें’, असा खुलासा यासंबंधीं सांपडतो. पुढें नेताजी दिल्लीस पोंचल्यावर औरंगजेबानें सांगितलें, “तुम्ही मुसलमान व्हा म्हणजे मोठी नोकरी देऊं, नाहीं तर जन्मभर अशीच कैद भोगीत राहिलें पाहिजे.” तेव्हां शके १५८९ मध्यें बादशहानें त्यास मुलसमानी धर्माची दीक्षा देऊन त्याचें नांव महंमद कुलीखान असें ठेविलें. तिकडे चाललेल्या अफगाणिस्तानच्या डोंगरी मुलखांत या कुलीखानानें चांगलेंच यश कमाविलें; आणि बादशहाची कृपा संपादन केली. तेव्हां बादशहानें त्यास दिलेरखानाबरोबर शिवाजीचें पारिपत्य करण्यासाठीं पाठविलें. परंतु दक्षिणेंत आल्यावर हा एके दिवशीं गुप्त रुपानें मोंगली छावणींतून शिवाजीकडे आला. शिवरायांनीं लगेच आषाढ व. ४ रोजीं त्याला प्रायश्चित्त देऊन परत हिंदु धर्माची दीक्षा दिली. “नेताजी पालकर वृत्तीचे निवाडे दूरदृष्टीनें विचारुन करतात. मुद्दाम महाबळेश्वरास मनुष्य पाठवून विज्ञानेश्वराचा ग्रंथ आणविला... धर्मशास्त्राचा मथितार्थ काढून ... धर्मत: आपले पूर्वज स्मरोन निवाडा केला. ” असा मजकूर याच्या न्यायप्रियतेबद्दल सांपडतो.
- १९ जून १६७६
------------

आषाढ व. ४
सार्वजनिक काकांचें निधन !

शके १८०२ च्या आषाढ व. ४ रोजीं महाराष्ट्रांतील सुप्रसिध्द कार्यकर्तें व वकील गणेश वासुदेव जोशी ऊर्फ ‘सार्वजनि काका’ यांचे निधन झालें.
काकाचें मूळचें घराणें रत्नागिरीचें. सातारा येथें शिक्षण झाल्यावर यांनीं पुणें येथें नाझर कचेरींत नोकरी धरली. त्यानंतर वकिलीची परीक्षा देऊन यांनीं आपला जन्म चांगलाच बसविला. पुण्याच्या ‘सार्वजनिक सभे’ चे संस्थापक हेच होत. तत्कालीन अनेक प्रकारच्या सार्वजनिक चळवळींत काका भाग घेत असत. पुणें शहर - सुधारणा, कायद्याचे मसुदे देशी भाषेंत व्हावेत म्हणून खटपट, मुंबईच्या हायकोर्टात एतद्देशीय न्यायाधीश नेमण्यासंबंधीं प्रयत्न, ज्यूरीचे हक्क, रेल्वे - उतारुंच्या तक्रारी, दुष्काळांत मदत, इत्यादि अनेकविध कार्यातून यांनीं पुढाकार घेतलेला असे. महाराष्ट्रांत तरी स्वदेशीची मोहीम यांनींच प्रथम सुरु केली. ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ स्थापन करुन तिच्या व्दारां देशी मालाचीं दुकानें उघडण्यांत आलीं. त्यांनीं जन्मभर स्वदेशीचें व्रत पाळलें. स्वदेशी छत्र्या, काडयाच्या पेटया व देशी माग यांचा कारखाना आपल्याच घरीं काढून यांनीं बरीच झीजहि सोसली. “लवाद कोर्टाची स्थापना करणें, कलकत्त्यास व मुंबईस वर्तमानपत्रकर्त्याची परिषद भरविणें, शेतकी कमिशनच्या. वेळीं शेतकर्‍यांची बाजू योग्य तर्‍हेनें मांडणें, वासुदेव बळवंत फडके यांचें वकीलपत्र घेण्यास कोणी धजत नसतां त्यांचें वकीलपत्र घेऊन काम पाहणें, जळलेला विश्रामबागवाडा बांधण्यासाठीं निधी उभारणें, इत्यादि अनेक कार्ये करीत करीतच काकांनीं आपला देह चंदनाप्रमाणें झिजविला. अफगणिस्तानाच्या अमिराकडे जाऊन रदबदली करण्याचीहि तयारी यांनीं दर्शविली होती. सुरतेच्या दंग्यामुळें तेथील वकिलांवर संकट आलें असतां हे त्यांच्या मदतीसाठीं गेले होते ”
आपल्या मातेच्या सांगण्यावरुन यांनीं पुण्यास विष्णुमंदिर बांधिलें. तें ‘नव्या विष्णूचें मंदिर’ म्हणून प्रसिध्द आहे. यांच्या स्मारकासाठीं सहा हजार रुपये जमले होते. त्यांत नऊ हजार रुपये घालून ‘सार्वजनिक सभे’ चा दिवाणखाना खरेदी करुन काकांचें स्मारक केले गेलें आहे.
- २५ जुलै १८८०

N/A

References : N/A
Last Updated : September 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP